वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय तिसरा
सदृश्यं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि । प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥33॥
म्हणोनि इंद्रियें एकें । जाणतेनि पुरुखें । लाळावीं ना कौतुकें । आदिकरुनि ॥202॥ हां गा सर्पेंसी खेळों येईल । कीं व्याघ्रसंसर्ग सिद्धी जाईल । सांगें हाळाहाळ जिरेल । सेविलिया काई ॥203॥ देखें खेळतां अग्नि लागला । मग तो न सांवरे जैसा उधवला । तैसा इंद्रियां लळा दिधला । भला नोहे ॥204॥ एर्हवीं तरी अर्जुना । या शरीरा पराधीना । कां नाना भोगरचना । मेळवावी ॥205॥ आपण सायासेंकरूनि बहुतें । सकळहि समृद्धिजातें । उदोअस्तु या देहातें । प्रतिपाळावें कां ॥206॥ सर्वस्वें शिणोनि एथें । अर्जवावीं संपत्तिजातें । तेणें स्वधर्मु सांडुनी देहातें । पोखावें काई ॥207॥ मग हें तंव पांचमेळावा । शेखीं अनुसरेल पंचत्वा । ते वेळीं केला कें गिंवसावा । शीणु आपुला ॥208॥ म्हणूनि केवळ देहभरण । ते जाणें उघडी नागवण । यालागीं एथ अंतःकरण । देयावेंना ॥209॥
इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ । तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥34॥
एर्हवीं इंद्रियाचियां अर्था – । सारिखा विषयो पोखितां । संतोषु कीर चित्ता । आपजेल ॥210॥ परी तो संवचोराचा सांगातु । जैसा नावेक स्वस्थु । जंव नगराचा प्रांतु । सांडिजेना ॥211॥ बापा विषाची मधुरता । झणें आवडी उपजे चित्ता । परी तो परिणाम विचारितां । प्राणु हरी ॥212॥ देखें इंद्रियीं कामु असे । तो लावी सुखदुराशे । जैसा गळीं मीनु आमिषें । भुलविजे गा ॥213॥ परी तयामाजि गळु आहे । जो प्राणातें घेऊनि जाये । तो जैसा ठाउवा नोहे । झांकलेपणें ॥ 214॥ तैसें अभिलाषें येणें कीजेल । जरी विषयाची आशा धरिजेल । तरी वरपडा होईजेल । क्रोधानळा ॥215॥ जैसा कवळोनियां पारधी । घातेचिये संधी । आणि मृगातें बुद्धीं । साधावया ॥216॥ एथ तैसीची परी आहे । म्हणूनि संगु हा तुज नोहे । पार्था दोन्ही कामक्रोध हे । घातुक जाणें ॥217॥ म्हणऊनि हा आश्रयोचि न करावा । मनींही आठवो न धरावा । एकु निजवृत्तीचा वोलावा । नासों नेदीं ॥218॥
हेही वाचा – Dnyaneshwari : देखें पुढिलाचें वोझें, जरी आपुला माथां घेईजे…
अर्थ
ज्ञानी सुद्धा आपल्या प्रकृतीस अनुसरून वागत असतो. महाभूते आपापल्या कारणात (अव्यक्तात) लीन होतात. तिथे निग्रहाचा काय उपयोग? ॥33॥
म्हणून कोणीही शहाण्या मनुष्याने या इंद्रियांचे मौजेने देखील लाड करू नयेत. ॥202॥ अरे, सापाबरोबर खेळता येईल काय? किंवा वाघाची संगत नीटपणे शेवटास जाईल काय? सांग बरं. हालाहल विष प्याले तर पचेल काय? ॥203॥ पाहा, सहज खेळता खेळता जर आग लागली आणि मग ती जर बळावली तर, ती जशी आटोपत नाही, त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड केले तर, ते चांगले नाही. ॥204॥ अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर, या परतंत्र शरीराकरिता नाना प्रकारचे व्यवस्थित भोग का मिळवावेत? ॥205॥ आपण अतिशय कष्ट करून जेवढी म्हणून संपत्ती आहे तेवढी सर्व एकूण एक खर्चून, रात्रंदिवस या देहाची जोपासना का करावी? ॥206॥ या लोकात सर्व प्रकारे कष्ट करून सर्व प्रकारची संपत्ती संपादन करावी आणि मग आपला धर्म टाकून देऊन, या संपत्तीने या देहाला पुष्ट करावे, हे योग्य आहे काय? ॥207॥ बरे, हे (शरीर पाहिले) तर पाच भूतांच्या मिलाफाने झालेले आहे आणि ते शेवटी पाच भूतांतच मिळून जाणार; त्यावेळी आपण केलेले श्रम कोठे शोधून काढावेत? (म्हणजे आपल्या कष्टाचा मोबदला कोणास विचारावा?) ॥208॥ म्हणून केवळ देहाचे पोषण करणे, हा उघड उघड घात आहे. याकरिता तू (असल्या) देहपोषणाकडे लक्ष देऊ नकोस. ॥209॥
प्रत्येक इंद्रियांची विषयाविषयी आवड आणि नावड (ही) मूळचीच ठरलेली आहेत. त्या आवडी-नावडीच्या ताब्यात आपण जाऊ नये. कारण त्या त्याच्या मार्गाच्या आड येणाऱ्या आहेत. ॥34॥
एरवी इंद्रियांना पाहिजे त्याप्रमाणे विषय देत गेले तर, खरोखर मनाला संतोष प्राप्त होईल, हे खरे ॥210॥ परंतु, तो संतोष म्हणजे बाहेरून सभ्य दिसणार्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे; तो चोर गावची शीव ओलांडली नाही तेथपर्यंत क्षणभर गप्प असतो. (मग पुढे वनात गेल्यावर तोच आपल्या घातास प्रवृत्त होतो). ॥211॥ बाबा, बचनागादि विषे गोड आहेत खरी पण, त्यांच्याविषयी अंत:करणात इच्छा कदाचित उत्पन्न होईल, (पण ती उत्पन्न होऊ देऊ नकोस) परंतु त्यांच्या परिणामाचा विचार केला तर ती प्राणघातक आहेत. ॥212॥ पाहा, ज्याप्रमाणे गळाला लावलेले आमिष माशाला भुलवते, त्याप्रमाणे इंद्रियांच्या ठिकाणी असणारी विषयांची लालसा प्राण्यांना सुखाच्या खोट्या आशेकडे ओढते. ॥213॥ परंतु त्या अभिलाषाखाली प्राण घेणारा गळ आहे, हे तो आमिषाने झाकला गेला असल्यामुळे ज्याप्रमाणे त्या माशाला कळत नाही ॥214॥ तशीच स्थिती या विषयांच्या लालसेने होईल. जर विषयांचा अभिलाष धरला तर, क्रोधरूपी अग्नीत पडावे लागेल. ॥215॥ जसा पारधी मारण्याच्या हेतूने हरणाला चहूकडून घेरून माराच्या कचाट्यात आणतो ॥216॥ येथे तसाच प्रकार आहे. म्हणून तू विषयांचा संग धरू नकोस. अर्जुना, काम आणि क्रोध हे दोन्ही घात करणारे आहेत, असे समज. ॥217॥ म्हणून विषयेच्छेला थाराच देऊ नये. या विषयांची मनात आठवणही आणू नये. फक्त हा स्वधर्माचा जिव्हाळा नष्ट होऊ देऊ नकोस. ॥218॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तरी उचितें कर्में आघवीं, तुवां आचरोनि मज अर्पावीं…


