यश:श्री
पूर्वीच्या काळी लता, किशोर, रफी, मन्ना डे, आशा, मुकेश, तलत अशा एकापेक्षा एक गायकांबरोबरच योग्य शब्द वापरणारे गीतकारही होते. त्यामुळे या गाण्यांचे गारुण आजही कायम आहे. आताही चांगली गाणी बनतात, पण त्यातही गुणगुणण्यासारखी किती आहेत? हा खरा प्रश्न आहे. कधी कधी तर केवळ शब्दछल असतो. अलीकडेच एक व्हिडीओ पाहण्यात आला होता. अनुपम खेर यांनी ऋषी कपूर यांच्या घेतलेल्या इंटरव्ह्यूची ही क्लिप आहे. एकाहून एक सरस हिट चित्रपट देणाऱ्या ऋषी कपूर यांना अनुपम खेर यांनी आजकालच्या नवीन गाण्याबद्दल विचारले असता, ते लगेच म्हणाले, ‘आताची गाणी कुठे आहेत, नुसता गोंगाट आहे. कोणीही उठते, गाणे म्हणते… गाणे लिहिते. माझा मुलगा रणबीर याचं काहीतरी एक गाणं आहे – बलम पिचकारी… काय गाणं आहे? काहीच समजत नाही. आजकालची गाणी गुणगुणताही येत नाहीत.’
ऋषी कपूर यांनी व्यक्त केलेला हा संताप अगदी योग्य म्हणावा लागेल. अशी कितीतरी गाणी आहेत, त्याचे शब्द पटकन कळत नाहीत, त्या गाण्याचे नेमके शब्द काय आहेत, हे हातातल्या मोबाईलद्वारे गुगलमध्ये शोधावे लागतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर, ‘Ra.One’ सिनेमातील ‘छम्मक छल्लो…’ गाण्याचं देता येईल. या गाण्यातील पहिले दोन शब्द स्पष्टपणे ऐकायला येतात, पुढे काय आहे, हे मला तरी समजले नव्हते. तर, ‘एजंट विनोद’ या चित्रपटातील
‘बंगले के पीछे है ताला, घुसूँ कहाँ से मैं साला
लैला की खिड़की खुली है, खिड़की के नीचे है नाला..’
या गाण्याची काही टोटलच लागत नाही. पण तरीही ती ऐकली जातात. ‘र’ला ‘र’ अन् ‘ट’ला ‘ट’ जोडून केलेली ही गाणी आहेत. ही गाणी शांतपणे ऐकण्यासाठी नसून पार्टी साँग म्हणता येतील.
पण काही गाणी अशी आहेत की, ऐकताना पटकन लक्षात येत नाही. नंतर समजते. मागे एकदा ‘झी मराठी’वर ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात अभिनेते संजय मोने आले होते. त्यात त्यांनी एक मजेशीर प्रश्न उपस्थित केला होता. ‘झुक झुक झुक आगीन गाडी..’ या गाण्यात ‘मामाची बायको सुगरण, रोज-रोज पोळी शिकरण..’ अशा ओळी आहेत. पण रोज शिकरण करणारी मामी, सुगरण कशी? असा सवाल संजय मोने यांनी केला होता. अर्थात, ते बालगीत असल्याने त्यात तर्क शोधण्यात काहीही अर्थ नाही… असंच सुरू आहे.
काल बदलला, भावना बदलल्या
अनेक वर्षापासून माझ्या मनात असलेल्या गाण्यासंदर्भातील काही गोष्टींनी पुन्हा एकदा डोकं वर काढले. ‘हिमालय की गोद में’ (1965) चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले ‘एक तू ना मिला, सारी दुनिया मिली भी तो क्या है…’ हे गाणं कानावर पडलं तर, त्यातला गोडवा आजही मनाला भावून जातो. त्यावेळी सर्वोत्कृष्ट गीतकार आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका हे दोन्ही फिल्मफेअर पुरस्कार या गाण्याने पटकावले होते. त्यानंतर 1980मध्ये झळकलेल्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील नायिका म्हणते ‘आप जैसा कोई मेरे जिंदगी में आये, तो बात बन जाये…’! म्हणजेच, 15 वर्षांत ‘तूच माझे सर्वस्व’वरून ‘फक्त तूच नव्हे तर, तुझ्यासारखा कुणीही…’पर्यंत भावना पोहोचली होती.
हेही वाचा – गुजरा हुआ जमाना…
हीच गोष्ट अभिनेता शम्मी कपूरच्या ‘चायना टाऊन’ची (1962). त्यातील ‘बार बार देखो हजार बार देखो, देखने की चीज है हमारा दिलरुबा..’ हे गाणं सुपरहिट झालं. पण 1981मध्ये प्रदर्शित ‘कुदरत’ या चित्रपटातील ‘हमें तुमसे प्यार कितना..’ या गाण्यानं पिढीतील भावनिक बदल अधोरेखित केले आहेत. (आता ‘व्हॅलेंटाइन डे’ला ‘कुदरत’मधील गाणे जास्त सुपरहिट ठरते.) या गाण्यात ‘तुम्हें कोई और देखे तो, जलता है दिल..’ अशा ओळी आहेत. म्हणजेच आपली ‘दिलरुबा’ सर्वांनी पहावी, ही भावना 20 वर्षांत संकुचित होऊन ‘तिला’ कुणीही पाहू नये, अशी झाली आहे.
सन 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दो रास्ते’ या चित्रपटातील ‘छुप गए सारे नजारे…’ या गाण्यात दोन ओळीतच ऋतू बदलल्याचे दिसते. त्या ओळी अशा आहेत –
अम्बुआ की डाली पे गाए मतवाली
कोयलिया काली निराली…
सावन आने का कुछ, मतलब होगा
बादल छाने का कोई, सबब होगा…
दस्तुरखुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांनी ‘अमर अकबर अँथनी’ चित्रपटातील शीर्षक गीताबद्दल सांगितलं होतं. या शीर्षक गीतात आम्ही तिघेही आम्ही कोण आहेत हे सांगतो, तरीही तिथे असलेल्या तमाम खलनायक मंडळींपैकी कोणाच्याही ते लक्षात येत नाही! हे कसे शक्य आहे? चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक मनमनोहन देसाई यांना याबद्दल विचारले असता, त्यांनी अगदी छातीठोकपणे सांगितलं की, तरीही हे गाणं हिट होईल!
एकूणच, हे शब्दांचे खेळ आहेत की, मनातील भावना किंवा गीतकाराची प्रतिभा… काहीही असू शकते. अर्थातच, शब्दच्छल असलेली गाणी फारच मोजकी आहेत. पण गीतकाराची प्रतिभा दर्शविणारी अनेक गाणी (बहुतांश जुनी) आहेत. एकच उदाहरण देता येईल, ‘तेरे घर के सामने’ या चित्रपटाच्या शीर्षक गीताचं. त्यातील अखेरच्या कडव्यातील ओळी आहेत –
उल्फत में ताज़ छूटे, ये भी तुम्हें याद होगा
उल्फत में ताज़ बने, ये भी तुम्हें याद होगा
मैं भी कुछ बनाऊंगा, तेरे घर के सामने…
वाचा – असंच काहीसं आवडलेलं…