वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
मोटकी देहाकृति उमटे । आणि निजज्ञानाची पाहांट फुटे । सूर्यापुढां प्रगटे । प्रकाशु जैसा ॥452॥ तैशी दशेची वाट न पाहातां । वयसेचिया गांवा न येतां । बाळपणींच सर्वज्ञता । वरी तयातें ॥453॥ तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभें । मनचि सारस्वतें दुभे । मग सकळ शास्त्रें स्वयंभें । निघती मुखें ॥454॥ ऐसें जें जन्म । जयालागीं देव सकाम । स्वर्गीं ठेले जप होम । करिती सदा ॥455॥ अमरीं भाट होईजे । मग मृत्युलोकातें वानिजे । ऐसें जन्म पार्था गा जें । तें तो पावे ॥456॥
पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः । जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥44॥
आणि मागील जे सद्बुद्धि । जेथ जीवित्वा जाहाली होती अवधि । मग तेचि पुढती निरवधि । नवी लाहे ॥457॥ तेथ सदैवा आणि पायाळा । वरि दिव्यांजन होय डोळां । मग देखे जैसीं अवलीळा । पाताळधनें ॥458॥ तैसे दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय । तेथ सौरसेंवीण जाय । बुद्धि तयांची ॥459॥ बळियें इंद्रियें येती मना । मन एकवटे पवना । पवन सहजें गगना । मिळोंचि लागे ॥460॥ ऐसें नेणों काय आपैसें । तयातेंचि कीजे अभ्यासें । समाधी घर पुसे । मानसाचें ।।461॥
हेही वाचा – Dnyaneshwari : इंद्रियग्रामोनि निगाला, आस्थेचिया वाटा लागला…
अर्थ
अल्प वयातच त्याच्या ठिकाणी स्वरूपज्ञानाचा उदय होतो. ज्याप्रमाणे सूर्य उगवण्याच्या पूर्वी अरुणोदयाचा प्रकाश होतो ॥452॥ त्याप्रमाणे योग्य अवस्थेची वाट न पाहाता, प्रौढ वयरूपी गावाला पोहोचण्याच्या अगोदरच लहानपणीच, सर्वज्ञता त्याला माळ घालते. ॥453॥ पूर्वजन्मात तयार झालेली बुद्धी त्याला अनुकूल असल्यामुळे त्याचे मनच सर्व विद्यांना प्रसवते आणि मग सर्व शास्त्रे आपोआप त्याच्या मुखातून निघतात. ॥454॥ ज्याकरिता देव कामनायुक्त होऊन स्वर्गात नेहेमी जप, होम इत्यादी करत राहिले आहेत, असा जो जन्म ॥455॥ आणि देवांनी भाट होऊन मृत्यूलोकाचे वर्णन करावे असा जो जन्म, अर्जुना, तो त्याला प्राप्त होतो. ॥456॥
जरी तो परतंत्र असला तरी, पूर्वजन्मीचा योगाभ्यास त्याला आपल्याकडे ओढतो. (फार कशाला?) योगसंबधी (केवळ) जिज्ञासू असूनही शब्दब्रह्माचे तो अतिक्रमण करतो. (वेदरहस्याचे गूढ अभिप्राय अथवा समाधीचा अनुभव हे याच स्थितीत त्याला सहज साध्य होतात.) ॥44॥
आणि मागच्या जन्मांची चांगली बुद्धी, जी त्याला मागील जन्माचा शेवट होण्याच्या वेळी प्राप्त झाली होती तीच चांगली बुद्धी मग (या जन्मी) त्याला सतत नवी प्राप्त होते. ॥457॥ एखादा भाग्यवान पुरुष पायाळू असून त्याला डोळ्यात घालण्याला दिव्यांजन मिळाल्यानंतर, तो जसा पाताळातील द्रव्य सहज पाहातो ॥458॥ त्याप्रमाणे ज्या सिद्धांतात बुद्धीचा प्रवेश होत नाही अथवा जे सिद्धांत केवळ गुरूकडून खरोखर कळावयाचे असतात, त्या सिद्धांतात त्याची बुद्धी प्रयत्नावाचून प्रवेश करते. ॥459॥ बलवान इंद्रिये मनाच्या आधीन होतात, मन प्राणवायूशी एक होते आणि प्राणवायू अनायासे मूर्ध्निआकाशास मिळू लागतो. ॥460॥ असे सहजच कसे काय होते, ते समजत नाही. अभ्यास त्याला आपोआप येतो आणि समाधी त्याच्या मनाचे घर विचारीत येते. ॥461॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जे सिद्धांताचां सिंहासनीं, राज्य करिती त्रिभुवनीं…


