डॉ. प्रिया गुमास्ते
(आयुर्वेदिक फिजिशियन आणि कॅन्सर कन्सल्टन्ट)
आनंद आणि उत्साहात पार पडलेल्या वसंत ऋतूतील महिन्यांनंतर हळूहळू ऊन जाणवू लागते आणि ग्रीष्म ऋतू सुरू होतो.
महिने : ज्येष्ठ आणि आषाढ (Mid May – Mid July)
ऋतुवर्णन
तीक्ष्णांशुरतितीक्ष्णांशुर्ग्रीष्मे सङ्क्षिपतीव यत् ॥26॥
प्रत्यहं क्षीयते श्लेष्मा तेन वायुश्च वर्धते ।
ग्रीष्मात (उन्हाळ्यात) सूर्यकिरण शक्तिशाली (तीक्ष्णांशु) होतात. नदीकाठ सुकतात आणि वनस्पती निर्जीव दिसू लागतात.
या ऋतूत व्यक्तीची शक्ती कमी होते. पाचक अग्नि सौम्य स्थितीत असतो. सूर्य अताशी पुष्पासारखा लाल दिसतो आणि पाण्याचा साठा आटत जातो. झाडाची पाने गळून पडतात आणि आजूबाजूला हिरवळ नसते. सर्व सजीव प्राणी त्यांची तहान भागवण्यासाठी पाण्याच्या स्रोतांचा शोध घेतात.
हेही वाचा – Ayurveda : शिशिर ऋतुचर्या
ऋतू आणि दोष
- सूर्याच्या अतिउष्णतेमुळे, वातावरणातील आर्द्रता कमी होते तसेच शरीरातील जलेय तत्वही कमी होते. त्यामुळे कफ (आर्द्रता) कमी होतो आणि शरीरात वात (कोरडेपणा) वाढतो. श्लेष्माला (कफ) बल (शक्ती) मानले जाते, त्यामुळे कफाच्या अभावामुळे देह बल (शक्ती) कमी होते. व्यक्तीचा अग्नी (पचानाग्नी) सौम्य स्थितीत रहातो.
अशा या उष्ण ऋतूत घ्यावयाचा योग्य आहार
भजेन्मधुरमेवन्नं लघु स्निग्धं हिमं द्रवम् सुशीततोयसिकताङ्गो लिखित सक्तीतून शर्करान् ॥
शशान्किरणान् भक्ष्यां रजन्यां भक्ष्यन् पिबेत् सासितं महिषं क्षीरं चन्द्रनक्षत्रशीतलम् ॥
- अन्न मधुर रसयुक्त म्हणजेच गोड, पचावयास हलके, स्निग्ध, थंड आणि जास्त द्रव (पातळ) स्वरूपात असावे. तांदूळ, ज्वारी, मसूर, गहू, मका यांचा उपयोग जास्त करावा.
- योग्य भाज्या – बडीशेप, भेंडी, कांदा, लसूण, सुके आले, दुधी भोपळा, मेथी, शतावरी, बीट, धणे, रताळे
- योग्य फळे – मनुका, खजूर, आंबा, डाळिंब, लिंबू, खरबूज, केळी, नारळ, द्राक्षे, संत्री, पपई, अननस, पेरू, फणस, अंजीर, कोकम.
- भरपूर आणि थंड पाणी, ताक, फळांचे रस, मांसाचे सूप, आंब्याचा रस असे विविध द्रवपदार्थ पिण्याचा सल्ला या ऋतूत दिला जातो.
- महिषा क्षीर म्हणजे म्हशीचे दूधात सीता म्हणजे खडी साखर मिसळून चंद्र (चांदणे) आणि नक्षत्र (तारे) यांनी थंड करून प्यावे.
उन्हाचा तडाखा लागून तब्येत बिघडू नये यासाठी त्यापासून बचाव करणे आवश्यक असते. त्यामुळे –
- कोणतेही काम करताना शक्यतो सावलीत करावे.
- रात्री टेरेसवर, चांदण्याखाली झोपावे.
- दिवसाच्या उष्णतेमुळे येणारा थकवा घालवण्यासाठी शरीरावर चंदनाचा ओला लेप लावावा, चंदनाची माळा गळ्यात घालावी.
- अतिशय हलके आणि पातळ कॉटनचे कपडे परिधान करावेत.
हेही वाचा – Ayurveda : वसंत ऋतुचर्या
ग्रीष्म ऋतूत खालील गोष्टी टाळाव्यात
- जास्त व्यायाम किंवा कठोर परिश्रम टाळावेत.
- जास्त खारट, तिखट, आंबट पदार्थ खाऊ नयेत.
- प्रखर सूर्यप्रकाशात जाणे टाळावे.
- अल्कोहोलयुक्त पेये या ऋतूत निषिद्ध मानली आहेत. खूप आवश्यक असल्यास, अगदी कमी प्रमाणात, किंवा भरपूर पाण्यात मिसळून त्यांचे सेवन करावे. अन्यथा, यामुळे शैथिल्य, दाह, जळजळ होणे किंवा चक्कर येऊ शकते.
- आंबट दही खाऊ नये. ते पाचायला जड असते तसेच दाह निर्माण करते.
ही पथ्यlपथ्ये पाळल्यास दाहक असा ग्रीष्म ऋतूही सुखावह होऊ शकतो.
क्रमश: