वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
ऐसी आधारीं मुद्रा पडे । आणि आधींचा मार्गु मोडे । तेथ अपानु आंतलीकडे । वोहोंटो लागे ॥200॥
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः । संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ॥13॥
तंव करसंपुट आपैसें । वाम चरणीं बैसे । बाहुमूळीं दिसे । थोरीव आली ॥201॥ माजि उभारलेनि दंडें । शिरकमळ होय गाढें । नेत्रद्वारींचीं कवाडें । लागूं पाहती ॥202॥ वरचिलें पातीं ढळती । तळींची तळीं पुंजाळती । तेथ अर्धोन्मीलित स्थिती | उपजे तया ॥203॥ दिठी राहोनि आंतुलीकडे । बाहेर पाऊल घाली कोडें । ते ठायीं ठावो पडे । नासाग्रपीठीं ॥204॥ ऐसें आंतुचां आंतुचि रचे । बाहेरी मागुतें न वचे । म्हणोनि राहणें आधिये दिठीचें । तेथेंचि होय ॥205॥ आतां दिशांची भेटी घ्यावी । कां रूपाची वाट पाहावी । हे चाड सरे आघवी । आपैसया ॥206॥ मग कंठनाळ आटे । हनुवटी हे हडौति दाटे । ते गाढी होवोनि नेहटे । वक्षःस्थळीं ॥207॥ माजि घंटिका लोपे । वरी बंधु जो आरोपे । तो जालंधरु म्हणिपे । पंडुकुमरा ॥208॥ नाभी वरी पोखे । उदर हें थोके । अंतरीं फांके । हृदयकोशु ॥209॥ स्वाधिष्ठानावरिचिले कांठीं । नाभीस्थानातळवटीं । बंधु पडे किरीटी । वोढियाणा तो ॥210॥
प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः । मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥14॥
ऐसी शरीराबाहेरलीकडे । अभ्यासाची पाखर पडे । तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची ॥211॥ कल्पना निमे । प्रवृत्ती शमे । आंग मन विरमे । सावियाचि ॥212॥ क्षुधा काय जाहली । निद्रा केउती गेली । हे आठवणही हारपली । न दिसे वेगां ॥213॥
हेही वाचा – Dnyaneshwari : …तेथ निगूढ मठ होआवा, कां शिवालय
अर्थ
याप्रमाणे आधारचक्रावर मूळबंध बरोबर लागला आणि खालचा मार्ग बंद पडला म्हणजे अपान वायू आतल्या बाजूस संकुचित होऊ लागतो. ॥200॥
शरीर (शरीराचा मधला भाग), मस्तक आणि मान ही समान तसेच अचल धारण करणारा, निश्चल, स्वत:च्या नाकाच्या अग्रभागाकडे दृष्टी लावलेला आणि दिशांकडे न पहाणारा ॥13॥
तेव्हा द्रोणाकार झालेली हस्तांजुळी सहजच डाव्या पावलावर बसते आणि त्यामुळे दोन्ही खांदे वर चढलेले दिसतात. ॥201॥ पाठीच्या उभ्या कण्याच्या योगाने वर चढलेल्या खांद्यात मस्तक घट्ट राहते आणि डोळ्यांच्या पापण्या झाकावयास लागतात. ॥202॥ वरच्या पापण्या ढळतात, खालच्या पापण्या खाली पसरतात, तेव्हा अर्धी उघडी अशी त्या डोळ्यांची स्थिती होते. ॥203॥ दृष्टी ही आतल्या आत डोळ्यातच राहते, जर कौतुकाने बाहेर आलीच, तर ती नेमकी नाकाच्या शेंड्यावर पडते ॥204॥ अशी आतल्या आतच दृष्टी राहते, ती पुन्हा बाहेर येत नाही, म्हणून अर्ध्या दृष्टीचे राहाणे नाकाच्या शेंड्यावरच होते. ॥205॥ आता दिशांची गाठ घेण्याची (चोहोकडे पाहाण्याची) अथवा रूप-विषय पाहण्याची इच्छा आपोआप नाहीशी होते. ॥206॥ मग गळा आकुंचित होऊन गळ्याखालच्या खळगीत हनुवटी अडकून बसते, ती तेथे घट्ट बसून छातीवर दाबून बसते. ॥207॥ अर्जुना, त्यामध्ये कंठमणी (गळ्याची घाटी) अदृश्य होतो, असा जो बंध पडतो, त्याला ‘जालंधर बंध’ असे म्हणतात. ॥208॥ वोढियाणा बंध बेंबीवर पुष्ट होतो, पोट खपाटीला जाते आणि हृदयकमल आत प्रफुल्लित होते ॥209॥ अर्जुना, शिश्नावरील काठास आणि बेंबीच्या खालच्या भागास जो बंध पडतो, त्यास ‘वोढियाणा बंध’ असे म्हणतात. ॥210॥
अंत:करण शांत असलेला, भीतिरहित, ब्रह्मचर्यव्रत पालन करणारा, माझ्या ठिकाणी चित्त ठेवणारा, मत्परायण आणि मनाचे संयमन केलेला असा होऊन (आसनावर) बसावे. ॥14॥
याप्रमाणे शरीराच्या बाहेर अभ्यासाची छाया पडते आणि आतल्या बाजूस मनाच्या चंचलतेचा जोर नाहीसा होतो. ॥211॥ कल्पना नाहीशी होते, मनाची बाह्य विषयांकडे धाव थांबते आणि सहजच शरीर तसेच मन शांत होते. ॥212॥ भूक काय झाली, झोप कोठे गेली, याची आठवण देखील राहिली नाही. ॥213॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : एकाग्र अंतःकरण, करूनि सद्गुरुस्मरण…


