वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पहिला
देवा हें विविध कानीं ऐकिजे । परि अझुनिवरी त्रासु नुपजे । हृदय वज्राचें हें काय कीजे । अवधारी पां ॥262॥ अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं तें तंव क्षणिक । ऐसे जाणतांही दोख । अव्हेरू ना ॥263॥ जे हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले । सांग पां काय थेकुलें । घडले आम्हा ॥264॥
यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः । धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन् मे क्षेमतरं भवेत् ॥46॥
आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें बरवें । जे शस्त्रें सांडूनि साहावे । बाण यांचे ॥265॥ तयावरी होय जितुकें । तें मरणही वरी निकें । परी येणें कल्मषें । चाड नाहीं ॥266॥ ऐसें देखोनि सकळ । अर्जुनें आपुलें कुळ । मग म्हणे राज्य तें केवळ । निरयभोगु ॥267॥
संजय उवाच : एवमुक्त्वार्जुन: संख्ये रथोपस्थ उपाविशत् । विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥47॥
ऐसें तिये अवसरीं । अर्जुन बोलिला समरीं । संजयो म्हणे अवधारी । धृतराष्ट्रातें ॥ 268॥ मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहिंवरू आला । तेथ उडी घातली खालां । रथौनियां ॥269॥ जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहृतु । कां रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु ॥270॥ ना तरी महासिद्धीसंभ्रमें । जिंतला त्रासु भ्रमे । मग आकळूनि कामें । दीनु कीजे ॥271॥ तैसा तो धनुर्धरु । अत्यंत दुःखें जर्जरु । दिसे जेथ रहंवरु । त्यजिला तेणें ॥272॥ मग धनुष्यबाण सांडिले । न धरत अश्रुपात आले । ऐसें ऐकें राया तेथे वर्तलें । संजयो म्हणे ॥273॥ आतां यावरी तो वैकुंठनाथु । देखोनि सखेद पार्थु । कवणेपरी परमार्थु । निरुपील ॥274॥ ते सविस्तर पुढारी कथा । अति सकौतुक ऐकतां । ज्ञानदेव म्हणे आतां । निवृत्तिदासु ॥275॥
प्रथम अध्याय समाप्त ||
हेही वाचा – Dnyaneshwari : हें ऐसें कैसें करावें । जे आपुले आपण मारावे…
अर्थ
देवा, ही नानाप्रकारची बोलणी कानाने ऐकतोस, पण अजूनपर्यंत तुला शिसारी येत नाही. ऐक, तू आपले हृदय वज्रासारखे कठोर केलेस काय? ॥262॥ ज्या शरीराकरिता राज्यसुखाची इच्छा करावयाची, ते शरीर तर क्षणभंगुर आहे, असे कळत असताही अशा या घडणार्या महापातकाचा त्याग करू नये काय? ॥263॥ हे जे सर्व आपले वाडवडील जमले आहेत, त्यास मारून टाकावे अशा बुद्धीने त्याच्याकडे पाहिले, ही काय लहानसहान गोष्ट (पाप) आमच्या हातून घडली? तूच सांग. ॥264॥
जर हातात शस्त्रे धारण करणारे कौरव प्रतिकार न करणाऱ्या आणि निःशस्त्र अशा मला, रणामध्ये ठार मारतील, तर माझे अधिक कल्याण होईल. ॥46॥
आता इतक्यावरही जगण्यापेक्षा आपण शस्त्रे टाकून देऊन यांचे बाण सहन करावे, हे चांगले. ॥265॥ असे केल्याने जितके दु:ख भोगावे लागेल (तितके सहन करावे, इतकेच काय; पण अशा करण्याने) मृत्यूही जरी प्राप्त झाला, तथापि तो अधिक चांगला. परंतु असे हे पातक करण्याची आपणास इच्छा नाही. ॥266॥ याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कूळ पाहून म्हटले की, (यांचा नाश करून मिळवलेले) राज्य म्हणजे केवळ नरकभोग आहे. ॥267॥
संजय म्हणाला, “रणामध्ये याप्रमाणे बोलून, धनुष्य आणि बाण टाकून, शोकाने ज्याचे चित्त व्यापिले आहे असा अर्जुन (रथाखाली उडी टाकून) रथाच्या मागच्या भागाजवळ बसला. ॥47॥
संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक. असे त्यावेळी अर्जुन समरांगणावर बोलला. ॥268॥ मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला आणि त्याला अनिवार गहिवर आला; मग त्याने रथावरून खाली उडी घातली. ॥269॥ ज्याप्रमाणे अधिकारावरून दूर झालेला राजपुत्र सर्व प्रकारांनी निस्तेज होतो किंवा जसा राहूने ग्रासलेला सूर्य तेजरहित होतो ॥270॥ अथवा, महासिद्धीच्या मोहाने पछाडलेला तपस्वी भुलतो आणि मग कामनेच्या तडाख्यात सापडून दीन होतो ॥271॥ त्याप्रमाणे त्याने जेव्हा रथाचा त्याग केला, तेव्हा तो अर्जुन दु:खाने फार पीडलेला दिसला; ॥272॥ मग धनुष्यबाण त्याने टाकून दिले आणि त्याला रडू आवरेना. संजय म्हणाला, राजा, ऐक. तेथे अशी गोष्ट घडली. ॥273॥ आता यावर तो वैकुंठपती कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश करील, ॥274॥ ती आता पुढे येणारी सविस्तर कथा ऐकावयास फार कौतुककारक आहे. असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ॥275॥
प्रथम अध्याय समाप्त