निरामय आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी आपण मार्गदर्शनाचा श्रीगणेशा दिनचर्येपासून केला. दिवसाची सुरुवात सकाळी लवकर 5 ते 5.30च्या दरम्यान उठून करावी आणि सांगता रात्री 9.30 ते 10च्या दरम्यान झोपी जाऊन करावी, हे आपण मागील दोन लेखांत विस्तृतपणे पाहिले. रात्री झोपण्याच्या आणि दुसरे दिवशी सकाळी उठण्याच्या या कालावधीत आपण रात्रीची झोप घेतो. शरीर-मन स्वस्थ राहण्यासाठी रात्रीची झोप ही ‘सुखनिद्रा’ असणे आवश्यक आहे… आणि हाच या लेखाचा विषय आहे.
सुखनिद्रा म्हणजे काय?
सोप्या भाषेत, सुखनिद्रा म्हणजे शरीर-मनाला सुख देणारी किंवा प्रदान करणारी निद्रा होय. निद्रा म्हणजे झोप ही शांत (Peaceful), आरामदायी (Restful/ Comfortable), आनंददायी (Pleasant/Happy) असावी. थोडक्यात सांगायचे झाल्यास, पुरेशी, शांत आणि गाढ झोप म्हणजे ‘सुखनिद्रा’ म्हणता येईल.
पुरेशी झोप
- सर्वांसाठी साधारणतः 7 ते 8 तासांची झोप पुरेशी असते.
- वास्तविक, झोपेचे प्रमाण वयोमानानुसार (किशोरवयीन, तरुण-प्रौढ, ज्येष्ठ) आणि प्रकृतीनुसार (वात, पित्त, कफ) वेगवेगळे असते.
- सकाळी उठल्यावर शांत, ताजेतवाने आणि उत्साही वाटल्यास झोप पुरेशी झाली, असे म्हणता येईल.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : सकाळी लवकर उठावे
शांत आणि गाढ झोप
- आयुर्वेदातील स्वस्थ अवस्थेच्या व्याख्येनुसार झोपण्याच्या वेळेला गाढ झोप लागणे, हे आरोग्य संपन्नतेचे लक्षण मानले जाते आणि अशी झोप येत नसेल तर शरीर स्वस्थ म्हणता येणार नाही.
- शांत आणि गाढ झोप म्हणजे झोपेत कसलाही किंवा कोणताही व्यत्यय किंवा बाधा असू नये आणि झोप सलग असावी.
सुखनिद्रा : महत्त्व आणि आवश्यकता
आपले शारीरिक स्वास्थ्य तसेच मानसिक आरोग्य उत्तम असावे आणि टिकून रहावे, यासाठी सुखनिद्रा खरोखरच आवश्यक आहे. म्हणूनच आपल्या दैनंदिन जीवनात सुखनिद्रेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे… आणि ही वास्तवता जाणून घेण्यासाठी आपण सुखनिद्रेचे आपल्याला मिळणारे फायदे थोडक्यात जाणून घेऊयात.
- शरीराचे पोषण चांगल्या पद्धतीने होते.
- शरीराची खऱ्या अर्थाने दुरुस्ती रात्रीच्या सुखनिद्रेत होते.
- रोगप्रतिकारक शक्ती वृद्धींगत होते.
- शरीराची कार्यक्षमता सुधारते तसेच वाढते.
- शारीरिक दमणूक दूर होते तसेच मानसिक थकवा घालवते.
- शरीर-मनाला बल आणि पुष्टी मिळते. त्यामुळे उत्साही, आनंदी आणि सुखकारक वाटते.
- तनामनाला पुरेपूर विश्रांती मिळते तसेच ऊर्जा देखील मिळते. यामुळे प्रसन्न आणि ताजेतवाने वाटते.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : रात्री झोपण्याची वेळ महत्त्वाची
वास्तविक, झोप ही परमेश्वराची देणगी आहे. वेळेवर पुरेशी शांत झोप निरामय शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे… म्हणूनच प्रत्येकानेच सुखनिद्रेचे आरोग्य लाभ अनुभवले पाहिजेत.
पुढील लेखात आपण सुखनिद्रेसाठी काय करावे, याबाबत मार्गदर्शन घेणार आहोत.
क्रमशः


