माधवी जोशी माहुलकर
मिश्र भाज्यांचे कटलेट्स केले तर, ते लवकर संपतात, हा माझा अनुभव आहे. फ्रीजमध्ये ज्या काही भाज्या थोड्याफार प्रमाणात उरलेल्या असतात, त्यामधे बटाटा मिक्स केला की, अफलातून चवीचे कटलेट्स तयार होतात आणि भाज्या न आवडणारी मुलेही फारसे प्रश्न न विचारता हे कटलेट्स भराभर संपवतात. यामुळे उरलेल्या भाज्यांचाही निकाल लागतो, मुलांच्याही पोटात भाज्या जातात आणि आपला उद्देश सफल होतो! यावेळेस मी यात लिटिल मिलेट्सचाही वापर केला. त्यामुळे एक वेगळीच चव निर्माण झाली.
साहित्य
- बीटरूट – अर्धे
- गाजर – 2
- किसलेला पानकोबी – 1 छोटी वाटी
- वाफवलेले मटार आणि स्वीट कॅार्नचे दाणे – अर्धा वाटी
- उकडलेले बटाटे – 2
- वाफवलेला फ्लॅावर – अर्धी वाटी
- आलं-लसूण पेस्ट – 2 चमचे
- हिरव्या मिरची (बारीक तुकडे) – 3 ते 4
- ब्रेड क्रम्स – दीड वाटी
- कॉर्न फ्लेक्सचा – एक वाटी
- चाट मसाला – 2 चमचा
- एका लिंबाचा रस
- मिरपूड – चवीनुसार
- धणे-जिरे पावडर – 1 ते 2 चमचे
- लाल मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स – 1 चमचा
- मैद्याची पेस्ट (स्लरी) – 2 ते 3 चमचे
- मीठ – चवीनुसार
- वाफवलेले लिटिल मिलेट्स – अर्धी वाटी
- चिरलेली कोथिंबीर – मूठभर
हेही वाचा – Recipe : अतिशय खमंग अन् सर्वांच्या पसंतीचं थालिपीठ!
कृती
- प्रथम उकडलेले बटाटे मॅश करून घ्यावेत.
- बीटरूट आणि गाजर वेगवेगळे किसून ते घट्ट पिळुन त्यातील पाणी काढून घ्यावे.
- यामध्ये किसलेला पानकोबी, वाफवलेला फ्लॅावर (वाटल्यास फ्लॅावरही किसून घ्यावा), दोन चमचे आले लसूण पेस्ट, तीन ते चार हिरव्या मिरचीचे बारीक केलेले तुकडे आणि मुठभर चिरलेली कोथिंबीर असे सर्व साहित्य मॅश केलेल्या बटाट्यात घालावे.
- नंतर त्यात एक ते दोन चमचे लाल मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स, एक ते दोन चमचे धणे जिरे पावडर, एक चमचा मिरपुड, चवीनुसार मीठ, दोन चमचे चाट मसाला घालावा.
- त्यात वाफवलेले मिलेट्स टाकून एका लिंबाचा रस घालावा.
- बाइंडिंगकरता अर्धी वाटी ब्रेड क्रम्स घालावे आणि या सर्व मिश्रणाचा घट्ट गोळा तयार करावा.
- चार ते पाच चमचे मैद्यात पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्यावी.
- कॉर्नफ्लेक्सचा मिक्सरमध्ये बारीक चुरा करून घ्यावा, एक वाटीभर ब्रेडक्रमसही तयार ठेवावेत.
- या मिश्रणाचे लांबट गोल आकाराचे गोळे करून घ्यावे किंवा आपल्या आवडीनुसार आकार द्यावा.
- हे गोळे फ्रीजमधे एक तासभर ठेवून, नंतर प्रथम मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवून नंतर कॉर्नफ्लेक्स आणि ब्रेडक्रम्सच्या चुऱ्यात घोळवून मंद आचेवर फ्रायपॅनमध्ये तळावे किंवा शॅलेफ्राय करावे.
हेही वाचा – Recipe : तुपातील तुरीचे दाणे आणि वाणीचा हुरडा!
टिप्स
- कॉर्नफ्लेक्सचा चुरा आणि ब्रेडक्रम्स असे दोन्ही वापरल्याने या कटलेट्सला खूप छान कुरकुरीतपणा येतो.
- असे कटलेट्स करताना यामध्ये कुठल्याही प्रकारचे मिलेट्स वापरू शकता.
एकूण कालावधी – अर्धा ते पाऊण तास
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


