सायली कान्हेरे
रात्री जेवायला काय करू? हा प्रश्न जागतिक आहे, असं मला वाटते. पटकन होणारा आणि टेस्टी लागणार पदार्थ पाहिजे असतो, पण गाडी खिचडीवर अडते. म्हणून आज टेस्टी आणि कमीत कमी साहित्यात झटपट होणारा चविष्ट पदार्थ सांगणार आहे… तो आहे कॉर्न पुलाव (Corn Pulao)! हा भाताचाच प्रकार आहे आणि घरच्यांना नक्कीच आवडेल…
साहित्य
बासमती तांदूळ – 1 वाटी
कॉर्न – 1 वाटी
कांदा – 1 मध्यम आकाराचा
टोमॅटो – 1 मध्यम आकाराचा
लसूण – 3 पाकळ्या
आले – 1 इंच
हिरव्या मिरच्या – 2
गरम मसाला – 2 टेबल स्पून
हळद – 1/4 चमचा
मीठ – चवीनुसार
बटर – 2 मोठे चमचे
हेही वाचा – Recipe : खमंग कोबी पोहे अन् पास्ता सलाड
पुरवठा संख्या – दोघांसाठी
तयारीसाठी लागणारा वेळ
- तांदूळ 1 तास आधी भिजवून घ्यावा.
- कांदा, टोमॅटो उभे चिरावेत आणि आलं, मिरची, लसूण मिक्सरमधून भरड वाटावेत – साधारण 5 मिनिटे.
शिजायला लागणार वेळ
- कॉर्न उकडून घ्यावेत (कुकरला 3 शिट्ट्या, मायक्रोव्हेवमध्ये 10 मिनिटांवर शिजवावेत.)
- तांदूळ शिजायला 15 मिनिटे
- एकूण वेळ – 30 मिनिटे.
कृती
- कढई तापत ठेवावी; तापली की त्यात 1 चमचा बटर घालावे, मग त्यात आलं, मिरची, लसूण पेस्ट घालावी. ती थोडी ब्राऊन झाली की, गरम मसाला घालावा, हळद घालावी.
- मग चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालावा. मऊ होईपर्यंत परतावा.
- आता त्यात कॉर्न निथळून घालावेत.
- मग त्यात तांदूळ घालून परतून घ्यावेत. 2 वाट्या पाणी घालावे, चवीनुसार मीठ घालावे.
- 10 मिनिटे वाफ देऊन शिजवावे.
- शिजल्यावर सर्व्ह करताना वरून बटर घालून मिक्स करून वाढावे.
हेही वाचा – Recipe : श्रावण स्पेशल… फराळी मिसळ
टिप
- यात बदल म्हणून मटार, मशरूम, पनीर घालू शकता.
- याबरोबर तळलेले उडीद पापड आणि काकडी, टोमॅटो, कांदा यांचे दह्यातील रायते छान लागते.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.