सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय दहावा
मग म्हणितलें जी स्वामी । भलेनि ममत्वें देखिलें तुम्हीं । म्हणोनि कृष्णार्जुनसंगमीं । प्रयागवटु जाहलों ॥16॥ मागां दूध दे म्हणतलियासाठीं । आघवियाचि क्षीराब्धीची करूनि वाटी । उपमन्यूपुढें धूर्जटी । ठेविली जैसी ॥17॥ ना तरी वैकुंठपीठनायकें । रुसला ध्रुव कवतिकें । बुझाविला देऊनि भातुकें । ध्रुवपदाचें ॥18॥ तैसी ब्रह्मविद्यारावो । सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो । ते भगवद्गीता वोविये गावों । ऐसें केलें ॥19॥ जे बोलणियाचां रानीं हिंडतां । नायकिजे फळलिया अक्षराची वार्ता । परि ते वाचाचि केली कल्पलता । विवेकाची ॥20॥ होती देहबुद्धि एकसरी । आनंदभांडारा केली वोवरी । मन गीतार्थसागरीं । जळशयन जालें ॥21॥ तैसें एकैक देवांचें करणें । अपार बोलों केवीं मी जाणें । तऱ्ही अनुवादलों धीटपणें । तें उपसाहिजो जी ॥22॥ आतां आपुलेनि कृपाप्रसादें । मिया भगवद्गीता वोवीप्रबंधें । पूर्वखंड विनोदें । वाखाणिलें ॥23॥ प्रथमीं अर्जुनाचा विषादु । दुजीं बोलिला योगु विशदु । परि सांख्यबुद्धीसि भेदु । दाऊनियां ॥24॥ तिजीं केवळ कर्म प्रतिष्ठिलें । तेंचि चतुर्थीं ज्ञानेंशीं प्रगटिलें । पंचमीं गव्हरिलें । योगतत्त्व ॥25॥ तेंचि षष्ठामाजीं प्रगट । आसनालागोनि स्पष्ट । जीवात्मभाव एकवाट । होती जेणें ॥26॥ तैसीचि जे योगस्थिति । आणि योगभ्रष्टां जे गति । ते आघवीचि उपपत्ती । सांगितली ॥27॥ तयावरी सप्तमीं । प्रकृतिपरिहार उपक्रमीं । भजति जे पुरुषोत्तमीं । ते बोलिले चाऱ्ही ॥28॥ पाठीं सप्तमींची प्रश्नसिद्धी । बोलोनि प्रयाणसिद्धी । एवं ते सकळवाक्यअवधि । अष्टमाध्यायीं ॥29॥
हेही वाचा – Dnyaneshwari : अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें…
अर्थ
नंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अहो स्वामी, चांगल्या प्रेमाने ‘ज्ञानेश्वर आमचा आहे’ या भावनेने तुम्ही माझ्याकडे पाहिले, त्यामुळे कृष्णार्जुनसंवादरूपी गंगा-यमुनेचा संगमाच्या प्रयागावर मी वड झालो. ॥16॥ मागे ‘दूध दे’ अशी विनंती केल्यावरून सर्वच क्षीरसमुद्राची वाटी करून शंकराने उपमन्यूच्या पुढे जशी ठेवली, ॥17॥ किंवा वैकुंठाधीश प्रभूने रुसलेला जो ध्रुव, त्याची अढळपदाचा खाऊ देऊन कौतुकाने समजूत घातली. ॥18॥ त्याप्रमाणे गीता, जी ब्रह्मविद्येचा राजा आहे आणि सर्व शास्त्रांचे विश्रांतीस्थान आहे, ती भगवद्गीता मी प्राकृत ओवीछंदात गावी, असे श्रीगुरूने केले. ॥19॥ (हे पाहा) शब्दरूपी अरण्यामध्ये वाटेल तितके भटकले असता, त्या वाचारूप वृक्षास विचाररूप फळे आल्याची गोष्ट कानावर येत नाही; परंतु वाचाच विचारांचा कल्पवृक्ष केली. ॥20॥ माझ्या बुद्धीने जे देहाशी एकसारखे तादात्म्य केले होते, त्या माझ्या बुद्धीला (देहतादात्म्यापासून सोडून) आनंदरूपी खाजिन्याची खोली केली आणि माझे मन गीतेच्या अर्थरूपी क्षीरसमुद्रात महाविष्णू झाले. ॥21॥ त्याप्रमाणे श्रीगुरूंच्या एक एक लीला आहेत. त्या अनंत असल्यामुळे त्यांचे वर्णन करण्याचे मला कसे कळेल? असे असूनही बेडरपणाने मी जो काही अनुवाद केला, तो महाराज, सहन करा. ॥22॥ एवढा वेळ आपल्या कृपेच्या प्रसादाने मी भगवद्गीतेचा पहिला भाग विनोदाने ओवीच्या छंदात वर्णन केला. ॥23॥ पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा खेद सांगितला, दुसर्यामध्ये स्पष्ट निष्काम कर्मयोग सांगितला, परंतु ज्ञानयोग आणि बुद्धियोग यांच्यात काय फरक आहे, तो दाखवून सांगितला. ॥24॥ तिसर्यात केवळ कर्मयोग सांगितला. तोच कर्मयोग चौथ्यात ज्ञानासह सांगितला आणि पाचव्यात गूढ रीतीने अष्टांगयोग सांगितला. ॥25॥ ज्याच्या योगाने जीवात्म्याचे ऐक्य होते, तेच योगाचे तत्व आसनापासून प्रारंभ करून (तो समाधीपर्यंत) स्पष्ट तर्हेने (सहाव्यात) उघड केले. ॥26॥ त्याचप्रमाणे योगसिद्ध झालेल्याची स्थिती आणि योगाने आचरण करीत असता मधेच मरण आलेल्यास जी गती प्राप्त होते, तो सर्व विचार (सहाव्या) अध्यायात सांगितला. ॥27॥ त्यानंतर सातव्यात आरंभी (कार्य-कारण अशा दोन प्रकारांनी) प्रकृतीचे रूप सांगून, भगवंताला भजणारे जे चार प्रकारचे भक्त आहेत, त्यांचे वर्णन केले. ॥28॥ नंतर सातव्या अध्यायात शेवटी सांगितलेल्या सात वाक्यांसबंधी (आठव्याच्या आरंभी) अर्जुनाने विचारलेल्या सात प्रश्नांची उत्तरे देऊन प्रयाणसिद्धीचा प्रकार सांगितला; अशा रीतीने सर्व सात प्रश्नांची उत्तरे देऊन आठव्या अध्यायात ते प्रश्न संपविले. ॥29॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…


