डॉ. किशोर महाबळ
प्रत्येक बालक अगदी लहान वयापासून, शक्य ते ते स्वतःहून शिकण्याचा प्रयत्न करते. त्याचे आई-वडील सुशिक्षित तसेच पालक म्हणून जबाबदारी ओळखणारे असले तर त्या बालकाचे शिक्षण अधिक चांगले आणि लवकर होते. अतिशय सोप्या पद्धतीने, रंजकतेने हसतखेळत शिकविल्यामुळे शिकलेल्या बाबी बालकाच्या दीर्घकाळ स्मरणात राहतात, हे जसे खरे तसेच शिकण्याचा प्रयत्न करणाऱ्या बालकाला, पालकांनी सातत्याने योग्य वेळी आणि योग्य त्या पद्धतीने प्रोत्साहन दिल्यामुळेही हे शक्य झालेले असते. बालकाला शिकविलेली एखादी कृती, मूळाक्षरे, पशूपक्षी तसेच वस्तूंची माहिती बालकाने नीट आत्मसात केली आहे, हे पालकांच्या – आजी-आजोबा, बहीण-भाऊ यांच्याबरोबरच बालवाडीतील शिक्षिका इत्यादींच्या जेव्हा लक्षात येते, तेव्हा सहसा त्या बालकाचे टाळ्या वाजवून, खाऊ देऊन आणि लाड करून भरपूर कौतुक केले जाते. या कौतुकामुळे बालकाला शिकण्यात आनंद वाटू लागतो. या अशा प्रोत्साहनामुळेच न पडता चालणे, धावणे, शब्द उच्चारणे, वाक्य बोलण्याचा प्रयत्न करणे, स्वच्छ राहणे, गाणे म्हणणे यासारख्या त्या लहान वयात कठीण असलेल्या गोष्टीही बालक अधिक उत्साहाने शिकण्याचा प्रयत्न करते. कौतुकाच्या अपेक्षेने बालक, मोठी माणसे जे जे शिकवतील ते ते, कठीण असले तरीही, शिकण्याचा आवर्जून प्रयत्न करते.
मात्र, हे मूल जसजसे मोठे होऊ लागते, मोठ्या शाळेत जाऊ लागते… दरवर्षी वरच्या वर्गात जाते, तसतसे त्याला शिक्षणात प्रोत्साहन देण्यापेक्षा त्याच्याकडून अनेकदा अवास्तव अपेक्षा करण्यास पालक आणि शिक्षक सुरुवात करतात. यामुळेच मग त्याच्या वयाला न झेपणारे विषय, भाषा, कला त्याला शिकविण्याचा प्रयत्न सुरू होतो. मातृभाषेपेक्षा इंग्रजीसारखी पूर्णतः नवी भाषा शिकण्यास त्याला भाग पाडले जाते. अशी नवी भाषाही त्याला लवकरात लवकर उत्तमरित्या आलीच पाहिजे, अशी अपेक्षा केली जाते. त्याने वर्गात पहिले यावे, सर्व विषयांत, मुख्यत: विज्ञान आणि गणितात जास्तीतजास्त गुण मिळवायलाच हवेत, असे दडपण निर्माण केले जाते. त्यासाठी कारण नसताना शिकवणी वर्गही लावले जातात. सर्व विषय सारखेच महत्त्वाचे असतात, याकडे दुर्लक्ष केले जाते. काही ठराविक विषयांना अधिक महत्त्व दिले जाते.
हेही वाचा – शाळांमध्ये पाहिजे माहिती संकलन प्रकल्प
शिक्षणाबद्दल, शैक्षणिक मानसशास्त्र, बालमानसशास्त्र या विषयांचा काहीही अभ्यास न केलेले पालक आपल्या मुलाच्या शिक्षणाबद्दल आपल्यालाच सर्व काही कळते, असे मानू लागतात. या विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही. बालकाला न आवडणारे, पण महत्त्वाचे मूलभूत विषय त्याला आवडावेत यासाठी काही प्रयत्न करण्याऐवजी ते विषय जबरदस्तीने शिकविण्याचा आग्रह केला जातो. तुला हे सर्व शिकावेच लागेल, खूप गुण मिळवावेच लागतील, आजूबाजूला सतत स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेत तुला यशस्वी झालेच पाहिजे, याची त्याला सतत जाणीव करून दिली जाते. तू जर गणित आणि विज्ञानात जास्त गुण मिळविले नाहीस, तर तुला या आधुनिक जगात यशस्वी होता येणार नाही, हेही वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले जाते. गणित आणि विज्ञानात प्राविण्य न मिळाल्यास यशस्वी जीवन जगता येणार नाही, हेही सुचविले जाते.
अभ्यासासाठी मुलावर जबरदस्ती करावीच लागते, हेही पालक आणि शिक्षक मानू लागतात. कसेही करून त्याने शिकलेच पाहिजे, सर्व विषयांत प्राविण्य मिळवलेच पाहिजे. सर्वच विषयांत इतर विद्यार्थ्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळवलेच पाहिजेत, असा हट्टाग्रह धरला जातो. हे आजकाल अगदी प्राथमिक वर्गांपासून सुरू होते आणि शालांत परीक्षेपर्यंत म्हणजे जवळजवळ पुढील दहा वर्षे सुरूच राहते…
जसजशी मुले मोठी होत जातात, तसतशा पालकांच्या अपेक्षा वाढतच जातात. अनेकदा अशक्यप्राय अशा अपेक्षा असतात. गणित आणि विज्ञान विषयांत कमी गुण मिळणे पालकांना फारच कमीपणाचे वाटते. त्यांच्या दृष्टीने या विषयांत कमी गुण मिळणे म्हणजे जीवनातील सर्वात मोठी आपत्ती आणि आयुष्यभरातील अपयशाची नांदीच असते. त्यामुळे या विषयांत अपेक्षित गुण मिळालेच पाहिजेत, या अपेक्षांसारख्या असंख्य अपेक्षा पूर्ण न झाल्यास, किंवा त्या पूर्ण करण्यात त्याला थोडेही अपयश आल्यास त्यामागील कारणे शोधण्याऐवजी त्याच्यावर अभ्यासाची जबरदस्ती करणे सुरू होते. त्याच्यावर अनेकदा कडवट टीका करणे, रागावणे, संतापणे, घालून पाडून बोलणे यापासून ते कठोर शारीरिक शिक्षा करण्यापर्यंत सर्व पद्धतींचा पालक वापर करू लागतात. हे करताना त्यांना आपण काही चूक करीत आहोत, असे मुळीच वाटत नाही. त्याच्या उणिवा, दोष, अध्ययन अक्षमता, अध्ययनविषयक समस्यांची भरपूर चर्चा होऊ लागते. मुलाला काय येत नाही याचीच पालक नातेवाईक आणि शिक्षक वारंवार दखल घेऊ लागतात. यामुळे असा विद्यार्थी आपल्याला काय येते, यापेक्षा काय येत नाही, याचाच विचार करू लागतो.
त्याचे दोषच इतक्यांदा दाखविले जातात की, तो नकारात्मक विचार करायला लागतो. अपेक्षांचे ओझे पेलता येत नाही, त्या पूर्ण करता येत नाहीत… यामुळे तो ताणतणाव व मानसिक अस्वास्थ्याचा शिकार होतो. योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन झाले नाही तसेच या ताणतणावाचा सकारात्मक पद्धतीने सामना करता आला नाही तर, मग हे मानसिक अस्वास्थ्य व्यसने, हिंसक, आक्रमक, अयोग्य वर्तनातून व्यक्त होऊ लागते. या अस्वास्थ्याचा त्याच्या अध्ययनावर, मानसिकतेवर, जाणीवांवर, व्यक्तिमत्त्वावर, प्रकृतीवर अतिशय दूरगामी स्वरूपाचा हानीकारक परिणाम होतो. नकारात्मक टीकाटिप्पणीमुळे क्वचितच फायदा होतो. बहुतेकदा त्यामुळे नुकसानच जास्त होते, हे पालकांना तसेच शिक्षकांना समजावून सांगण्याची गरज आहे.
मुलाची बौद्धिक क्षमता, कल, वय, छंद, त्याच्यात प्राधान्याने आढळणारी गुणवत्ता, आवड, निसर्गदत्त क्षमता, काय काय शिकायला आवडतंय आणि शिकावेसे वाटते आहे, कोणत्या विषयांत चांगले गुण मिळताहेत, कोणता विषय मन लावून आवडीने शिकतोय, शारीरिक जडणघडण आणि क्षमता, मानसिक भूमिका, झालेली बौद्धिक प्रगती, आवडीच्या कला आणि खेळ, मिळालेले यश अशा सर्व सकारात्मक बाबींचा विचार करूनच बालपणापासून मार्गदर्शन करायला हवे आणि प्रोत्साहन द्यायला हवे. नेमके तेच होताना दिसत नाही. अशा प्रकारच्या सकारात्मक प्रोत्साहनाची घराघरात तसेच शाळा शाळांत वानवा आहे.
विविध विषयांतील उद्बोधक माहिती, संकल्पना, विचार, जाणून घेण्यामुळे, उत्तम साहित्याचे वाचन केल्यामुळे, संगीतादी कला शिकण्यामुळे, खुल्या मैदानात विविध प्रकारचे खेळ खेळण्यामुळे आणि विविध प्रयोग करून विज्ञानाचे ज्ञान प्राप्त करण्यामुळे मिळणारा आनंद, ज्ञान यांना हे विद्यार्थी वंचित होतात आणि पालकांच्या हट्टाग्रहामुळे केवळ जास्तीतजास्त गुण मिळण्याच्या एकमेव उद्देशाने परीक्षेपुरता अभ्यास करणारे परीक्षार्थी होतात. शालांत परीक्षेतील गुणांवर चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे अवलंबून असल्याने शालांत परीक्षेत जास्त गुण मिळविण्यास महत्त्व दिले जाणे, हे समजू शकते. पण नववीपर्यंत तरी गुणांपेक्षा ज्ञानग्रहणाला जास्त महत्त्व द्यायला हवे. त्यासाठी प्रोत्साहनही द्यायला हवे.
हेही वाचा – सर्व विद्यार्थ्यांना निसर्गाचा अभ्यास करू द्या!
मात्र, या बाबीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते. आपल्या मुलाला अभ्यासक्रमातील सर्व विषय, त्या विषयांतील महत्त्वाच्या संकल्पना, उदाहरणे किती प्रमाणात समजत आहेत, काय समजत नाही, विषयातील कोणता भाग त्याने पुन्हा नीट शिकण्याची गरज आहे, अशा अभ्यासविषयक सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे. लक्षात आलेल्या उणिवांमुळे न रागावता, शिक्षा न करता विषयांच्या आकलनातील त्रुटी दूर व्हाव्यात म्हणून योग्य ते मार्गदर्शन करणे, प्रयत्न केल्यास यशस्वी होशील, हे सांगून त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यास महत्त्व दिले गेले पाहिजे. प्रोत्साहन देणे म्हणजे खोटी स्तुती करणे नव्हे तर, विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वातील सकारात्मक बाबींकडे त्याचे लक्ष वेधणे… या सकारात्मक बाबींच्या विकासासाठी अधिक प्रयत्न करण्यास त्याला प्रेरणा देणे, त्याच्यासमोर तो साध्य करू शकेल, अशी छोटी उद्दिष्टे ठेवणे होय. ती साध्य करण्यासाठी त्याला प्रेरणा देणे तसेच आवश्यक तेवढीच मदत करणे म्हणजे योग्य प्रोत्साहन देणे होय. असे प्रोत्साहनपर वातावरण घराघरात निर्माण होणे, ही आजची नितांत गरज आहे.


