रविंद्र परांजपे
आत्तापर्यंतच्या सर्व लेखांमध्ये आपण निरामय आरोग्य या संकल्पनेबद्दल सविस्तर माहिती घेतली. आता आपण निरामय आरोग्याची वाटचाल आरंभ करणार आहोत… आणि या वाटचालीत आपण निरामय आरोग्याचे विविध पैलू जाणून घेणार आहोत. थोडक्यात, निरामय आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी आपण काय करावे, तसेच आपण काय करू नये, याबाबत सविस्तर आणि सखोल मार्गदर्शन घेणार आहोत.
मार्गदर्शनाचा श्रीगणेशा आपण दिनचर्येपासून करूयात.
दिनचर्या म्हणजे काय?
दिन म्हणजे दिवस आणि चर्या म्हणजे पथ्ये. सोप्या भाषेत दिनचर्या म्हणजे विहार. थोडक्यात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण करत असलेल्या सर्व कामांचा समावेश दिनचर्येत होतो. आता आपण ‘सकाळी लवकर उठावे’ या लेखाच्या मूळ विषयाकडे वळूयात.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक…
दिवसाची सुरुवात
‘लवकर निजे, लवकर उठे, तयास ज्ञान, सुख, शांती, आरोग्य, धनसंपदा लाभे’ अशी म्हण पूर्वापार प्रचलित आहे. या उक्तीनुसार ब्राह्ममुहूर्तावर उठावे. ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी दीड तासाची वेळ होय. यानुसार किमान 5 ते 5.30 वाजण्याच्या दरम्यान उठावे.
ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे फायदे –
- पहाटेच्या वेळी सत्त्वगुणांची वृद्धी होते.
- पहाटेचे वातावरण शुद्ध आणि प्रदूषणविरहित तसेच शांत आणि आल्हाददायक असते. त्यामुळे मन प्रसन्न आणि आनंदी राहते.
- आकलनशक्ती, ग्रहणशक्ती आणि स्मरणशक्ती या मानसिकशक्ती वृद्धिंगत होतात.
- दिवसाची सुरुवात सकारात्मक होते.
- सकाळी लवकर उठल्याने साहजिकच दिवसाच्या कामांसाठी अधिक वेळ मिळतो आणि त्यामुळे कामे सुरळीत होण्यास सहाय्य मिळते.
- दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटते. त्यामुळे दिवसभरातील कामे शांत तसेच एकाग्र मनाने व्यवस्थितरीत्या करता येतात.
- शारीरिक स्वाथ्य लाभते.
- मानसिक आरोग्य लाभ देखील मिळतात.
महत्त्वाची बाब म्हणजे सूर्योदयाच्या वेळी अजिबात झोपू नये, कारण उठायला उशीर झाल्यास शरीरात कफदोष वाढून शारीरिक आरोग्यावर दुष्परिणाम होतात.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी पैशाचा यथायोग्य विनियोग आवश्यक
वास्तविक, आपल्या सर्वांनाच सकाळी उठण्याचे फायदे माहीत असतात. परंतु सध्याच्या धकाधकीत बदललेल्या जीवनशैलीमुळे बहुतांश लोकांच्या बाबतीत सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठणे एकंदरीतच दुरापास्त झाल्याचे दिसून येते. असे असले तरी, स्वतःच्याच हितासाठी प्रत्येकाने सकाळी लवकर उठण्याचा दृढ निश्चय केला पाहिजे आणि त्यासाठी हळूहळू सवय लावायला पाहिजे. कालांतराने या सवयीचे रुपांतर कायमस्वरुपी आचरणात होईल.
तात्पर्य, शारीरिक तथा मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी लवकर उठणे नितांत आवश्यक आहे. यासंदर्भात एक इंग्रजी म्हण आठवते –
Early to bed, early to rise, makes a man healthy, wealthy and wise.
क्रमशः
(लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून गेल्या 25 वर्षांपासून ते नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. जानेवारी 2015पासून ते ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत असून त्यांनी असंख्य महिला व पुरुष योग साधकांना योग-आरोग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेली ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ व ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही जीवनोपयोगी मार्गदर्शनपर पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. पुस्तके घेतल्यानंतर विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध आहे. या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी आवर्जून संपर्क करावा.)
मोबाइल – 9850856774


