वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय तिसरा
जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी । म्हणोनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥172॥ तैशी कर्मीं जया अयोग्यता । तयाप्रति नैष्कर्म्यता । न प्रगटावी खेळतां । आदिकरूनी ॥173॥ तेथें सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी । नैष्कर्मींही दावावी । आचरोनि ॥174॥ तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगीं । तो कर्मबंधु आंगीं । वाजेलना ॥175॥ जैसी बहुरूपियाची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं । परी लोकसंपादणी । तैशीच करिती ॥176॥
प्रकृते: क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः । अहंकारविमूढात्मा कर्ताहं इति मन्यते ॥27॥
देखें पुढिलाचें वोझें । जरी आपुला माथां घेईजे । तरी सांगें कां न दाटिजे । धनुर्धरा ॥177॥ तैसीं शुभाशुभें कर्में । जिये निफजति प्रकृतिधर्में । तियें मूर्ख मतिभ्रमें । मी कर्ता म्हणे ॥178॥ ऐसा अहंकाराधिरूढ । एकदेशी मूढ । तया हा परमार्थ गूढ । प्रगटावा ना ॥179॥ हें असो प्रस्तुत । सांगिजेल तुज हित । तें अर्जुना देऊनि चित्त । अवधारी पां ॥180॥
तत्त्ववित् तु महाबाहो गुणकर्मविभागयोः । गुणाः गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥28॥
जे तत्त्वज्ञानियांचां ठायीं । तो प्रकृतिभावो नाहीं । जेथ कर्मजात पाहीं । निपजत असे ॥181॥ ते देहाभिमानु सांडुनी । गुणकर्में वोलांडुनी । साक्षीभूत होउनी । वर्तती देहीं ॥182॥ म्हणूनि शरीरी जरी होती । तरी कर्मबंधा नाकळती । जैसा कां भूतचेष्टा गभस्ती । घेपवेना ॥183॥
हेही वाचा – Dnyaneshwari : देखें प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले
अर्थ
जे (तान्हे बालक) मोठ्या कष्टाने आईच्या अंगावरचे दूध पिते, ते पक्वान्ने कसे खाईल? म्हणून अर्जुना, ती पक्वान्ने ज्याप्रमाणे तान्ह्या मुलांना देऊ नयेत; ॥172॥ त्याप्रमाणे ज्यांच्या अंगी कर्मे चांगल्या तर्हेने करण्याची योग्यता नाही, त्यांना थट्टेने देखील नैष्कर्म्यतेचा उपदेश करू नये. ॥173॥ त्यास योग्य कर्माची वागणूक लावून देणे हे योग्य आहे. त्यांच्याजवळ त्या सत्कर्माचरणाची स्तुती करावी आणि निष्काम पुरुषांनीही सत्कर्माचेच आचरण करून दाखवावे. ॥174॥ लोककल्याणासाठी जरी त्यांनी कर्माचे आचरण केले तरी, कर्माचे बंधन त्यास प्राप्त होणार नाही. ॥175॥ बहुरूपी जेव्हा राजाराणीचे सोंग आणतात, त्यावेळी त्यांच्या मनात आपण स्त्रीपुरुष आहोत, अशी कल्पनाही नसते. तथापि, ते जसे घेतलेल्या सोंगाची बतावणी यथास्थितपणे लोकांत करतात, (त्याप्रमाणे लोकसंग्रहाकरिता निष्काम पुरुष जरी कर्म करीत असले तरी, त्यास कर्माचे बंधन प्राप्त होत नाही.) ॥176॥
प्रकृतीच्या गुणांनी सर्व कर्मे केली जातात. (परंतु) अहंकाराच्या योगाने ज्याचे मन मोहित झाले, असा पुरुष (या कर्माचा) ‘मीच कर्ता’ असे मानतो. ॥27॥
अर्जुना पाहा, दुसर्याचे ओझे आपण आपल्या शिरावर घेतले तर, आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का? सांग ॥177॥ तसे प्रकृतीच्या गुणाने जी बरी वाईट कर्मे होतात, ती अज्ञानी मनुष्य बुद्धिभ्रंशामुळे ‘मी करतो’ असे म्हणतो. ॥178॥ अशा रीतीने देहाहंकार धरणारा आणि स्वत:स मर्यादित समजणारा जो मूर्ख, त्यास हे गूढ तत्वज्ञान उघड करू नये. ॥179॥ हे राहू दे, अर्जुना, आता तुला हिताची गोष्ट सांगतो, ती तू लक्ष देऊन ऐक. ॥180॥
परंतु हे महाबाहो अर्जुना, गुण आणि कर्म यांच्या विभागाचे (ती आपल्याहून भिन्न आहेत हे) तत्व जाणणारा, गुण (इंद्रिये) गुणांच्या (विषयांच्या) ठिकाणी प्रवृत्त होतात, असे समजून आसक्त होत नाही. ॥28॥
ती अशी की ज्या प्रकृतीच्या गुणांपासून ही सर्व कर्मे उत्पन्न होतात, तिच्याशी ब्रह्मनिष्ठांचे तादात्म्य नसते. ॥181॥ ते देहाचा अभिमान टाकून, गुण आणि गुणांपासून उत्पन्न होणारी जी कर्मे, त्यांचे उल्लंघन करून, देहामध्ये उदासीनतेने राहातात. ॥182॥ म्हणून सूर्याच्या प्रकशात जरी प्राणीमात्रांचे सर्व व्यवहार होतात तरी, सूर्य हा त्यांच्या कर्माने जसा लिप्त होत नाही, तसे हे शरीरधारी जरी असले तरी, ते कर्मबंधाच्या ताब्यात जात नाहीत. ॥183॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तरी पुरतेपणालागीं, आणिकु दुसरा नाहीं जगीं…
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


