वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय तिसरा
जैसें मातेचां ठायीं । अपत्या अनवसरु नाहीं । स्तन्यालागूनि पाहीं । जियापरी ॥29॥ तैसें देवा तूतें । पुसिजतसें आवडे तें । आपुलेनि आर्तें । कृपानिधि ॥30॥ तरी पारत्रिकीं हित । आणि आचरितां तरी उचित । तें सांगें एक निश्चित । पार्थु म्हणे ॥31॥
श्रीभगवानुवाच : लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयाऽनघ । ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ॥3॥
या बोला अच्युतु । म्हणतसे विस्मितु । अर्जुना हा ध्वनितु । अभिप्रावो ॥32॥ जे बुद्धियोगु सांगतां । सांख्यमतसंस्था । प्रकटिली स्वभावता । प्रसंगे आम्हीं ॥33॥ तो उद्देशु तूं नेणसीचि । म्हणोनि क्षोभलासि वायांचि । तरी आता जाण म्यांचि । उक्त दोन्ही ॥34॥ अवधारीं वीरश्रेष्ठा । ये लोकीं या दोन्ही निष्ठा । मजचिपासूनि प्रगटा । अनादिसिद्धा ॥35॥ एकु ज्ञानयोगु म्हणिजे । जो सांख्यीं अनुष्ठिजे । जेथ ओळखीसवें पाविजे । तद्रूपता ॥36॥ एक कर्मयोगु जाण । जेथ साधकजन निपुण । होवूनिया निर्वाण । पावती वेळे ॥37॥ हे मार्गु तरी दोनी । परि एकवटती निदानीं । जैसीं सिद्धसाध्यभोजनीं । तृप्ति एकी ॥38॥ कां पूर्वापर सरिता । भिन्ना दिसती पाहतां । मग सिंधूमिळणीं ऐक्यता । पावती शेखीं ॥39॥ तैसीं दोनी ये मतें । सूचिती एका कारणातें । परी उपास्ति ते योग्यते – । आधीन असे ॥40॥
हेही वाचा – Dnyaneshwari : देवा तुवांचि ऐसें बोलावें, तरी आम्हीं नेणतीं काय करावें…
अर्थ
पाहा, जसे लहान मुलाला स्तनपान करण्यास आईच्या ठिकाणी वेळ-अवेळ अशी काहीच नसते, ॥29॥ तसे हे कृपानिधी देवा, मी आपल्या इच्छेला येईल त्याप्रमाणे तुला वाटेल ते विचारीत आहे. ॥30॥ तर मग परलोकी कल्याणकारक आणि (इहलोकी) आचरण्याला तर योग्य असे जे असेल ते एक मला निश्चित करून सांग, असे अर्जुन म्हणाला ॥31॥
श्रीकृष्ण म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, मी या लोकांमध्ये ज्ञानयोगाने सांख्याचा आणि कर्मयोगाने कर्म करणारांचा, असे दोन मार्ग (वर्तनक्रम) पूर्वी सांगितले आहेत. ॥3॥
अर्जुनाच्या या भाषणाने श्रीकृष्ण आश्चर्यचकित होऊन म्हणू लागले, अर्जुना, आम्ही तुला हा थोडक्यात मतलब सांगितला. ॥32॥ कारण की, निष्काम कर्मयोग सांगत असताना प्रसंगाने सहजच आम्ही ज्ञानमार्गाची व्यवस्था (ज्या हेतूने) स्पष्ट केली ॥33॥ तो आमच्या प्रतिपादनाचा हेतू तू जाणलाच नाहीस, म्हणून उगीच रागावला आहेस. तर आता ध्यानात ठेव की, हे दोनही मार्ग मीच सांगितलेले आहेत. ॥34॥ हे वीरश्रेष्ठा अर्जुना ऐक, या लोकांमध्ये हे दोन्ही मार्ग माझ्यापासून प्रकट झालेले आहेत आणि ते मुळापासून तसेच चालत आलेले आहेत. ॥35॥ त्यापैकी एकाला ज्ञानयोग म्हणतात; त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात आणि त्यात ओळखीबरोबर परमात्मस्वरुपाशी तन्मयता प्राप्त होते. ॥36॥ दुसरा तो कर्ममार्ग समज, जेथे साधक लोक निष्णात होऊन परमगतीला पावतात, (परंतु) ते काही काळाने पावतात. ॥37॥ हे मार्ग तर दोन आहेत, परंतु ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात. ज्याप्रमाणे तयार असलेल्या आणि तयार करावयाच्या अशा दोन्ही जेवणात सारखीच तृप्ती असते. ॥38॥ किंवा पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून वाहणार्या नद्या पाहिल्या तर वाहताना वेगवेगळ्या दिसतात. मग समुद्रात मिळाल्या असता शेवटी एकच होतात. ॥39॥ त्याप्रमाणे ज्ञानयोग आणि कर्मयोग हे मार्ग जरी दोन आहेत, तरी ते एकाच साध्याला सुचवितात. परंतु त्यांचे आचरण, करणाऱ्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे.॥40॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : देवा तुजऐसा निजगुरु, आणि आर्तीधणी कां न करूं