मागील लेखांमधून आपण दिनचर्येतील सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ठराविक वेळेस करावयाच्या विविध बाबींबद्दल सविस्तररीत्या जाणून घेतले. या लेखात आपण दिनचर्येतील उर्वरित महत्त्वाच्या मुद्द्यांसंबंधी जाणून घेणार आहोत.
वैयक्तिक स्वच्छता
स्वस्थ आरोग्यासाठी वैयक्तिक स्वच्छता नितांत आवश्यक आहे. दिनचर्येत यासाठी वेळ द्यायलाच पाहिजे. या दृष्टीने खालील मुद्द्यांकडे आवर्जून लक्ष द्यावे.
- चेहर्याचे आरोग्य – तेल लावणे, भरपूर पाणी पिणे, अधूनमधून फेशियल आणि यासाठी पंचामृत पदार्थांचा वापर इत्यादी.
- मौखिक आरोग्य – दातांचे आरोग्य हा शारीरिक आरोग्याचा आरसा समजतात. सकाळी उठल्यावर तसेच रात्री झोपण्यापूर्वी नियमित दंतमंजन, काहीही खाल्ल्यावर खळखळून चुळा भरणे, जीभेची स्वच्छता इत्यादी.
- हातपाय, केस, डोळे, नाक, कान, जननेंद्रिय इत्यादीं अवयवांची निगा आणि स्वच्छता. यासाठी रोज स्नान, शक्य असल्यास सूर्यस्नान अधूनमधून अभ्यंग स्नान, मिठाच्या तसेच तुरटीच्या पाण्याने स्नान यांचा यथायोग्य अवलंब करावा.
हेही वाचा – Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
चालणे, फिरायला जाणे
चालणे हा उत्तम आरोग्यदायी विनाशुल्क व्यायाम आहे. सकाळी अथवा सायंकाळी सोयीनुसार चालावे.
बाहेरची कामे
सर्वांनीच दिवसातील काही वेळ बाहेरची कामे करण्यासाठी राखून ठेवावा.
धार्मिक उपासना
दिवसभरात धार्मिक उपासना करण्यासाठी ठराविक वेळ राखून ठेवावा. यात सर्वसाधारणपणे देवपूजा, आरती, प्रार्थना, स्तोत्र, पोथी वाचन, जप, होम, सणवार इत्यादींचा समावेश होतो.
छंद जोपासणे
दिवसभरातील थोडा वेळ तरी वाचन, लेखन, बागकाम, गायन/गाणी ऐकणे किंवा आवडीचा छंद यामधे रमावे. यामुळे खचितच मानसिक आरोग्य संवर्धन सुकर होते.
हेही वाचा – निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा गरजेची…
अशा तऱ्हेने आपण दिनचर्येसंबंधीत सर्व लेखांमधून दिनचर्येतील विविध बाबींबद्दल वेळेच्या कोष्टकासहित मार्गदर्शन घेतले आहे. दिनचर्येविषयी नमूद केलेले विविध मुद्दे ध्यानात घेऊन प्रत्येकाने स्वतःला उपयुक्त असे वेळापत्रक तयार करून दिनचर्या आखावी आणि दिनचर्येचे नियमित पालन करावे. असे केल्याने मेंदूला सातत्य राखण्याची आणि लक्षपूर्वक काम करण्याची सवय आपसूकच लागते. यामुळे मनाची एकाग्रता वृद्धिंगत होण्यास साहाय्य लाभते. परिणामी, मानसिक आरोग्य समृद्ध होते. महत्त्वाची बाब म्हणजे दिनचर्येत कालानुरूप आवश्यकतेनुसार यथायोग्य बदलही करावेत.
यासंदर्भात इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत दिनचर्येतील विविध बाबींबद्दल उपयुक्त सर्वसमावेशक सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
क्रमशः


