वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय तिसरा
हें चैतन्याचे शेजारीं । वसती ज्ञानाचां एका हारीं । म्हणोनि प्रवर्तले महामारी । सांवरती ना ॥256॥ हें जळेंवीण बुडविती । आगीवीण जाळिती । न बोलता कवळिती । प्राणियांतें ॥257॥ हे शस्त्रेंवीण साधिती । दोरेंवीण बांधिती । ज्ञानियासी तरी वधिती । पैज घेउनि ॥258॥ चिखलेंवीण रोंविती । पाशिकेंवीण गोंविती । हे कवणाजोगे न होती । आंतौटेपणें ॥259॥
धूमेनाऽव्रियते वन्हिर्यथादर्शो मलेन च । येथोल्बेनावृत्तो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥38॥
जैसी चंदनाची मुळी । गिंवसोनी घेपे व्याळीं । ना तरी उल्बाची खोळी । गर्भस्थासी ॥260॥ कां प्रभावीण भानु । धूमेंवीण हुताशनु । जैसा दर्पण मळहीनु । कहींच नसे ॥261॥ तैसें इहींवीण एकलें । आम्हीं ज्ञान नाहीं देखिलें । जैसें कोंडेनि पां गुंतलें । बीज निपजे ॥262॥
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा । कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणातलेन च ॥39॥
तैसें ज्ञान तरी शुद्ध । परी इहीं असे प्ररुद्ध । म्हणोनि तें अगाध । होऊनि ठेलें ॥263॥ आधी यातें जिणावें । मग तें ज्ञान पावावें । तंव पराभवो न संभवे । रागद्वेषां ॥264॥ यांतें साधावयालागीं । जें बळ जाणिजे आंगीं । तें इंधन जैसें आगी । सावावो होय ॥265॥
हेही वाचा – Dnyaneshwari : या स्वधर्मातें अनुष्ठितां, वेचु होईल जीविता…
अर्थ
हे कामक्रोध जीवात्म्याच्या जवळ असतात आणि वृत्तिज्ञानाच्या पंक्तीला राहातात, म्हणून हे हल्ला करावयास उसळले म्हणजे आटोपत नाहीत. ॥256॥ हे पाण्यावाचून बुडवितात, अग्नीवाचून जाळतात आणि प्राण्यांना गुपचूप घेरतात. ॥257॥ हे शस्त्रावाचून ठार करतात, दोरावाचून बांधतात आणि ज्ञान्यांना तर प्रतिज्ञापूर्वक ठार करतात. ॥258॥ हे चिखलावाचून रोवतात आणि जाळ्यावाचून अडकवितात, हे फार आत असल्यामुळे कोणालाही आटोक्यात येत नाही. ॥259॥
ज्याप्रमाणे धुराने अग्नी, मळाने आरसा आणि वेष्टनाने गर्भ आच्छादिलेला, त्याप्रमाणे याने (कामाने) हे (ज्ञान) आच्छदिले आहे. ॥38॥
जसे चंदनाच्या मुळीला साप वेढे घालून बसतात, किंवा पोटात असणार्या गर्भाला वेष्टनाची गवसणी असते ॥260॥ अथवा प्रकाशावाचून सूर्य, धुरावाचून अग्नी किंवा मळाशिवाय आरसा कधीच नसतो ॥261॥ तसे या कामक्रोधांशिवाय एकटे असलेले ज्ञान आमच्या नजरेला आले नाही. ज्याप्रमाणे बी कोंड्यासकट उत्पन्न होते ॥262 ॥
हे अर्जुना, ज्ञानी पुरुषांचा नित्य वैरी, ज्याची पूर्तता होणे कठीण आहे, असा जो कामरूपी अग्नी, त्याने ज्ञान आच्छादिले आहे. ॥39॥
तसे ज्ञान स्वभावत: जरी निर्लेप आहे, परंतु ते या कामक्रोधांकडून पूर्ण आच्छादिलेले असते. म्हणून ते प्राप्त होण्याला कठीण होऊन राहिले आहे. ॥263॥ अगोदर यांना जिंकावे आणि मग ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी. परंतु या कामक्रोधांचा तर पराभव होऊ शकत नाही. ॥264॥ उलट यांचा नाश करण्याकरिता जेवढे सामर्थ्य अंगात आणावे, तेवढे अग्नीला ज्याप्रमाणे सरपण (अधिक प्रज्ज्वलित करण्यास कारण,) त्याप्रमाणे त्यांनाच उलट सहाय्य करणारे होते. ॥265॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरांचे वाघ…


