शैलजा गोखले
साहित्य
- ओलं खोबरं – 2.5 वाटी
- कापलेलं सुरण – 1 वाटी
- हिरव्या मिरच्या – दोन किंवा चवीनुसार
- कच्चं केळं – 1
- लाल माठाची पाने चिरून – 1 वाटी
- लाल माठाची देठे – 1 लहान वाटी
- मक्याचे कणीस – 1
- भाजीच्या अळूची पाने बारीक चिरून – 1 वाटी
- अळूचे देठ – 1 लहान वाटी
- अरबी किंवा अळकुड्या चिरून – 1 वाटी
- घोसावळं किंवा घोसाळं चिरून – 1 वाटी
- दोडक्याचे चिरून – 1 वाटी
- रताळं – 1
- ओल्या शेंगामधील शेंगदाणे – मूठभर (ताज्या शेंगा नाही मिळाल्या तर, कच्चे शेंगदाणे स्वच्छ धुवून पाच ते सहा तास भिजवून)
- सोलून चिरलेली हिरवी काकडी – 1 वाटी
- श्रावण घेवडा किंवा फरसबी – 1 वाटी
- चिरलेले गाजर -1 वाटी (ऐच्छिक)
- चिरलेला दुधी भोपळा – 1 वाटी
- चिरलेला लाल भोपळा – 1 वाटी
- भेंडी चिरून – 1 वाटी
- खडे मीठ – चवीनुसार
- चिंचेचा कोळ – 1 वाटी
पुरवठा संख्या : 4 जणांसाठी
तयारीस लागणारा वेळ :
- शेंगदाणे भिजवून ठेवण्यासाठी 5 तास
- मोठ्या लिंबाएवढी चिंच गरम पाण्यात भिजवून ठेवण्यासाठी – अर्धा तास
- भाज्या निवडून, साफ करून, चिरण्यासाठी पाऊण तास
- ओला नारळ फोडून खवण्यासाठी 15 मिनिटे
शिजवण्याचा वेळ : 20 ते 30 मिनिटे
एकूण वेळ : पावणेसात तास
हेही वाचा – Recipe : गणपतीसाठी नैवेद्य… खिरापत आणि पंचखाद्य
कृती
- दोन मोठे नारळ फोडून खवून घ्या
- सुरण स्वच्छ धुवून सोलून त्याचे थोडे मोठे तुकडे करून पाण्यात ठेवा
- कणसाचे रिंगसारखे तुकडे करून घ्या.
- सगळ्या पालेभाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
- अळकुड्या किंवा अरबी स्वच्छ धुवून त्याची साले काढून त्याचेही तुकडे करून घ्या. (ही भाजी थोडी बुळबुळीत आणि खाजरी असते.)
- घोसाळं, दोडका, रताळं, गाजर, दुधी भोपळा, लाल भोपळा स्वच्छ धुवून, सोलून त्यांचे तुकडे करून घ्या. रताळ्याचे तुकडे पाण्यात ठेवा.
- श्रावण घेवडा किंवा फरसबी स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून जरा मोठे तुकडे करावेत.
- भेंडीही धुवून कोरडी करून जरा मोठेच तुकडे करावेत.
- लाल माठाच्या भाजीचे आणि अळूचे देठ सोलून त्याचे तुकडे करावेत.
- जाड बुडाची कढई किंवा कुकर मंद गॅसवर ठेवा.
- या भाजीसाठीत तेल किंवा तुपाचा वापर केला जात नाही. त्यामुळे कढईत सुरूवातीला चिरलेला लाल माठ, चिरलेला अळू, थोडंसं ओलं खोबरं आणि हिरव्या मिरचीचा एखादा तुकडा आणि थोडासा चिंचेचा कोळ घालून छान परतवून घ्या.
- दोन्ही भाज्या शिजल्या किंवा त्यातील पाणी कमी झाल्याने आकसल्या की मग भेंडी, लाल माठाची आणि अळूची देठं, लाल भोपळा, दुधी भोपळा, साल काढून तुकडे केलेलं केळं, दोडका, घोसाळं, गाजर, फरसबी, सुरणाचे तुकडे घालून परत एकदा ओलं खोबरं आणि मिरचीचे तुकडे घालून नीट मिक्स करा.
- सगळ्या भाजीत खोबरं नीट मिक्स झालं की मग काकडी, अळकुड्या, रताळं, भुईमुगाचे दाणे, मक्याच्या कणसाचे तुकडे, ओलं खोबरं, खडे मीठ आणि उरलेला चिंचेचा कोळ घालून सगळ्या भाज्या नीट ढवळून घ्या.
- मग एक ते दीड वाटी गरम पाणी घालून भाजी शिजण्यासाठी ठेवा. कढईत भाजी करणार असाल तर सुरण, गाजर यासारख्या भाज्या शिजायला वेळ लागतो. पण प्रेशर कुकरमध्ये करणार असाल तर दोन शिट्ट्यांमध्ये भाजी छान शिजते.
विशेष आहार माहिती : शाकाहारी, पचनास हलकी
हेही वाचा – Recipe : झटपट स्वादिष्ट कॉर्न पुलाव
टिप
- या भाजीसाठी वरील साहित्यापैकी ज्या भाज्या मिळतील तेवढ्याच वापरल्या तरी चालतील.
- भाज्यांचे प्रमाण आवडीनुसार कमी, जास्त करू शकता.
- काही ठिकाणी या भाजीत चिंच घालत नाही. त्याऐवजी आंबटपणाला अंबाडे म्हणून फळाचा देखील वापर करतात.
- काही ठिकाणी चिंच किंवा अंबाडे न घालता भाजी करतात आणि मग शिजवलेली भाजी खाताना सोबत दही घेतात.
- या भाजीबरोबर राळं किंवा राजगिरा धान्याची भाकरी खातात.