मनीषा गोगटे
पातोळ्या हे कोकण आणि गोवा परिसरातील पक्वान्न आहे. हळदीच्या पानावर केल्या जाणाऱ्या पातोळ्या कोकणामध्ये प्रामुख्याने गणेशोत्सव काळात केल्या जातात. तसे पाहिले तर, नागपंचमी, गणेशोत्सव, दसरा अशा विविध सणांच्या औचित्याने हा गोड पदार्थ केला जातो. म्हणजेच, जेव्हा हळदीची पाने उपलब्ध असतात, तेव्हा हा पदार्थ हौसेने केला जातो.
साहित्य
- हळदीची पाने – 5 ते 6
- गावठी हिरव्या काकडीचा किस – दोन वाट्या
- गूळ – पाऊण पट
- तांदळाचे पीठ (सुगंधी) – काकडीच्या रसात मावेल तसे
- ओले खोबरे – पाव वाटी
- हळद – लहान चमचा
- मीठ – चवीनुसार
हेही वाचा – Recipe : गौरीचा नैवेद्य… घावन घाटलं
कृती
- हळदीची पाने धुऊन घ्यावीत.
- काकडीच्या किसात गूळ एकत्र करून घ्यावा.
- त्यात खोबरे, थोडे मीठ, चिमुटभर हळद घालावी.
- गूळ विरघळला की, त्यात मावेल एवढी पिठी (तांदळाचे पिठ) घालावी. मिश्रण सैलसरच ठेवावे.
- हळदीच्या पानांची देठे काढावीत. पानांना पाण्याचा थोडा हात लावून अर्ध्या पानावर काकडीचे मिश्रण पातळसर पसरावे. मग उरलेले अर्धे पान दुमडून दाबून घ्यावे.
- मग पातेल्यात पाणी ठेवून त्यावर चाळणी ठेवावी. त्यात चार-पाच पातोळे मोदकासारखे वाफवून घ्यावेत. अंदाजे 10 ते 12 मिनिटांत ते वाफवून होतात.
- या पाण्यात हळदीच्या पानांची देठे टाकावीत. त्यामुळे हळदीचा चांगला वास येतो.
- 12 ते 15 मिनिटांनंतर ते कोमट झाल्यावर वरचे पान काढून टाकावे.
टीप
- वाफवलेले हे पातोळे साजुक तूपाबरोबर आणखी खमंग लागतात.
- आवडीनुसार यात वेलची पावडर, खसखस आणि जायफळ घालू शकता.
- काहीजण काकडी आणि गूळ थोडा वाफवूनही घेतात. मग कोमट झाल्यावर त्यात तांदळाचे पीठ घालतात.
- उकडीच्या मोदकासारखी तांदळाच्या पिठीची उकड काढून, ती नंतर मळून त्या उकडीचा मध्यम आकाराचा गोळा हळदीच्या पानावर थापून त्यावर गूळ-खोबऱ्याचे सारण घालून, मग पान दुमडून 8 ते 10 मिनिटे वाफवून घ्यावे. ही पद्धतही काही ठिकाणी पाहायला मिळते.
तयार करण्याचा कालावधी : साधारणपणे अर्धा तास
हेही वाचा – Recipe : गणेशोत्सव विशेष… खव्याची साटोरी
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.