वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
जो मुळबंधें कोंडला । अपानु माघौता मुरडला । तो सवेंचि वरी सांकडला । फुगु धरी ॥214॥ क्षोभलेपणें माजे । उवाइला ठायी गाजे । मणिपूरेंसीं झुंजे । राहोनियां ॥215॥ मग थांवली ते वाहटुळी । सैंघ घेऊनि घरडहुळी । बाळपणींची कुहीटुळी । बाहेर घाली ॥216॥ भीतरीं वळी न धरे । कोठ्यामाजी संचरे । कफपित्ताचे थारे । उरों नेदी ॥217।। धांतुचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी । आंतली मज्जा काढी । अस्थिगत ॥218॥ नाडीतें सोडवी । गात्रांतें विघडवी । साधकातें भेडसावी । परि बिहावें ना ॥219॥ व्याधीतें दावी । सवेंचि हरवी । आप पृथ्वी कालवी । एकवाट ॥220॥ तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा । शक्ती करी उजगरा । कुंडलिनीये ॥221॥ नागाचें पिलें । कुंकुमें नाहलें । वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ॥222।। तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी । अधोमुख सर्पिणी । निजैली असे ॥223॥ विद्युल्लतेची विडी । वन्हिज्वाळांची घडी । पंधरेयाची चोखडी । घोंटीव जैशी ॥224॥ तैसी सुबद्ध आटली । पुटीं होती दाटली । ते वज्रासनें चिमुटली । सावध होय ॥225॥ तेथ नक्षत्र जैसें उलंडलें । कीं सूर्याचें आसन मोडलें । तेजाचें बीज विरुढलें । अंकुरेंशीं ॥226॥ तैशी वेढियातें सोडिती । कवतिकें आंग मोडिती । कंदावरी शक्ती । उठली दिसे ॥227॥ सहजें बहुतां दिवसांची भूक । वरि चेवविली तें होय मिष । मग आवेशें पसरी मुख । ऊर्ध्वा उजू ॥228॥
हेही वाचा – Dnyaneshwari : एकाग्र अंतःकरण, करूनि सद्गुरुस्मरण…
अर्थ
जो अपानवायू मूळबंधाने कोंडलेला असतो तो ऊर्ध्वगतीने माघारी फिरून सहजच वर अवघडल्यामुळे फुगवटा धरतो. ॥214॥ खवळून तो अपानवायू माजतो आणि पसरल्या ठिकाणी गुरगुरू लागतो आणि तेथेच राहून मणिपूर चक्राला धक्के देतो. ॥215॥ मग ती अपानवायूची बळावलेली वाहुटळ सर्व शरीराच्या आत शोध करून लहानपणीची पोटातील कुजकी घाण बाहेर काढते. ॥216॥ त्या अपानवायूला आत वळण्याला कोठे जागा नसल्यामुळे, तो मग कोठ्यात प्रवेश करतो आणि तेथे असलेले कफ आणि पित यांचा थारा राहू देत नाही. ॥217॥ सप्तधातूंचे समुद्र पालथे करतो, मेदाचे पर्वत फोडतो आणि हाडामधील मज्जा बाहेर काढतो. ॥218॥ नाड्या खुल्या करतो, अवयव शिथिल करतो आणि साधकाला भीती दाखवतो. परंतु त्याने भिऊ नये. ॥219॥ (तो) रोगांना दाखवतो; परंतु लागलीच त्यांना नाहीसे करतो, आणि शरीरात जे पृथ्वीचे तसेच पाण्याचे अंश आहेत, ते एकात एक कालवतो. ॥220॥ अर्जुना, (कोंडलेला अपानवायू असे प्रकार करतो तो) दुसरीकडे वज्रासनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जागे करते. ॥221॥ केशराने न्हालेले नागाचे पिल्लू वेढे घेऊन निजावे ॥222॥ त्याप्रमाणे नेमकी साडेतीन वेढ्याची ती कुंडलिनीरूपी नागीण खाली तोंड करून निजलेली असते. ॥223॥ ती नागीण जशी मूर्तिमंत बनविलेली विजेची वाटोळी कडी, किंवा प्रत्यक्ष अग्नीच्या ज्वालेची केलेली घडी अथवा जणूकाय उत्तम सोन्याचे चकचकीत वेढे, ॥224॥ याप्रमाणे व्यवस्थितपणे आकुंचित असलेली आणि नाभीजवळच्या संकुचित जागेत ती वज्रासनाने दाटून बसलेली चिमटल्यामुळे जागी होते. ॥225॥ त्या ठिकाणी जसे नक्षत्र तुटून पडावे अथवा सूर्याने जसे आपले आसन सोडून खाली यावे किंवा प्रकाशरूप बीजासच अंकुर फुटावा ॥226॥ त्याप्रमाणे वेढ्याला सोडीत असलेली आणि लीलेने अंग मोडीत असलेली ती कुंडलिनी शक्ती नाभिस्थानाखालील कंदावर उठलेली दिसते. ॥227॥ आधीच तिला पुष्कळ दिवसांची भूक लागलेली असते आणि तशात तिला डिवचल्याचे निमित्त होते. मग ती जोराने सरळ वरती तोंड पसरते. ॥228॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसी शरीराबाहेरलीकडे, अभ्यासाची पाखर पडे…


