रेवती निलेश पांडे
काल बाजारात अचानक सुधा काकू भेटल्या. गजबजलेला रस्ता, तुफान गर्दी, पण काकूंच्या गप्पांचा ओघ मात्र नेहमीप्रमाणेच अव्याहत सुरू होता. आजूबाजूच्या गोंगाटाचा त्यांना कधीच फरक पडत नाही आणि कालही पडला नाही. पंधरा मिनिटं इकडल्या-तिकडल्या गप्पा झाल्यावर विषयाची सुई मूळ मुद्द्यावर आली. काकू सांगू लागल्या की, त्यांच्या भावाला चक्क स्वतःचा हक्काचा फ्लॅट सोडून भाड्याच्या घरात शिफ्ट व्हावं लागलं. पुण्यासारख्या ठिकाणी किती कठीण जातंय त्याला! आणि या सगळ्याला त्यांचा भाचा सारंग कसा कारणीभूत आहे वगैरे वगैरे…
काकू वैतागून म्हणाल्या, “काय म्हणावं बाई या Gen-Z पोरांना? काय विचार करतात अन् काय वागतात, त्यांचं त्यांनाच ठाऊक! आमच्या काळी कसं होतं, वडिलांनी म्हटलं या माणसाशी लग्न करायचं, की विषय संपला! बघ, आज दोन मुलं आहेत, सगळं नीट चाललंय. काही कमी आहे का संसारात?”
थोडक्यात झालं असं की, सुधा काकूंचा भाचा सारंग आणि त्याच्या फ्लॅटच्या अगदी समोरच्या फ्लॅटमध्ये राहणारी चित्रा, लहानपणापासून एकमेकांचे अगदी जिगरी दोस्त! सारंग आणि चित्राची गोष्ट खरं तर तशी साधी होती, पण जगासाठी ती गुंतागुंतीची झाली. अगदी लहानपणापासून एकाच सोसायटीत वाढलेली ही दोन मुलं. एकच शाळा, एकच ट्यूशन, एकाच सायकलवरून केलेला प्रवास आणि मधल्या सुट्टीत एकमेकांचा डबा वाटून खाण्यापासून ते करिअरच्या गप्पांपर्यंत सगळं कसं ‘कॉमन’ होतं. दोघंही इंजिनियर झाले, दोघंही एकाच वेळी ‘वर्क फ्रॉम होम’ करू लागले.
हेही वाचा – ती अन् तिचं स्वतंत्र अस्तित्व!
सोसायटीतल्या लोकांना आणि हळूहळू घरच्यांनाही वाटू लागलं की, आता यांनी एकमेकांच्या गळ्यात माळा टाकाव्यात आणि ऑथेंटिकली ‘एक’ व्हावं. दोघंही दिसायला छान, स्वभाव जुळणारे, एकमेकांना पूर्णपणे ओळखून असणारे. मग अडचण काय?
अडचण हीच होती की, त्या दोघांच्या मधे जे होतं, त्याला ‘लग्न’ हे नाव देणं सारंगला मान्य नव्हतं. सुरुवातीला चित्रालाही नव्हतं, परंतु नंतर घरच्यांच्या दबावाखाली किंवा “दुसऱ्या अनोळखी व्यक्तीशी लग्न करण्यापेक्षा ओळखीचा सारंग काय वाईट?” या विचाराने तिने होकार दिला होता. पण सारंग आपल्या निर्णयावर ठाम होता.
तो म्हणायचा, “आमच्यात घट्ट मैत्री आहे, विश्वास आहे, पण त्या पलीकडे जे ‘प्रेम’ लग्नासाठी हवं असतं, ते नाहीये. ती भावनाच नसेल, तर केवळ सोय म्हणून मी तिच्याकडे पत्नी म्हणून कसं बघू?”
ही भूमिका ना घरच्यांना पटली, ना समाजाला. शेवटी वाद इतका विकोपाला गेला की, सारंगच्या वडिलांनी रागाच्या भरात घर सोडलं. सुधा काकूंच्या मते ही ‘साठा उत्तराची कहाणी’ तिथेच संपली. पण खरं तर अशा कहाण्या कधीच संपत नाहीत.
काकूंचं बोलणं ऐकताना मला ‘ए दिल है मुश्किल’ मधली अनुष्का शर्मा आठवली. माझी मैत्रीण म्हणाली होती, “काय वेडी आहे ही मुलगी! इतकं प्रेम करणाऱ्या मुलाला सोडून फक्त मैत्री कशासाठी?” पण आज सारंगकडे बघताना जाणवलं की, मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे जे एक छोटं, सुंदर गाव वसतं, तिथे प्रत्येकालाच नाही थांबता येत.
आपल्याकडे स्त्री-पुरुषाच्या नात्याला एकतर ‘मंगळसूत्राचं’ कुंपण असतं किंवा ‘राखीचं’. त्या मधल्या शेड्स, त्या धुसर छटा कोणालाच दिसत नाहीत. सारंग आणि चित्राच्या नात्यात ‘आसक्ती’ नव्हती, पण ‘ओढ’ नक्कीच होती. तिथे हक्क नव्हता, पण जबाबदारी होती. लोक म्हणतात त्यांचं नातं संपलं. पण मला वाटतं, ते नातं संपलं नाही, तर ते समाजाच्या चौकटीत मावेनासं झालं.
हेही वाचा – Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
खरोखर, किती दुर्मीळ असतं असं नातं? जिथे केवळ एकमेकांचं अस्तित्व पुरेसं असतं. पण समाज या नात्यांना एकतर अलीकडे ओढतो किंवा पलीकडे ढकलतो. आणि या सक्तीच्या प्रवासात, सारंग आणि चित्रामधल्या नात्यासारखी सुंदर नाती मौन पांघरून हृदयात कुठेतरी ठसठसत राहतात.
तुझं माझं गाव
कुठेतरी वाचलेल्या आणि कधीतरी ऐकलेल्या
एका प्रवाहात वाहणाऱ्या शब्दांनी
मला तुझ्याशी नाही बोलता येणार
जे बोलायचयं ते तरी कुठे स्पष्ट आहे
तुझ्या माझ्या नात्यासारखं सारचं अस्पष्ट आहे
या नात्याचं नाव बऱ्याचदा शोधून बघितलं
पाडगावकरांच्या कवितेत,
गोखलेंच्या चारोळीत
व पुंच्या कथेत
आणि गझलेच्या व्यथेत
नाही सापडलं
तरीही असतीलच अशी नाती
आसक्तीच्या अल्याड
आणि तृष्णेच्या पल्याड
मैत्रीच्या पलीकडे
आणि प्रेमाच्या अलीकडे
नक्कीच एक गावं आहे
जिथे प्रत्येकालाच नाही थांबता येणार
कुठेतरी वाचलेल्या आणि कधीतरी ऐकलेल्या
एका प्रवाहात वाहणाऱ्या शब्दांनी
मला तुझ्याशी नाही बोलता येणार
मोबाइल – 8552893399


