वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे.
अध्याय पहिला
तस्य संजनयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः । सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान् ॥12॥
या राजाचिया बोला । सेनापति संतोषला । मग तेणें केला । सिंहनादु ॥125॥ तो गाजत असे अद्भुतु | दोन्ही सैन्यांआंतु । प्रतिध्वनि न समातु । उपजत असे ।।126।। तयाचि तुलगासवें । वीरवृत्तीचेनि थावें । दिव्य शंख भीष्मदेवें । आस्फुरिला ।।127।। ते दोन्ही नाद मिनले । तेथ त्रैलोक्य बधिरभूत जाहलें । जैसें आकाश कां पडिलें । तुटोनियां ॥128॥ घडघडीत अंबर । उचंबळत सागर । क्षोभलें चराचर । कांपत असे ।।129॥ तेणें महाघोषगजरें । दुमदुमिताती गिरिकंदरें । तंव दलामाजि रणतुरें आस्फारिलीं ॥130॥
ततः शङ्खाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखाः । सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥13॥
उदंड सैंघ वाजतें । भयानकें खाखातें । महाप्रळयो जेथें | धाकडांसी ||131।। भेरी निशाण मांदळ । शंख काहळा भोंगळ । आणि भयासुर रणकोल्हाळ | सुभटांचे ॥132॥ आवेशें भुजा त्राहाटिती । विसणैले हांका देती । जेथ महामद भद्रजाती । आवरती ना ।।133।। तेथ भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु । जेणें दचकला कृतांतु | आंग नेघे ||134|| एकां उभयांचि प्राण गेले । चांगांचे दांत बैसले। बिरुदांचे दादुले । हिंवताती ।।135।। ऐसा अद्भुत तूरबंबाळु | ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु | देव म्हणती प्रळयकाळु | ओढवला आजी ॥136॥ ऐसी स्वर्गी मातु । देखोनि तो आकांतु । तंव पांडवदळाआंतु । वर्तलें कायी ॥137॥ हो कां निजसार विजयाचें । कीं तें भांडार महातेजाचें । जेथ गरुडाचिचे जावळियेचे । कांतले चाऱ्ही 138॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसें सर्वांपरी पुरते । वीर दळीं आमुतें…
अर्थ
(दुर्योधनाच्या या बोलण्याने संतुष्ट होऊन) त्या दुर्योधनाला हर्ष उत्पन्न करणारा कुरुकुलातील वृद्ध पितामह प्रतापी भीष्माचार्य सिंहनादाप्रमाणे मोठी गर्जना करून शंख वाजविता झाला. 12.
राजाच्या या भाषणाने सेनापति भीष्माला संतोष झाला. मग त्याने सिंहासारखी गर्जना केली. 125. ती गर्जना दोन्ही सैन्यांत विलक्षण तऱ्हेने दुमदुमत राहिली. तिचा प्रतिध्वनि (आकाशात) न मावता पुन: पुन्हा उठू लागला. 126. तो प्रतिध्वनि उठत असताच वीरवृत्तीच्या बलाने (स्फुरण येऊन) भीष्मदेवाने आपला दिव्य शंख वाजविला. 127. ते दोन्ही आवाज मिळाले, तेव्हा त्रैलोक्याच्या कानठळ्या बसल्या. त्या वेळी जणू काय आकाशच तुटून पडते की काय, असे वाटले. 128. (त्यामुळे) आकाश धडाडले, सागर उसळला आणि स्थावर व जंगम जग गांगरून कापू लागले. 129. त्या मोठ्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दऱ्या दणाणून राहिल्या. इतक्यात त्या सैन्यात रणवाद्ये सुरू झाली. 130.
त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग आणि कर्णे ही सर्व वाद्ये एकदम वाजविण्यांत आली; त्यांचा आवाज फार भयंकर झाला. 13.
नाना प्रकारची रणवाद्ये जिकडे तिकडे इतकी भयंकर आणि कर्कश वाजू लागली की, मी मी म्हणणाऱ्यांनाही तो महाप्रलय वाटला! 131. नौबती, डंके, ढोल, शंख, मोठ्या झांजा आणि कर्णे, आणखी महायोद्धयांच्या भयंकर गर्जना (या सर्वांची एकच गर्दी झाली.) 132. (कित्येक योद्धे) आवेशाने दंड ठोकू लागले, (कोणी) त्वेषाने (एकमेकांना) युद्धार्थ हाका मारू लागले आणि त्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती आवरतनासे झाले. 133. अशा स्थितीत भ्याडांची तर गोष्ट कशाला पाहिजे? कच्चे लोक तर कस्पटाप्रमाणे उडून गेलेच, पण प्रत्यक्ष यमास धाक पडला. तो पायच धरीना. 134. (त्यापैकी) कित्येकांचे तर उभ्या उभ्याच प्राण गेले. जे धैर्यवान् होते, त्यांची दातखिळी बसली; आणि मी मी म्हणणारे नामांकित वीर थरथर कापू लागले. 135. असा वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला आणि आज प्रलयकाळ येऊन ठेपला, असे देव म्हणू लागले. 136. तो आकांत पाहून स्वर्गांत अशी गोष्ट झाली. इतक्यात इकडे पांडवांच्या सैन्यात काय झाले? 137. जो रथ विजयाचा गाभा किंवा महातेजाचे भांडारच (होता), ज्याला गरुडाची बरोबरी करणारे चार घोडे जुंपले होते. 138.
हेही वाचा – Dnyaneshwari : …तैसा हा गंगासुतु । सेनापति ||