वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः । सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥31॥
जेणें ऐक्याचिये दिठी । सर्वत्र मातेचि किरीटी । देखिला जैसा पटीं । तंतु एकु ॥398॥ कां स्वरूपें तरी बहुतें आहाती । परी तैसीं सोनीं बहुवें न होती । ऐसी ऐक्याचळाची स्थिती । केली जेणें ॥399॥ ना तरी वृक्षाचीं पानें जेतुलीं । तेतुलीं रोपे नाहीं लाविलीं । ऐसी अद्वैतदिवसें पाहली । रात्री जया ॥400॥ तो पंचात्मकीं सांपडे । तरी मग सांग पा कैसेनि अडे । जो प्रतीतीचेनि पाडें । मजसीं तुके ॥401॥ माझें व्यापकपण आघवें । गवसलें तयाचेनि अनुभवें । तरी न म्हणतां स्वभावें । व्यापकु जाहला ॥402॥ आतां शरीरीं तरी आहे । परि शरीराचा तो नोहे । ऐसें बोलवरी होये । तें करूं ये काई ॥403॥
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन । सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥32॥
म्हणोनि असो तें विशेषें । आपणपयासारिखें । जो चराचर देखे । अखंडित ॥404॥ सुखदुःखादि वर्मे । कां शुभाशुभें कर्में । दोनी ऐसी मनोधर्में । नेणेचि जो ॥405॥ जें समविषम भाव । आणिकही विचित्र जें सर्व । तें मानी जैसे अवयव । आपुले होती ॥406॥ हें एकैक काय सांगावें । जया त्रैलोक्यचि आघवें । मी ऐसें स्वभावें । बोधा आलें ॥407॥ तयाही देह एकु कीर आथी । लौकिकीं सुखदुःखी तयातें म्हणती । परी आम्हांतें ऐसीचि प्रतीती । परब्रह्मचि हा ॥408॥ म्हणोनि आपणपां विश्व देखिजे । आणि आपण विश्व होईजे । ऐसे साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा ॥409॥ हें तूतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं । जे साम्यापरौति जगीं प्राप्ति नाहीं ।।410।।
हेही वाचा – Dnyaneshwari : …तैसें चित्त लया जाये आणि चैतन्यचि आघवें होये
अर्थ
(माझे) एकत्व जाणून राहाणारा जो योगी सर्व भूतांचे ठायी असलेल्या मला सेवितो, तो (देह, नाम इत्यादी) सर्व उपाधींनी युक्त असला तरी, मत्स्वरूप झालेला असतो. ॥31॥
अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये केवळ एक सूतच असते, त्याप्रमाणे ज्याने अद्वैतबोधाने सर्व ठिकाणी केवळ मलाच पाहिले आहे; ॥398॥ अथवा अलंकारांचे आकार जरी पुष्कळ आहेत तरी, त्याप्रमाणे सोने पुष्कळ नाहीत, अशी अचल पर्वताप्रमाणे ज्याने ऐक्यस्थिती केली आहे, ॥399॥ अथवा झाडाची जितकी पाने आहेत, तितकी रोपे लावलेली नाहीत, अशा अद्वैतदिवसाने ज्यास द्वैताची रात्र उजाडली ॥400॥ (अशा रीतीने) जो अनुभवाच्या योग्यतेने माझ्या बरोबरीचा ठरतो, तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी असला तरी, मग सांग बरे, तो देहतादात्म्य घेऊन (देहात) कसा अडकून राहील? ॥401॥ माझे सर्व व्यापकपण त्याच्या अनुभवाने कवटाळले आहे, म्हणून त्याला व्यापक असे जरी म्हटले नाही तरी, तो सहज व्यापक आहे. ॥402॥ आता तो देहधारी जरी असला तरी, तो देहाचे तादात्म्य घेत नाही, अशी ही त्याची स्थिती शब्दांनी सांगण्याजोगी करता येईल काय? ॥403॥
हे अर्जुना, सर्व ठिकाणी जो आपल्यासारखे पाहातो, सुख अथवा दु:ख हेही जो आपल्यासारखे पाहातो, (आपल्याहून भिन्न जाणत नाही) तो योगी अत्यंत श्रेष्ठ (अशा अवस्थेला पोहोचलेला) आहे, असे जाणावे. ॥32॥
म्हणून त्याचे विशेष वर्णन करणे राहू दे. अथवा जो तत्ववेत्ता सर्व चराचर आपणासारखेच निरंतर पाहातो, ॥404॥ सुखदु:खादी कर्मे अथवा पुण्यपापादी कर्मे अशी ही द्वंद्वे जो मनाने जाणतच नाही ॥405॥ हे समविषमभाव (बरे वाईट), आणखीही सर्व निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू, या जसे काही आपले अवयव आहेत, असे जो समजतो, ॥406॥ हे वेगळे काय सांगावे? ज्याला सर्व त्रैलोक्यच आपण आहोत, असे ज्ञान सहजच प्राप्त झाले आहे. ॥407॥ त्यालाही एक देह आहे आणि लोकात त्याला सुखी-दु:खीही म्हणतात, हे खरे आहे. परंतु आमचा अनुभव असाच आहे की, तो परब्रह्म आहे. ॥408॥ म्हणून आपल्या ठिकाणी जगत् पाहावे आणि आपण जगत व्हावे, अशा एका साम्याचीच हे अर्जुना, तू उपासना कर, ॥409॥ तू समदृष्टी ठेव, असे आम्ही एवढ्याकरिता तुला पुष्कळ प्रसंगी म्हणत आलो, कारण साम्यापलीकडे या जगात दुसरा लाभ नाही. ॥410॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : दीपा आणि प्रकाशा, एकवंचीचा पाडु जैसा…


