Monday, March 2, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : ऐसें हितासि जें जें निकें, तें सदाचि या इद्रिंयां दुःखे…

Dnyaneshwari : ऐसें हितासि जें जें निकें, तें सदाचि या इद्रिंयां दुःखे…

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.

अध्याय सहावा

आतां तुझें मनोगत जाणोनि । कांहीं एक आम्ही म्हणोनि । तें निकें चित्त देऊनि । परिसावें गा ॥359॥ तूं प्राप्तीची चाड वाहसी । परि अभ्यासीं दक्षु नव्हसी । तें सांग पां काय बिहसी । दुवाडपणा ॥360॥ तरी पार्था हें झणें । सायास घेशी हो मनें । वायां बागुल इयें दुर्जनें । इंद्रिये करिती ॥361॥ पाहें पां आयुष्याचा अढळ करी । जें सरतें जीवित वारी । तया औषधातें वैरी । काय जिव्हा न म्हणे ॥362॥ ऐसें हितासि जें जें निकें । तें सदाचि या इद्रिंयां दुःखे । एऱ्हवी सोपें योगासारिखें । कांहीं आहे ॥363॥

यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया । यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥20॥

सुखमात्यन्तिकं यत् तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् । वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥21॥

म्हणोनि आसनाचिया गाढिका । जो आम्हीं अभ्यासु सांगितला निका । तेणें होईल तरी हो कां । निरोधु यया ॥364॥ एऱ्हवी तरी येणें योगें । जैं इद्रिंया विंदाण लागे । तैं चित्त भेटों रिगे । आपणपेयां ॥365॥ परतोनि पाठिमोरें ठाके । आणि आपणियांतें आपण देखे । देखतखेवों वोळखे । म्हणे तत्त्व तें मी ॥366॥ तिये ओळखीचिसरिसें । सुखाचियां साम्राज्यीं बैसे । चित्तपण समरसें । विरोनि जाय ॥367॥ जयापरतें आणिक नाहीं । जयातें इद्रिंयें नेणती कहीं । तें आपणचि आपुलां ठायीं । होऊनि ठाके ॥368॥

हेही वाचा – Dnyaneshwari : नावेक विरक्तु, जाहला देहधर्मी नियतु…

अर्थ

आता तुझ्या मनातील अभिप्राय ओळखून तुला मी काही थोडे सांगतो, ते तू चांगले चित्त देऊन ऐक. ॥359॥ तू प्राप्तीची इच्छा बाळगतोस, परंतु अभ्यास करण्याविषयी तत्पर असत नाहीस. तर सांग बाबा, तू कठिणपणाला भितोस काय? ॥360॥ तरी अर्जुना, यात कष्ट आहेत, असा तुझ्या मनाचा ग्रह कदाचित होऊन बसेल, तर तो तसा होऊ देऊ नकोस. ही दुष्ट इंद्रिये याचा उगाच बाऊ करतात. ॥361॥ पाहा बरे, आयुष्याला स्थिर करणारे आणि संपत आलेल्या जीविताला मागे आणणारे जे औषध, त्याला जिव्हा शत्रू समजत नाही काय! ॥362॥ त्याप्रमाणे आपल्या हितास जे जे चांगले, ते या इंद्रियांना सदोदित दु:खकारक वाटते, एर्‍हवी योगासारखे सोपे काही आहे काय? ॥363॥

जेथे योगाच्या अभ्यासाचे नियमन पावलेले चित्त विषयांपासून परावृत्त होते, तेथे साधक आपण आपल्याला पाहून आत्मस्वरूपी सुख पावतो ॥20॥

जे सुख सर्वोत्कृष्ट आहे, जे (केवळ) बुद्धिगम्य आहे, जे इंद्रियांना अगोचर आहे आणि जे सुख भोगत असताना तो योगी आपल्या स्वरूपापासून चलन पावत नाही, (असे सुख योग्याच्या अनुभवाला येते.) ॥21॥

म्हणून आसनाच्या बळकटपणापासून आरंभ करून जो आम्ही तुला चांगला योगाभ्यास सांगितला, त्यायोगाने या इंद्रियांचा निरोध झाला तर होईल. ॥364॥ एरवी तरी या योगामुळे ज्या वेळेला इंद्रियांचा निग्रह होतो, त्यावेळेला चित्त आपल्या (चैतन्याच्या) भेटीला निघते ॥365॥ ते ज्यावेळेला विषयांना सोडून परत अंतर्मुख होते आणि आपण आपल्या आत्मस्वरूपाला पाहाते आणि पाहिल्याबरोबर त्यास स्वरूपाची ओळख पटते आणि ते तत्व मी आहे, अशा समजुतीवर ते येते. ॥366॥ त्या ओळखीबरोबर ते सुखाच्या साम्राज्यावर बसते आणि तेथे आत्म्याशी समरस झाल्यामुळे चित्ताचा चित्तपणा नाहीसा होतो ॥367॥ आणि ज्याहून दुसरे काही नाही आणि ज्याला इंद्रिये केव्हाच जाणत नाहीत असे जे चैतन्य, ते मन आपण स्वत: आपल्या ठिकाणी होऊन राहते. ॥368॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari :  युक्ति योगाचें आंग पावे, ऐसें प्रयाग जें होय बरवें…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!