वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः । यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥22॥
मग मेरुपासूनि थोरें । देह दुःखाचेनि डोंगरे । दाटिजो पां परि भारें । चित्त न दटे ॥369॥ कां शस्त्रेंवरी तोडिलिया । देह आगीमाजीं पडलिया । चित्त महासुखीं पहुडलिया । चेवोचि नये ॥370॥ ऐसें आपणपां रिगोनि ठाये । मग देहाची वास न पाहे । आणिकचि सुख होऊनि जाये । म्हणूनि विसरे ॥371॥
तं विद्यात् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् । स् निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥23॥
जया सुखाचिया गोडी । मग आर्तीची सेचि सोडी । संसाराचिया तोंडीं । गुंतलें जें ॥372॥ जें योगाची बरव । संतोषाची राणीव । ज्ञानाची जाणीव । जयालागीं ॥373॥ तें अभ्यासिलेनि योगें । सावेव देखावें लागे । देखिलें तरी आंगें । होईजेल गा ॥374॥
संकल्पप्रभवान् कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः । मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥24॥
परि तोचि योगु बापा । एके परी आहे सोपा । जरी पुत्रशोकु संकल्पा । दाखविजे ॥375॥ हा विषयांतें निमालिया आइके । इंद्रियें नेमाचिया धारणीं देखे । तरी हियें घालुनि मुके । जीवितांसी ॥376॥ ऐसें वैराग्य हें करी । तरी संकल्पाची सरे वारी । सुखें धृतीचां धवळारीं । बुद्धि नांदे ॥377॥
हेही वाचा – Dnyaneshwari : युक्ति योगाचें आंग पावे, ऐसें प्रयाग जें होय बरवें…
अर्थ
जे सुख मिळाले असता, त्यापेक्षा अधिक असा दुसरा काही लाभ आहे, असे मानीत नाही आणि (ज्या) सुखामध्ये असताना योगी मोठ्या दु:खाने देखील डगमगत नाही ॥22॥
मग मेरूपेक्षा मोठ्या दु:खाच्या डोंगराने त्याचा देह जरी दडपला, तरी पण त्या भाराने त्याचे चित्त दडपत नाही. ॥369॥ अथवा शस्त्राने त्याचा देह तोडला किंवा देह अग्नीमध्ये पडला तरी, चित्त निरतिशय सुखात लीन झाल्यामुळे परत वृत्तीवर येत नाही. ॥370॥ याप्रमाणे चित्त आपल्या ठिकाणी येऊन राहिल्यावर मग देहतादात्म्य घेत नाही आणि अलौकिक सुखच बनल्यामुळे ते चित्त देहाला विसरते. ॥371॥
त्या दु:खाच्या संयोगाने विहीन अशा सुखाला योग ही संज्ञा आहे, असे जाणावे. निश्चयपूर्वक आणि उत्साही अंत:करणाने युक्त होऊन या योगाचे अनुष्ठान करावे. ॥23॥
ज्या सुखाची चटक लगल्याने संसाराच्या तोंडात गुंतलेले जे मन, ते विषयवासनेची आठवण देखील ठेवीत नाही. ॥372॥ जे सुख योगाचे सौभाग्य आहे, संतोषाचे राज्य आहे आणि ज्याच्याकरिता ज्ञान समजून घ्यावयाचे असते, ॥373॥ ते (सुख) योगाचा अभ्यास करून मूर्तिमंत पाहिले पाहिजे आणि पाहिल्यावर मग, तो पहाणारा आपणच स्वत: सुखरूप होऊन जातो. ॥374॥
संकल्पापासून उत्पन्न होणार्या सर्व कामांना नि:शेष टाकून, सर्व इंद्रियांचे सर्व बाजूंनी मनाने नियमन करून ॥24॥
पण बाबा अर्जुना, एक प्रकाराने तो योग सोपा आहे. (तो कसा म्हणशील तर) संकल्पाला पुत्रशोक दाखवावा. [संकल्पाचा पुत्र जो काम (विषयवासना) तो नाहीसा करावा]. ॥375॥ हा संकल्प जर विषयवासना मेल्या असे ऐकेल आणि इंद्रिये नेमलेल्या स्थितीत आहेत, असे पाहील तर, तो ऊर फुटून प्राणास मुकेल. ॥376॥ असे हे वैराग्याने केले तर, संकल्पाची येरझार संपते आणि बुद्धी धैर्याच्या महालात सुखाने वास करते. ॥377॥
क्रमश:
हेही वाचा –Dnyaneshwari : ऐसें हितासि जें जें निकें, तें सदाचि या इद्रिंयां दुःखे…


