वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय तिसरा
श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् । स्वधर्मे निधनम् श्रेयः परधर्मो भयावहः ॥35॥
अगा स्वधर्मु हा आपुला । जरि कां कठिणु जाहला । तरी हाचि अनुष्ठिला । भला देखें ॥219॥ येंरू आचारु जो परावा । तो देखतां कीर बरवा । परी आचरतेनि आचरावा । आपुलाचि ॥220॥ सांगें शूद्रघरीं आघवीं । पक्वानें आहाति बरवीं । तीं द्विजें केवीं सेवावीं । दुर्बळु जरी जाहला ॥221॥ हें अनुचित कैसेनि कीजे । अप्राप्य केवीं इच्छिजे । अथवा इच्छिलेंही पाविजे । विचारीं पां ॥222॥ तरी लोकांचीं धवळारें । देखोनियां मनोहरें । असतीं आपुलीं तणारें । मोडावीं केवीं ॥223॥ हें असो वनिता आपुली । कुरुप जरी जाहली । तरी भोगितां तेचि भली । जियापरी ॥224॥ तेवीं आवडे सांकडु । आचरतां जरी दुवाडु । तरी स्वधर्मचि सुरवाडु । पारत्रिकीचा ॥225॥ हां गा साकर आणि दूध । हें गौल्य कीर प्रसिद्ध । परी कृमिदोषीं विरुद्ध । घेपे केवीं ॥226॥ ऐसेनिही जरी सेविजेल । तरी ते आळुकीची उरेल । जे तें परिणामीं पथ्य नव्हेल । धनुर्धरा ॥227॥ म्हणोनि आणिकांसी जें विहित । आणि आपणपेयां अनुचित । तें नाचरावें जरी हित । विचारिजे ॥228॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तरी उचितें कर्में आघवीं, तुवां आचरोनि मज अर्पावीं…
अर्थ
उत्तम प्रकारे अनुष्ठान झालेल्या परधर्मापेक्षा, स्वधर्म जरी उणा (आचरण्यास कठीण) असला, तरी स्वधर्मच चांगला! स्वधर्माचरण करीत असताना मरण आले तरी चांगले, (पण) परधर्म हा भयप्रद होय. ॥35॥
पाहा, अरे आपला स्वत:चा धर्म आचरण्यास कठिण जरी असला तरी त्याचेच आचरण केलेले चांगले. ॥219॥ याहून दुसरा जो परकीयाचा आचार, तो खरोखर दिसावयास जरी चांगला दिसला तरी आचरण करणार्याने आपणास विहित असलेल्या कर्माचेच आचरण करावे. ॥220॥ शूद्राच्या घरी सर्व चांगली पक्वान्ने आहेत, ती ब्राह्मण दरिद्री जरी असला तरी, त्याने ती कशी सेवन करावीत ? सांग ॥221॥ अशी ही अयोग्य गोष्ट कशी करावी? जे प्राप्त करून घेणे योग्य नाही, त्याची इच्छा कशी करावी? अथवा विचार कर, इच्छा जरी झाली, तरी त्याचे सेवन करावे काय? ॥222॥ दुसर्यांची सुंदर चुनेगच्ची घरे पाहून आपल्या असलेल्या गवताच्या झोपड्या कशा मोडून टाकाव्यात? ॥223॥ हे असू दे. आपली बायको जरी रूपाने वाईट असली तरी, ज्याप्रमाणे तिच्याबरोबर संसार करावा हे चांगले; ॥224॥ त्याप्रमाणे कितीही अडचणीचा प्रसंग आला अथवा आचरावयास त्रास पडला तरी, आपला धर्मच परलोकी सुख देणार आहे. ॥225॥ बाबा, साखर आणि दूध हे पदार्थ गोड आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे. पण जंतांच्या रोगात त्यांचा परिणाम वाईट होत असल्यामुळे ज्यांना तो रोग आहे, त्यांनी ते पदार्थ कसे सेवन करावेत? ॥226॥ असे असूनही जर त्यांचे सेवन केले तर, सेवन करणाऱ्याचा तो हट्ट ठरेल. कारण अर्जुना, त्याचे ते करणे परिणामी हितकर होणार नाही. ॥227॥ म्हणून दुसर्यांना जे विहित, पण आपणास जे अयोग्य म्हणून ठरले आहे, ते हिताचा विचार करून पाहिले तर आचरू नये (हे बरे.) ॥228॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : या शरीरा पराधीना, कां नाना भोगरचना मेळवावी…


