वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय तिसरा
ना तरी झकवीतु आहासी मातें । की तत्वचि कथिलें ध्वनितें । हे अवगमतां निरुतें । जाणवेना ॥16॥ म्हणोनि आइकें देवा । हा भावार्थु आतां न बोलावा । मज विवेकु सांगावा । मर्हाटा जी ॥17॥ मी अत्यंत जड असें । परी ऐसाही निकें परियसें । कृष्णा बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ ॥18॥ देखें रोगातें जिणावें । औषध तरी देयावें । परी तें अतिरुच्य व्हावें । मधुर जैसें ॥19॥ तैसें सकळार्थभरित । तत्व सांगावें उचित । परी बोधे माझें चित्त । जयापरी ॥20॥ देवा तुजऐसा निजगुरु । आणि आर्तीधणी कां न करूं । एथ भीड कवणाची धरूं । तूं माय आमुची ॥21॥ हां गा कामधेनूचें दुभतें । देवें जाहलें जरी आपैतें । तरी कामनेची कां तेथें । वानी कीजे ॥22॥ जरी चिंतामणि हातां चढे । तरी वांछेचें कवण सांकडे । कां आपुलेनि सुरवाडें । इच्छावें ना ॥23॥ देखें अमृतसिंधूतें ठाकावें । मग तहाना जरी फुटावें । मग सायासु कां करावे । मागील ते ॥24॥ तैसा जन्मांतरीं बहुतीं । उपासितां लक्ष्मीपती । तूं दैवें आजि हातीं । जाहलासी जरी ॥25॥ तरी आपुलेया सवेसा । कां न मगावासि परेशा । देवा सुकाळु हा मानसा । पाहला असे ॥26॥ देखें सकळार्तीचें जियालें । आजि पुण्य यशासि आलें । हे मनोरथ जहाले । विजयी माझे ॥27॥ जी जी परममंगळधामा । देवदेवोत्तमा । तूं स्वाधीन आजि आम्हां । म्हणऊनियां ॥28॥
हेही वाचा – Dnyaneshwari : देवा तुवांचि ऐसें बोलावें, तरी आम्हीं नेणतीं काय करावें…
अर्थ
तू आम्हाला फसवीत आहेस किंवा गूढार्थाने तत्वज्ञानच सांगितले आहेस, हे विचार करून पाहिले तरी निश्चित असे काहीच समजत नाही. ॥16॥ एवढ्याकरिता देवा, ऐक. हा उपदेश असा गूढार्थाने सांगू नकोस. महाराज, मला तो विचार माझ्या भाषेत, मला समजेल असा सोपा करून सांगावा. ॥17॥ मी अतिशय मंद आहे. परंतु कृष्णा, अशाही (स्थितीत) मला चांगले समजेल, असे एक निश्चयात्मक सांग. ॥18॥ हे पाहा, रोग हटवण्याकरिता औषध तर द्यावे, पण ते औषध ज्याप्रमाणे अतिशय रुचकर आणि गोड असावे ॥19॥ त्याप्रमाणे सर्वार्थाने भरलेले योग्य तत्व तर सांगावे, पण ते असे सांगावे की, जेणेकरून ते माझ्या मनाला नि:संशय कळेल ॥20॥ देवा, तुझ्यासारखा आज गुरू मिळाला आहे, तेव्हा आज मी आपल्या इच्छेची तृप्ती का करून घेऊ नये? तू आमची आई आहेस (तर मग) येथे भीड कोणाची धरावयची? ॥21॥ अहो, दैववशात कामधेनूचे दुभते जर प्राप्त झाले तर, तशा प्रसंगी हवे ते मागण्यास कमी का करावे? ॥22॥ चिंतामणी जर हाताला आला तर मग हवी ती वस्तू मागण्याची अडचण का वाटावी? आपल्याला हवी तशी इच्छा का करू नये ? ॥23॥ पाहा, अमृताच्या समुद्राजवळ प्राप्त होऊन तेथे तहानेने जर तडफडत रहावयाचे, तर मग तेथेपर्यंत येण्याकरिता श्रम कशाकरिता करावयाचे? ॥24॥ त्याप्रमाणे श्रीकृष्णा, अनेक जन्मी तुझी सेवा केल्यामुळे, तू आज दैववशात जर हातात आला आहेस ॥25॥ तर मग हे परमेश्वरा, आपल्या इच्छेला येईल तसे तुजजवळून का मागून घेऊ नये? देवा, माझ्या मनातील हेतू पूर्ण सफल होण्याची ही वेळ आली आहे. ॥26॥ पाहा, माझ्या सर्व मनोरथांचे जीवित सफल झाले. आज माझे पूर्व पुण्य यशस्वी झाले आणि माझ्या मनातील हेतू आज तडीस गेले. ॥27॥ कारण अहो महाराज, सर्वोत्कृष्ट मंगलाचे स्थान आणि (सर्व) देवांत श्रेष्ठ अशा देवा, तू आमच्या ताब्यात आला आहेस, म्हणून ॥28॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : हे ब्रह्मस्थिती निःसीम, जे अनुभवितां निष्काम…