वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय तिसरा
देखें उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा । सांगें नरु केवीं तैसा । पावे वेगां ॥41॥ तो हळूहळू ढाळेंढाळें । केतुकेनि एके वेळे । मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ॥42॥ तैसें देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें । सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥43॥ येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें । पूर्णता अवसरें । पावते होती ॥44॥
न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते । न च संन्यसनादेव सिद्धिं समाधिगच्छति ॥4॥
वांचोनि कर्मारंभ उचित । न करितांचि सिद्धवत । कर्महीना निश्चित । होईजेना ॥45॥ कां प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्या होईजे । हें अर्जुना वायां बोलिजे । मूर्खपणें ॥46॥ सांगें पैलतीरी जावें । ऐसें व्यसन कां जेथ पावे । तेथ नावेतें त्यजावें । घडे केवीं ॥47॥ ना तरी तृप्ति इच्छिजे । तरी कैसेनि पाकु न कीजे । कीं सिद्धुही न सेविजे । केवीं सांगें ॥48॥ जंव निरार्तता नाहीं । तंव व्यापारु असे पाहीं । मग संतुष्टीचां ठायीं । कुंठे सहजें ॥49॥ म्हणोनि आइकें पार्था । जया नैष्कर्म्यपदीं आस्था । तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नोहे ॥50॥ आणि आपुलालिया चाडे । आपादिले हें मांडे । कीं त्यजिलें हें कर्म सांडे । ऐसें आहे ॥51॥ हें वायांचि सैरा बोलिजे । उकलु तरी देखों पाहिजे । परी त्यजितां कर्म न त्यजे । निभ्रांत मानी ॥52॥
न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् । कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥5॥
हेही वाचा – Dnyaneshwari : देवा तुजऐसा निजगुरु, आणि आर्तीधणी कां न करूं
अर्थ
हे पहा, पक्षी उड्डाणाबरोबर ज्याप्रमाणे फळाला बिलगतो, त्याप्रमाणे मनुष्याला त्या वेगाने ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल? सांग बरे. ॥41॥ तो हलके हलके एका फांदीवरून दुसर्या फांदीवर जात जात, काही वेळाने त्या मार्गाच्या आधाराने त्या फळापर्यंत खात्रीने पोहोचतो. ॥42॥ तसे वरील दृष्टांतातील पक्ष्याच्या मार्गाप्रमाणे ज्ञानमार्गाचा आश्रय करून ज्ञानी तत्क्षणीच मोक्ष आपल्या अधीन करून घेतात. ॥ 43॥ दुसरे जे कर्मयोगी, ते कर्ममार्गाच्या आश्रयाने वेदात सांगितलेला आपला आचारच पाळून, काही कालाने पूर्णतेस पोहोचतात. ॥44॥
कर्म न आरंभता (न करता) पुरुषाला नैष्कर्म्य प्राप्त होत नाही, व केवळ. (प्राप्त कर्म) संन्यासानेच नैष्कर्म्यसिद्धी प्राप्त होत नसते. ॥4॥
शिवाय योग्य कर्माचा आरंभ न करताच कर्महीनाला सिद्धाप्रमाणे (निष्कर्म) निश्चयाने होता येणार नाही. ॥45॥ किंवा अधिकारपरत्वे आपल्या भागाला आलेले कर्म टाकून द्यावे आणि एवढ्यानेच निष्कर्म व्हावे, हे बोलणे अर्जुना व्यर्थ आणि मूर्खपणाचे आहे. ॥46॥ पलीकडील तीराला कसे जावे अशी जेथे अडचण पडली आहे, तेथे नावेचा त्याग करून कसे चालेल? सांग बरे. ॥47॥ अथवा जर भोजनापासून तृप्तीची इच्छा आहे, तर स्वयंपाक न करून कसे चालेल? किंवा तयार असलेला स्वयंपाक न सेवन करता कसे चालेल? सांग. ॥48॥ जोपर्यंत निरिच्छता प्राप्त झाली नाही, तोपर्यंत कर्म करणे हे रहाणारच, असे समज; आणि मग आत्मतृप्ती प्राप्त झाली असता कर्म सहज थांबते. ॥49॥ म्हणून अर्जुना, ऐक. ज्याला नैष्कर्म्य स्थितीची तीव्र इच्छा आहे, त्याने आपली विहित कर्मे टाकणे मुळीच योग्य होणार नाही. ॥50॥ आणखी (असे पहा की,) आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला असता ते घडते आणि कर्म सोडल्याने कर्माचा त्याग होतो, असे आहे काय? ॥51॥ हे उगीच काहीतरी बोलणे आहे, याचा नीट विचार करून पाहिले तर, कर्म करण्याचे टाकले म्हणजे कर्मत्याग होतो असे नाही, हे तू नि:संशय समज. ॥52॥
कारण कोणीही (काहीतरी) कर्म न करता क्षणभर देखील केव्हाही राहात नाही, (कारण) प्रत्येकजण प्रकृतिजन्य गुणांच्या अधीन असल्यामुळे ते गुण प्रत्येकाकडून कर्म करवून घेत असतात. ॥5॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ये लोकीं दोन्ही निष्ठा, मजचिपासूनि प्रगटा…