शैलेश विजया सोमनाथ महाजन
बरेच दिवस असली आणि नकलीबद्दल एक विचार मनात येत होता, पण लेख स्वरूपात लिहिण्याचा योग आज श्री गणेशाच्या कृपेने आला. जेमतेम 10 ते 12 दिवसांनी गणेशोत्सव येईल आणि त्या दिवशी आपण घराघरात श्री गणेशाची मूर्ती आणून त्याची स्थापना करू.
तर मुद्दा असा की, ही श्री गणेशाची मूर्ती कशी बनवतात?
तुम्ही म्हणाल काय हा प्रश्न आहे! प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा शाडू माती साच्यात घालून आणि नंतर रंगवून मूर्ती बनवतात. आम्ही जाता-येताना रस्त्यारस्तांवर असलेले श्री गणेश मूर्तीचे कारखाने बघतो की!
होय, हे खरं आहे. पण कोणतीही मूर्ती बनवताना आधी शाडू किंवा चिकण मातीची मूर्ती हातांनी बनवतात आणि नंतर तिचा साचा (मोल्ड) तयार करतात. साचा बनवायच्या आधी जे ओरिजनल मूर्ती बनवतात, ते खरे म्हणजे ‘असली’ कलाकार किंवा शिल्पकार असतात. नंतर त्या ओरिजनल मूर्तीचा साचा बनवून त्यापासून असंख्य मूर्ती बनविल्या जातात. म्हणजेच, त्या ओरिजनल मूर्तीची ‘नक्कल’ (कॉपी) करतात. लक्षात येतंय खरा कलाकार कोण?
तर, जो साचाविना ओरिजनल, अस्सल मूर्ती बनवतो, तो खरा कलाकार आणि नंतर त्याचा साचा बनवून असंख्य मूर्ती बनविल्या जातात. पण आज जो साचा वापरून मूर्ती बनवतो म्हणजे जो नक्कल करतो, त्यालाच कलाकार किंवा मूर्तिकार समजले जाते. अर्थातच, तसे पाहिले तर, साच्यातून मूर्ती बनवणे तसे सोपे नसते; पण ओरिजनलपेक्षा मूर्तीच्या असंख्य कॉपी काढण्याची ही बरीच सोपी पद्धत आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
हेही वाचा – Awareness : सोशल मीडिया समजून घेताना…
म्हणजेच, आपण असली आणि नकलीमध्ये गडबड करतो. त्याने होते काय तर, खरा कलाकार असतो, नवनिर्मितीकार तो पडद्याआड राहतो. त्याला मान-सन्मान मिळतच नाही आणि इथे आपण नकलीलाच असली समजतो. हे उदाहरणादखल झाले. पण हल्ली सर्व बाबतीत हल्ली असेच होते.
आज एखादा कलाकार आपली कल्पना शक्ती / क्रिएटिव्ह माइंड वापरून एक नवीन कलाकृती निर्माण करतो. पण इतरांना तर “अरे. हे तर नेटवर उपलब्ध आहे.” किंवा “असे इंटरनेटवर मिळते! त्यावरून डाऊनलोड करून घेता येते.” इतकेच माहीत असते. पण कोणी तरी आर्टिस्ट ते मेहनत घेऊन बनवतो आणि नेटवर आणतो, तेव्हा ते तिथे उपलब्ध होते.
इथे लेखक आणि टायपिस्ट एकाच तागडीत तोलले जातात. नवनिर्मिती म्हणजे काय? त्याची नक्कल करणे म्हणजे काय? हेच अनेकाना माहीत नसते. त्यामुळे खरे कलाकार वंचितच राहतात.
आपल्यातील काही जण वेगळे कलाकार आहेत, त्यांच्यात वेगळी कल्पनाशक्ती आहे. नवनिर्मितीची ताकद आहे. मग ते लेखक असो वा कवी, गीतकार असो वा संगीतकार, मूर्तिकार, दिग्दर्शक, नेपथ्यकार, संशोधक असे विविध जण यात येतात. जे कलाकार किंवा नवनिर्मितीकार आहेत. पण हे अनेकांना समजतच नाही. आपला समाज याबाबत अनाभिज्ञ असतो, कारण कॉपी-पेस्ट आणि फॉरवर्डचा जमाना आहे. ओरिजनल आणि कॉपी पेस्टला एकच किंमत!
इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याकडून नकळतपणे ग्राफिक डिझायनर / क्रिएटिव्ह आर्टिस्टचा अपमान होत असतो. म्हणजे असली कलाकार आणि कॉपी करून वापरणारा नकली कलाकार… यात आपल्या फरकच कळत नाही.
हेही वाचा – या ‘तरुणां’च्या कार्यशक्तीचा देखील विचार व्हावा!
इंटरनेट, व्हॉट्स ॲप, फेसबुकच्या जमान्यात कॉपी-पेस्ट, फॉरवर्ड करण्यात आपण एतके सरावलो आहोत की, असली आणि नकलीतलं अंतर लक्षातच घेतलं जात नाही. हे सर्व आपल्या समजण्याच्या पलीकडे चालले आहे. हे विधन जरा वेगळे आहे, पण नीट विचार केला तर लक्षात येईल की सत्य काय आहे!.
आणखी काही उदाहरणं पाहूया!
घरी केलेली भाकरी, पोळी सकस आणि असली अन् पिझ्झा, बर्गर नकली. तरीही काय स्वीकारले जाते. कशाची जाहिरात होते? यावर आपण आपली मतं बनवतो. तेच कोल्ड्रिंक्सच्या बाबतीत! घरी केलेले साजूक तूप असली आणि चीज, बटर नकली! साजूक तूप कसे केले जाते? हे काही जणांना माहीतसुद्धा नसेल. 24 कॅरेट किंवा 22 कॅरेट सोन्याचे दागिने असली आणि फॉर्मिंगचे दागिने, 1 ग्रॅमचे दागिने, बेंटेक्सचे दागिने नकली! संगीतशास्त्राबाबत पण तेच… ओरिजनल गाणे, रीमिक्स गाणे आणि आता आलेले करावके!
ही यादी खूप वाढत जाईल, हे आपल्यालाही माहीत आहे. नकली बनत चालले आहे असली आणि असलीला कोणीच ओळखत नाही, किंमत देत नाही. पण असली आणि नकली यातील फरक आपल्याला समजला पाहिजे. योग्य ठिकाणी योग्य सन्मान, योग्य किंमत देता आली पाहिजे. खरा कलाकार जो सन्मानाचा भुकेला असतो, त्याला या नकलीच्या जमान्यात खरा सन्मानच मिळत नाही. ही असली कलाकाराची खरी व्यथा आहे.
दुर्दैवाने, ही स्थिती आणखी गंभीर होत जाणार आहे. कारण आता AI म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजन्स आले आहे. म्हणजे बघायलाच नको.
मोबाइल – 9322755462