वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय तिसरा
श्रीभगवानुवाच : काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः । महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥37॥
तंव हृदयकमळारामु । जो योगियांचा निष्कामकामु । तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक ॥239॥ तरी हे कम क्रोधु पाहीं । जयांते कृपेची साठवण नाहीं । हें कृतांताचां ठायीं । मानिजती ॥240॥ हे ज्ञाननिधीचे भुजंग । विषयदरांचे वाघ । भजनमार्गीचे मांग । मारक जे ॥241॥ हे दैहदुर्गीचे धोंड । इंद्रियग्रामींचे कोंड । यांचे व्यामोहादिक बंड । जगावरी ॥242॥ हे रजोगुण मानसाचे । समूळ आसुरियेचे । धायपण ययांचें । अविद्या केलें ॥243॥ हे रजाचे कीर जाहले । परी तमासी पढियंते भले । तेणें निजपद यां दिधलें । प्रमादमोहो ॥244॥ हे मृत्यूचां नगरीं । मानिजती निकियापरी । जे जीविताचे वैरी । म्हणऊनियां ॥245॥ जयांसि भुकेलियां आमिषा । हें विश्व न पुरेचि घांसा । कुळवाडी यांची आशा । चाळीत असे ॥246॥ कौतुकें कवळितां मुठीं । जिये चवदा भुवनें थेंकुटीं । तें भ्रांति तिये धाकुटी । वाल्हीदुल्ही ॥247॥ जे लोकत्रयाचें भातुकें । खेळताचि खाय कवतिकें । तिच्या दासीपणाचेनि बिकें । तृष्णा जिये ॥248॥ हें असो मोहे मानिजे । यांतें अहंकारें घेपे दीजे । जेणे जग आपुलेनि भोजें । नाचवित असे ॥249॥ जेणें सत्याचा भोकसा काढिला । मग अकृत्य तृणकुटा भरिला । तो दंभु रूढविला । जगीं इहीं ॥250॥ साध्वी शांती नागवली । मग माया मांगी शृंगारिली । तियेकरवी विटाळविलीं । साधुवृंदें ॥251॥ इहीं विवेकाची त्राय फेडिली । वैराग्याची खाली काढिली । जितया मान मोडिली । उपशमाची ॥252॥ इहीं संतोषवन खांडिलें । धैर्यदुर्ग पाडिले । आनंदरोप सांडिलें । उपडूनियां ॥253॥ इहीं बोधाचीं रोपें लुंचिलीं । सुखाची लिपि पुसिली । जिव्हारीं आगी सूदली । तापत्रयाची ॥254॥ हे आंगा तव घडले । जीवींची आथी जडले । परी नातुडती गिंवसिले । ब्रह्मादिकां ॥255॥
हेही वाचा – Dnyaneshwari : अगा स्वधर्मु हा आपुला, जरि कां कठिणु जाहला…
अर्थ
श्रीकृष्ण म्हणाले, (बलात्कार करणारा) हा काम आहे, हा क्रोध आहे, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा अधाशी आणि पापी आहे. या लोकी हा (आपला) वैरी आहे, असे जाण. ॥37॥
तेव्हा हृदयरूपी कमलामधे विश्रांती घेणारा (राहणारा) आणि निरिच्छ झालेले योगी ज्याची इच्छा करतात, असा तो श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, ऐक. ॥239॥ तर बाबा, (बलात्कार करणारे) हे काम-क्रोध आहेत, असे समज. हे असे आहेत की, ज्यांच्या मनात दयेचा साठा अजिबात नाही. हे काम-क्रोध प्रत्यक्ष यमधर्मच आहेत, असे समजले जाते. ॥240॥ हे ज्ञानरूपी ठेव्यावर असलेले सर्प होत, हे विषयरूपी दर्यांमध्ये राहाणारे वाघ आहेत. हे भजनरूपी रस्त्यावरील वाटमारे करणारे मांग आहेत. ॥241॥ हे देहरूपी डोंगरी किल्ल्याचे मोठाले दगड आहेत; हे इंद्रियरूपी गावाचे बावकूस आहेत; यांचे अविवेकादिकांच्या रूपाने यांचे जगावर (मोठे) बंड आहे. ॥242॥ हे मनात असलेल्या रजोगुणाचे वळलेले आहेत आणि मुळापासूनच आसुरी संपत्तीचे आहेत. यांचे पालनपोषण अविद्येने केलेले आहे. ॥243॥ हे वास्तविक रजोगुणाचे जरी बनलेले आहेत तरी, ते तमोगुणाला फार प्रिय होऊन राहिले आहेत. त्या तमोगुणाने प्रमाद आणि मोहरूपी आपली गादी यांना बहाल केलेली आहे. ॥244॥ यांची मृत्यूच्या नगरात चांगली पत आहे; कारण की, हे जीविताचे शत्रू आहेत. ॥245॥ भूक लागली असता खाण्यास हे जग एका घासासही ज्यांना पुरे पडत नाही, अशा या काम-क्रोधांचा जो (नशाकारक) व्यापार आहे, त्या व्यापारावर देखरेख आशा करते. ॥246॥ लीलेने मुठीत धरली तर, चौदाही भुवने जिला अपुरी आहेत अशी जी भ्रांती, ती या आशेची नव्या नवसाची लाडकी धाकटी बहीण आहे. ॥247॥ जी खेळत असता त्रैलोक्यरूपी खाऊ सहज खाऊन टाकते. त्या भ्रांतीच्या दासीपणाचे जोरावर तृष्णा जगली आहे. ॥248॥ हे असो. या काम-क्रोधांना मोहाचे घरी मान आहे. आपल्या करामतीने जो सर्व जगास नाचवतो, तो अहंकार या काम-क्रोधांपाशी देवघेव करतो. ॥249॥ ज्याने सत्याच्या पोटी असलेला मालमसाला काढून त्याऐवजी अकृत्याचा पेंढा भरला, असा जो दंभ, तो या काम-क्रोधांनी जगात प्रसिद्धीस आणला. ॥250॥ या काम-क्रोधांनी पतिव्रता, जी शांती, तिला वस्त्रहीन केले आणि मग त्या वस्त्रालंकारांनी मायारूपी मांगीण सजवली. नंतर मग अशा या सजवलेल्या मायेकडून साधूंचे समुदाय या काम-क्रोधांनी भ्रष्ट करविले. ॥251॥ यांनी विचाराचा आश्रय नाहीसा केला, वैराग्याची कातडी काढली आणि निग्रहाची मान जिवंतपणीच मुरगाळून टाकली. ॥252॥ यांनी संतोषरूपी अरण्य तोडून टाकले, आणि धैर्यरूपी किल्ले पाडले तसेच आनंदरूपी लहान रोपटे उपटून टाकले. ॥253॥ यांनी बोधरूपी रोपे उपटली, आणि सुखाची भाषा पुसून टाकली. यांनी हृदयात त्रिविध तापांचे निखारे पसरवले. ॥254॥ हे शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत आणि अंत:करणात सारखे चिकटून राहिले आहेत. परंतु शोधूनही ते ब्रह्मादी देवांना हाती लागत नाहीत. ॥255॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : या स्वधर्मातें अनुष्ठितां, वेचु होईल जीविता…


