ॲड. कृष्णा पाटील
भाग – 1
दादू केरळहून गावाकडे आला की सारा गाव गोळा व्हायचा.
“कधी आला?”
“आता किती दिवस मुक्काम?”
“परत कधी जाणार?”
“घरी या..”
“कधी येणार?”
“गेल्यावेळी येतो म्हणाला पण आला नाही. यावेळी चुकवू नका.”
लोकांचा आग्रह असायचा. दादू सोन्या-चांदीच्या दुकानात कामाला होता. वर्ष-सहा महिन्यांतून गावी यायचा. पण आला की, नडल्या-अडलेल्यासाठी धावून मदत करायचा. प्राथमिक शाळेला सर्वात जास्त देणगी दादूने दिली. ‘मुले शिकली पाहिजेत. आम्हाला शिकायची हौस होती. पण परिस्थिती नव्हती. नाईलाजाने परमुलखात जावं लागलं. म्हणूनच गावात शिक्षण वाढलं पाहिजे…’ दादूला असं नेहमी वाटायचं.
दोन वर्षापूर्वी शाळेत 15 ऑगस्ट साजरा केला. त्या वेळी दादू उपस्थित होता. पहिली ते पाचवीच्या प्रत्येक दहा गरीब मुलांना दत्तक घेतले. शिक्षणाची सर्व जबाबदारी उचलली. सगळे शिक्षक आवाक झाले. गावचे सरपंच, पोलीस पाटील दादूला खूप मान देत. पण दादू कधी राजकारणाच्या नादाला लागला नाही.
दादूच्या उदारपणाची ख्याती आजूबाजूच्या गावात देखील होती. दादू केरळला गेला, त्याला दहा वर्षे झाली. मालकाच्या मुलांना शाळेत सोडणे. बाजारातून किराणा आणणे… अशी कामे सुरुवातीला करीत होता. नंतर सोने पटवण्याकरिता मदत करू लागला. पण दोन-तीन वर्षे झाली असतील, मालक शंका घेऊ लागला. कधी कधी उपाशी ठेवू लागला. मग दादूने दुकानदारी सोडली.
दादू गावाकडे आला. वडिलांबरोबर रोजगार करू लागला. खुडा करायला जाणे. पेंड्या बांधायला घेणे. उसाची पाचट काढायला घेणे… वर्षभरात दादू काळाकुट्ट झाला. एके दिवशी धाडस करून घरी न सांगता पुन्हा केरळात गेला. एका जुन्या गिऱ्हाईकाची गाठ घेतली. विनवणी करून काम मागितले. त्याने तिथेच काम दिले. दादू काम करू लागला. दोन-तीन वर्षे अशीच गेली. मग त्याने स्वतः दुकान टाकले. कष्टातून जिंदगी उभी केली.
खूप दिवसांनी एकदा दिवाळीला दादू गावी आला. घरी तशीच परिस्थिती… विधवा बहीण, एक भाऊ तुरुंगात, एक भाऊ डोक्याने मंद, आजारी आई, रोजगार करणारे वडील… दादूने सर्वांना कपडे आणले होते. आईला गळ्यातला डाग, विधवा बहिणीला दोन साड्या अन् पैंजण. भावजयींना दोन-दोन बांगड्या… सगळे खूश!
दिवाळी संपली. दादू केरळला जाण्यास निघाला. तोपर्यंत शेजारचा नामदेव आला. म्हणाला, “पैशाची गरज आहे. जमीन देणार आहे. पण तुझ्याशिवाय नाही.”
दादूने विधवा बहिणीच्या नावावर जमीन घ्यायची ठरवले. रात्री आई-वडिलांबरोबर बोलणं झालं. वडील म्हणत होते, “अगोदर घरचं बघ. घरची फक्त एक एकर जमीन. हवी तर तिला नंतर घेऊन दे.” पण, बहिणीला कोणीही नाही, एकच मुलगा- रामा. त्यांना आधार म्हणून असू दे, असं दादूचं म्हणणं. खरेदी झाली. विधवा आक्का आनंदी झाली. दादू निघून गेला.
आणि नंतर असाच पायंडा पडत गेला. दरवर्षी दादू गावी यायचा. कधी भावजयच्या नावे, तर कधी वडिलांच्या नावे खरेदी करायचा. बघताबघता दादूच्या घरची 25 एकर मिळकत झाली. आता घर तेवढे मोठे बांधले की निवांत झालं! दादूने लवकरच घर बांधायला काढलं. पहिल्यांदा खरेदी घेतलेल्या म्हणजे आक्काच्या नावच्या मिळकतीत पाया काढला.
दादू चेष्टेने आक्काला म्हणायचा, “बघ, नाहीतर आम्हाला नव्या घरातून हाकलून लावशील.” आक्का दादूला म्हणायची, “असली चेष्टा मला खपणार नाही बघ. तुझ्यामुळे आम्ही चार घास खातोय…” तिचं डोळे पाणवायचे.
दादूला मुलगा नव्हता. एकच मुलगी होती, रिंकू. ती शिकत होती. गेल्या पाच-दहा वर्षांत फक्त एक एकर जमीन दादूने स्वतःच्या नावाने घेतली. त्यापेक्षा काही केले नाही. दादू गावी आला की रोज मटण. दादूला नव्हे, वडिलांना आवड होती. दादू बाहेर पडला की, वडील हाक मारीत. दादू कुठे निघाला? दादू म्हणायचा, “तुमची सोय करायला.” वडील हसायचे.
हेही वाचा – 7/12 : मोह आणि लालसा
दादू म्हणजे गावचा लाडका. दादूने घरी कधीच दुजाभाव केला नाही. अगदी तुरुंगातल्या महादूलापण डबे पोहोच व्हायचे. दरवेळी दादू जाताना तुरुंगात महादूला चार-पाच हजार रुपये देऊन जात असे.
पण अलीकडे दादू थकल्यासारखा दिसायचा. अँसिडचे काम करून आजारी पडलेला. दोन वेळा कावीळ झालेली. त्यातून कसा तरी वाचलेला. गावकरी, मित्र सांगायचे, “दादू आता गावी ये. बस झाले. एक तर मुलगी आहे. कशाला पळतोय?” पण दादू म्हणायचा, “अरे असं म्हणू नका. सहा-सात माणसांचं कुटुंब माझंच की! कोण जबाबदारी घेईल? घर पूर्ण झाले की, परत यायचा विचार करू. गावी तर येणारच की. शेवटी आपली पांढरी आहे.”
गावी घराचं काम संपत आलेलं. फक्त रंग तेवढा बाकी होता. पण तेवढ्यात लाँकडाऊन सुरू झालं. दादू फॅमिलीसहित केरळमध्ये अडकला. पण या दरम्यान महादू पॅरोलवर सुटला. तो घरी आला.
लाँकडाऊनला दीड-दोन महिने झाले… आणि एके दिवशी गावी बातमी धडकली… दादूचा देहांत झाला. गाव सुन्न झालं. अफवांचा महापूर आला. कोण म्हणायचा, ‘कोरोनाने गेला…’, कोण म्हणायचा, ‘कावीळ वाढली…’, कोण म्हणायचा, ‘दुसराच आजार असणार….’ गावकऱ्यांना काहीच समजत नव्हतं. मग गावकऱ्यांनी फोन केला. मुलीबरोबर बोलले… तर कावीळ जास्त झाली. लॉकडाऊनमुळे औषधे पण मिळाली नाहीत. त्यातच तो गेला, असे समजले…
सरपंचानी झटाझट फोन केले. लगेच पास मिळवून दिला. रिंकूला तो पाठवला. केरळातून दादूचे प्रेत घेऊन ॲम्बुलन्स आली. सोबत दादूची पत्नी, मुलगी. परंतु तोपर्यंत दादूच्या घरात अफवा पसरली होती, दादू कोरोनाने मेलाय, त्याला कावीळ नव्हतीच.
दुपारी चार वाजता ॲम्बुलन्स आली… गावकरी शोकाकूल झाले. दादूचे दोस्त तर हमसून रडू लागले. दादूचे घर शेतात होते. गावकऱ्यांनी प्रेत शेतात दहन करण्याचा निर्णय घेतला. एवढ्यात दादूचा बाप पुढे आला. म्हणाला, “गेलेला माणूस परत येणार नाही. पण त्याच्यामुळे घरातलं कोणी तरी कमी व्हायला नको. दादूच्या प्रेताला माझ्या शेतात अग्नी देऊ देणार नाही.”
माणसं चकित झाली. सरपंच पुढे आले अन् त्यांनी दादूच्या बापाला समजून सांगितले, “दादूला कोरोना झालेला नव्हता. त्याला कावीळ झाली होती. त्यामुळे काहीही भिण्याचे कारण नाही…” परंतु बाप ऐकायला तयार नव्हता. विधवा बहीण तर बोलायलाही तयार नव्हती. दादूची आई खाली मान घालून रडत बसलेली. दादूच्या बायकोचे डोळे सुजलेले. हे सर्व पाहून तिला भोवळ आली. ती खाली कोसळली.
हेही वाचा – स्वाभिमानी की हेकेखोर?
सरपंचांनी चार माणसांना बोलावले. प्रेत गावातल्या स्मशानभूमीत न्यायचे ठरले. तशीच ॲम्ब्युलन्स फिरवली. थेट गावचं स्मशान. गावकऱ्यांनीच दादूवर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर, दादूच्या बायकोला आणि मुलीला विधवा बहिणीने सांगितले, “तुम्हाला तुमची सोय बघावी लागेल. कारण तुमचं इथं काहीच नाही.” रिंकूची धरती दुभंगली… दादूची बायको तर गलितगात्र झाली… काय करावे सुचेना. मग रिंकू सरपंचाकडे गेली. त्यांना सर्व कहाणी सांगितली. सरपंच म्हणाले, “चार माणसे बोलवून बैठक घेऊ.”
दोन दिवसांनी बैठक बसली. सरपंच दादूच्या वडिलांना म्हणाले, “पुढे काय करायचे, काका?” वडील म्हणाले, “आता काय करायचे? दादूने तर त्यांच्यासाठी काहीच केले नाही. सगळे पैसे गावावर उधळले. बायकापोरांची काळजी केली नाही. आता त्यांच्या नशिबाला कोणतरी काय करणार?”
सरपंच म्हणाले, “ही सगळी इस्टेट दादूनेच घेतली ना?”
तसे वडील संतापले. म्हणाले, “दाखवा बघू दादूचे नाव. तुम्ही आमचे घर फोडायला आलाय काय? दादूच्या नावावर एक एकर जमीन आहे. त्यावर त्याच्या बायका-मुलांनी कसेही चालवावं. आम्हाला त्याचा एक गुंठा नको. बाकी मिळकतीत त्याचा काडीचा संबंध नाही.”
कोणच ऐकायला तयार नव्हतं. तुरुंगातला महादू म्हणाला, “दादूला तरी कुठे मुलगा आहे? म्हणूनच त्याने स्वतःसाठी काही केले नाही. त्यामुळे मध्यस्थी करणाऱ्यांना बोलायला जागाच नाही. त्याचं खाल्लं मीठ जागवण्यासाठी तुम्ही आला त्याबद्दल राग नाही. पण आता उठा.”
दादूच्या बापाचं आणि भावाचं रूप बघून गावकरी अचंबित झाले. घराचेच वासे फिरले! नाईलाजाने अपमान सहन करीत ते आपापल्या घरी निघून गेले.
क्रमश:
(मोबाइल – 9372241368)