Wednesday, July 30, 2025

banner 468x60

Homeललितडिगर, डंपर अन् प्राणीराज्याचे नियम

डिगर, डंपर अन् प्राणीराज्याचे नियम

दिप्ती चौधरी

गच्चीवरील पाण्याच्या टाकी खाली रोडरोलरने चार पिल्ले दिली. गच्चीवर आई फिरायला आली होती. तिच्या मागे लगबगीने रोडरोलर धावत वर आली. ओरडून ओरडून टाकीजवळ चल असा आग्रह करत होती. ही काय सांगते बघायला आई तिच्यामागे आली. तिने साद घालून आम्हाला बाहेर बोलावलं. खास आईला दाखवायला! आम्ही सर्व धावतच बाहेर आलो. आम्हाला अनिमिष नेत्रांनी आई बघतच राहिली.

थोडे मोठे झाल्यावर आमची जबाबदारी दनू म्हणजे तेव्हाचा डंपर यानेच पूर्ण पणे उचलली. त्याने आम्हाला गच्चीवरून खाली आणले. मोठ्या कौतुकाने आईला हाक मारून आम्हाला दाखवले. झाडावर चढायला, नखाला धार काढायला, उंदीर पकडायला त्यानेच शिकवले. आम्ही खेळत असताना आमच्यावर लक्ष ठेऊन तो बाजूला बसून राहायचा. मारामारी करायचा सराव देखील तो आमच्याबरोबर करायचा. इतकंच काय आम्हाला उंदीर, कबुतर पकडून द्यायचा. खरंतर, हा बोका पण रोडरोलरने आम्हाला जे शिकवायचे, आमच्यासाठी जे करायचे ते सारे हा मनापासून करत होता. डंपर मुळचाच अतिशय सज्जन आणि प्रेमळ. कोणी बाजूला आले तर, आपले खाणेही तो देऊन टाकणार. कधी कोणी आजारी असेल दुखापत झाली असेल तर, जाऊन चाटणार, सहनुभूतीने बघणार.

नेहमी कबुतर पकडून आम्हा सर्वांना देऊन टाकणार. एकदा दिदीला पण देऊ केलं होतं, पण ती उगीच भडकली आणि यालाच ओरडली, तेव्हापासून तिला देण्याचा नाद सोडून दिला. त्याच्या या सहृदय स्वभावामुळे तो आई आणि सर्वांचाच अतिशय लाडका आहे. हळूहळू चार पिल्लांमधील मी एकटाच राहिलो. डंपर मला सतत बरोबर फिरवायचा म्हणून डिंपल आंटी त्याला तिच्या खास पंजाबीमध्ये म्हणायची “क्या पिद्दि को लेके घुमते हो?” आणि माझा नाव पिद्दी, पिद्दू पडले. पण त्याच्या हाताखाली माझे ट्रेनिंग चालले असल्याने दिदी आणि बाबा मला apprentice म्हणायचे.

भाग एक – मी पिदू आणि हा दनू…

एकदा डिगर आणि डंपर मला घेऊन सोसायटीच्या उंच कुंपणाच्या भिंतीवर घेऊन गेले. पलीकडे असलेल्या चाळींच्या रिकाम्या गोदामाची खिडकी भिंतीलगत आहे. दोघे दोन बाजूला उभे राहून मला खिडकीसमोर उभे केले. मी जरा उडी मारायला घाबरत होतो तर, डिगरने माझ्या पार्श्वभागावर एक चापटी लगावून खाली पाडले. त्याचा हा वात्रटपणा आई खिडकीतून बघत होती. तिने जोरात हाक मारली तर, हे दोघे मला आत सोडून विरुद्ध दिशेला पसार! आता मी परत कसा येणार या चिंतेत आई होती, पण मी तसा हिकमती आहे. आलो परत!

आता एक नवीनच संकट आमच्या पुढे उभे राहिले. डिगर वयात आला आणि या भागात राबता असणाऱ्या भटक्या बोक्याला त्याला हुसकावून लावणे क्रमप्राप्त होते. हा प्राणीराज्याचा नियम आहे, बळी तो कान पिळी! पण या मारामाऱ्या जीवघेण्या असतात. बहुदा मांजराला इतर मांजरांकडून, भांडण झाले तरी जीवावर बेतत नाही. पण बोक्यांची मात्र हद्द असते, तिथे दुसऱ्या बोक्यालऻ अजिबात स्थान नाही… अगदी करो या मारो अशी निकराची लढाई असते. पाळलेले बोके बहुदा या भटक्या बोक्यांसमोर टिकू शकत नाहीत. मग ते घर सोडून पळून जातात किंवा मरून जातात. म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी किंवा जिवंत राहण्यासाठी ऑपरेशन हाच पर्याय उरतो.

तर, आता माणसांपासून रक्षण करता करता डिग्रूचं बोक्यापासूनही रक्षण करावं लागत होते. नाहीतर तो खूप घायाळ व्हायचा. त्याच्यासाठी हिमालयाचा जखमेवर मारायचा स्प्रे आणून ठेवला होता. खायला घालून पटकन तो मारायचा. पण तो अजिबात हाती लागत नसे. घाबरून खाणे सोडून दिवस दिवस लपून बसत असे. बोक्याने हल्ला करताचा तो इतका गलितगात्र व्हायचा की, तोंडातून आवाजही फुटू शकत नसे आणि जागीच शी, शू होऊन जायची. ते साफ करण्याची जबाबदारी आई आणि डिंपल आण्टी यानी उचलली होतीच, पण त्याची सोडवणूक करण्यासाठी सतत सतर्क राहावे लागे.

भाग दोन – माझा प्रवास…

सुदैवाने तळमजल्यावरील सर्वच घरे आमच्याबद्दल सहनुभूती बाळगून होती. त्यामुळे बहुदा कोणीतरी धावून येत असे. डिगर दिसायला अगदी राजासारखा आणि त्याच्यासारखाच नभळा. त्यामुळे बाबांच्या मनात त्याच्यासाठी एक विशेष हळवा कोपरा आहे. त्याला सोडवायला बाबा रात्री-अपरात्री अनवाणी पायांनी धावून गेले आहेत. खिडकीमध्ये थोडे दगडही गोळा करून ठेवले होते.

प्रश्न अधिकच गंभीर झाला जेव्हा डंपरही वयात आला. आता काळा बोका या दोघांनाही ठोकून काढत होता. पण प्राणीराज्याच्या नियमानुसार आतापर्यंत मित्र असणारा डिगर ही डंपरच्या जीवावर उठला!

(क्रमशः)

(पिदू या मांजराची आत्मकथा)

diptichaudhari12@gmail.com

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!