वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय दुसरा
तो तूं कीं आजि एथें । सांडुनिया वीरवृत्तीतें । अधोमुख रुदनातें । करितु आहासी ॥12॥ विचारीं तूं अर्जुनु । कीं कारुण्यें कीजसी दीनु । सांग पां अंधकारें भानु । ग्रासिला आथी ॥13॥ ना तरी पवनु मेघासी बिहे । कीं अमृतासी मरण आहे । पाहें पां इंधनचि गिळोनि जाये । पावकातें ॥14॥ कीं लवणेंचि जळ विरे । संसर्गें काळकूट मरे । सांग महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी ॥15॥ सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथी कां जाहला ।
परी तो त्वां साच केला । आजि एथ ॥16॥ म्हणोनि अझुनि अर्जुना । झणें चित्त देसी या हीना । वेगीं धीर करूनियां मना । सावधान होईं ॥17॥ सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण । संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझे ॥18॥ हां गा तू जाणता । तरी न विचारिसी कां आता । सांगे झुंजावेळें सदयता । उचित कायी ॥19॥ हे असतिये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु । म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥20॥
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत् त्वय्युपपद्यते । क्षुद्रं ह्रदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परतप ॥3॥
म्हणोनि शोक न करीं । तूं पुरता धीरु धरीं । हे शोच्यता अव्हेरीं । पंडुकुमरा ॥21॥ तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडलें बहुत । तूं अझुनिवरी हित । विचारी पां ॥22॥ येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळुपण नुपकरे । हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज ॥23॥ तूं आधींचि काय नेणसी । कीं हे गोत्र नोळखसी । वायांचि काय करिसी । अतिशो आतां ॥24॥ आजिंचे हें झुंज । काय जन्मा नवल तुज । हें परस्परें तुम्हां व्याज । सदाचि आथी ॥25॥ तरी आतां काय जाहलें । कायि स्नेह उपनलें । हें नेणिजे परि कुडें केले । अर्जुना तुवां ॥26॥ मोह धरिलिया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल । आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी ॥27॥ हृदयाचे ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण । हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसी ॥28॥ ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु । हे ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ॥29॥
हेही वाचा – Dnyaneshwari : मग धनुष्यबाण सांडिले । न धरत अश्रुपात आले…
अर्थ
तोच तू (अर्जुन), आज या वेळी आपली वीरवृत्ती टाकून, खाली मान घालून रडत आहेस. ॥12॥ विचार कर. तू अर्जुन आणि करुणेने तुला दीन करून सोडावे! सांग बरे, अंधकार सूर्याला कधी ग्रासील काय? ॥13॥ अथवा वारा मेघाला कधी भ्याला आहे का? किंवा अमृताला मरण आहे का? अरे विचार कर. लाकडूच अग्नीला गिळून टाकील का? ॥14॥ किंवा मिठाने पाणी विरेल का? दुसऱ्याच्या संसर्गाने कालकूट मरेल काय? सांग बरे, बेडूक महासर्पाला गिळील का? ॥15॥ कोल्हा सिंहाबरोबर झोंबी (लढाई) करील काय? असे अघटित कधी घडले आहे काय? पण तो अघटित प्रकार तू (मात्र) आज येथे खरा करून दाखविलास. ॥16॥ म्हणून, अर्जुना, अजून तरी या अनुचित गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस; तू लवकर आपल्या मनाला खंबीर करून सावध हो. ॥17॥ हा मूर्खपणा सोडून दे. ऊठ, धनुष्यबाण हाती घे, युद्धाच्या वेळी ही कोण करूणा तुझी? ॥18॥ अरे, तू जर चांगला जाणता आहेस; तर मग आता विचार करून का पाहात नाहीस? युद्धच्या वेळी कारुण्य उचित आहे काय? बोल. ॥19॥ जगन्निवास (पुढे) अर्जुनाला म्हणाला, (या वेळची तुझी दया) ही (तुझ्या) असलेल्या कीर्तीचा नाश करणारी आणि परलोकाला मुकवणारी आहे. ॥20॥
हे पार्था, हा दुबळेपणाला प्राप्त होऊ नकोस; हा तुला शोभत नाही. असा हृदयाचा क्षुद्र ढिलेपणा टाकून देऊन, हे अर्जुना, (युद्धाला) उठ. ॥3॥
म्हणून शोक करू नकोस; तू पुरता धीर धर; अर्जुना, हा खेद टाकून दे. ॥21॥ तुला हे योग्य नाही. (आजपर्यंत) जे काय पुष्कळ (यश वगैरे) तू जोडले आहेस, त्याचा यामुळे नाश होईल. तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर. ॥22॥ लढाईच्या या ऐन प्रसंगी कृपाळूपणा कामाचा नाही. हे तुझे आताच का सोयरे झाले आहेत? ॥23॥ यापूर्वीच तू हे जाणत नव्हतास का ? किंवा, या भाऊबंदांची ओळख तुला नव्हती का? आताच (त्यांच्याबद्दल) विनाकारण हा फाजील कळवळा का? ॥24॥ आजचे हे युद्ध तुला जन्मात नवीन का आहे? तुम्हा एकमेकांना लढावयास निमित्त हे नेहेमीचेच आहे. ॥25॥ मग आताच काय झाले ? ही ममता कोठून उत्पन्न झाली, हे मला काहीच कळत नाही; पण अर्जुना, वाईट केलेस तू. ॥26॥ अशी ममता धरल्यास असे होईल की, असलेला मोठेपणा जाईल आणि तू इहलोकासह परलोकास अंतरशील. ॥27॥ या वेळी अंत:करणाचा ढिलेपणा हा काही चांगले होण्याला कारण होणार नाही; लढाईत ढिलेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती असते, हे लक्षात ठेव. ॥28॥ याप्रमाणे त्या कृपाळू श्रीकृष्णाने अनेक प्रकारांनी अर्जुनाला बोध केला. तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला? ॥29॥
हेही वाचा – Dnyaneshwari : शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो…