Friday, January 16, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : ते सूक्ष्म प्रकृति कोडें, जैं स्थूळाचिया आंगा घडे…

Dnyaneshwari : ते सूक्ष्म प्रकृति कोडें, जैं स्थूळाचिया आंगा घडे…

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.

अध्याय सातवा

भूमिरापोऽनलो वायु: खं मनो बुद्धिरेव च । अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥4॥

तरी अवधारीं गा धनंजया । हे महदादिक माझी माया । जैसी प्रतिबिंबे छाया । निजांगाची ॥15॥ आणि इयेतें प्रकृति म्हणिजे । जे अष्टधा भिन्न जाणिजे । लोकत्रय निपजे । इयेस्तव ॥16॥ हे अष्टधा भिन्न कैसी । ऐसा ध्वनि धरिसी जरी मानसीं । तरी तेचि गा आतां परियेसीं । विवंचना ॥17॥ आप तेज गगन । मही मारुत मन । बुद्धि अहंकार हे भिन्न । आठै भाग ॥18॥

अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् । जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ॥5॥

आणि या आठांची जे साम्यावस्था । ते माझी परम प्रकृति पार्था । तिये नाम व्यवस्था । जीवु ऐसी ॥19॥ जे जडातें जीववी । चेतनेतें चेतवी । मनाकरवीं मानवी । शोक मोहो ॥20॥ पैं बुद्धीचां अंगीं जाणणें । तें जियेचिये जवळिकेचें करणें । जिया अहंकाराचेनि विंदाणें । जगचि धरिजे ॥21॥

एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय । अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥6॥

ते सूक्ष्म प्रकृति कोडें । जैं स्थूळाचिया आंगा घडे । तैं भूतसृष्टीची पडे । टांकसाळ ॥22॥ चतुर्विधु ठसा । उमटों लागे आपैसा । मोला तरी सरिसा । परि थरचि आनान ॥23॥ होती चौऱ्यांशी लक्ष थरा । येरा मिति नेणिजे भांडारा । भरे आदिशून्यांचा गाभारा । नाणेयांसी ॥24॥ ऐसे एकतुके पांचभौतिक । पडती बहुवस टांक । मग तिये समृद्धीचे लेख । प्रकृतीचि धरी ॥25॥ जे आखूनि नाणें विस्तारी । पाठीं तयांची आटणी करी । माजीं कर्माकर्माचिया व्यवहारीं । प्रवर्तु दावी ॥26॥ हें रूपक परी असो । सांगों उघड जैसें परियेसों । तरी नामरूपाचा अतिसो । प्रकृतीच कीजे ॥27॥ आणि प्रकृति तंव माझां ठायीं । बिंबे येथ आन नाहीं । म्हणोनि आदि मध्य अवसान पाहीं । जगासि मी ॥28॥

मत्त: परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय । मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥7॥

हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसें भक्तचकोरचंद्रें, तेथ त्रिभुवनैकनरेंद्रें…

अर्थ

ही माझी प्रकृती पृथ्वी, उदक, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशा आठ प्रकारांनी विभागलेली आहे. ॥4॥

अर्जुना, तर ऐक हे महत् तत्वादी ही माया माझी आहे. ज्याप्रमाणे आपल्या अंगाची पडछाया पडते (त्याप्रमाणे ती माझी छाया आहे). ॥15॥ आणि हिला प्रकृती असे म्हणतात. ही आठ प्रकारांनी वेगवेगळी आहे, असे समज. हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते. ॥16॥ ही आठ प्रकारांनी वेगळी कशी, असा विचार जर तुझ्या मनात असेल तर, त्याचे विवेचन तू आता ऐक. ॥17॥ पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वारा, मन, बुद्धी आणि अहंकार हे ते आठ वेगवेगळे भाग आहेत. ॥18॥

हे अर्जुना, ही (माझी) अपरा होय. जिने हे सर्व जग धारण केले आहे, अशी माझी हिच्याहून दुसरी जीवभूता परा प्रकृती आहे, असे समज. ॥5॥

आणि हे आठ ज्या ठिकाणी लीन होऊन असतात, तीच माझी श्रेष्ठ प्रकृती असून तिला जीव असे नाव आहे. ॥19॥ ती जडाला सजीव करते, जीवाला (आभासाला) सज्ञान करते आणि मनाकडून शोक, मोह मानावयास लावते. ॥20॥ बुद्धीमध्ये जी जाणण्याची शक्ती आहे, ती हिच्या सांनिध्यामुळे आहे आणि तिने अहंकाराच्या कौशल्याने जगत् धरले आहे. ॥21॥

सर्व प्राणिमात्र या दोन प्रकृतींपासून निर्माण झाले आहेत, असे जाण. त्याप्रमाणे सर्व जगाचा आदि आणि अंत मी आहे. (असे समज) ॥6॥

ती सूक्ष्म प्रकृती (जीवरूपी प्रकृती) कौतुकाने स्थूल प्रकृतीच्या (अष्टधा प्रकृतीच्या) परिणामास जेव्हा पावते, तेव्हा प्राणीवर्गरूपी नाणी पाडण्याची टांकसाळ सुरू होते. ॥22॥ चार प्रकारच्या आकृती (अंडज, स्वेदज, आरज, उद्भिज) त्या टांकसाळीतून आपोआप व्यक्तत्वाला येऊ लागतात. त्या चार आकृती सारख्याच किमतीच्या असतात. परंतु (त्यांचे) आकार मात्र वेगवेगळे असतात. ॥23॥ चौर्‍याऐंशी लक्ष योनींचे आकार तयार होतात, इतर आणखी नाण्यांचे आकार त्या टांकसाळीच्या भांडारात जे तयार होतात, त्यांची गणती नाही. त्या सर्व प्राणिमात्ररूप नाण्यांनी मायेचा गाभारा भरून जातो. ॥24॥ याप्रमाणे पंचमहाभूतांची एकाच योग्यतेची अनेक नाणी तयार होतात. मग त्यांच्या भरण्याची गणती प्रकृतीच ठेवते. ॥25॥ ती प्राणिरूप नाण्यांच्या आकृतीची योजना करून त्यांचा प्रसार करते आणि मग त्या आकृतीची आटणी करते आणि दरम्यान (स्थितीकाळी) प्राण्यांकडून कर्माकर्मांचा व्यवहार करून दाखवते. ॥26॥ हे रूपक असो. परंतु तुला कळेल असे स्पष्ट सांगतो, तर नामरूपांचा विस्तार प्रकृतीच करते. ॥27॥ आणि प्रकृती तर माझ्या ठिकाणी भासते, यात अन्यथा नाही, म्हणून जगाचा आदि, मध्य आणि शेवट मीच आहे, असे समज. ॥28॥

हे धनंजया, माझ्याहून वेगळे असे दुसरे काही नाही. (सोन्याच्या) दोऱ्यामध्ये ज्याप्रमाणे (सोन्याच्या) मण्यांचा समुदाय (गुंफावा) त्याप्रमाणे हे सर्व (जग) माझ्यामध्ये गुंफलेले आहे. ॥7॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : आतां अज्ञान अवघें हरपे, विज्ञान नि:शेष करपे…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!