वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari) सांगितली. भावार्थदीपिका, ज्ञानदेवी अशी ह्या ग्रंथाची पर्यायी नावे होत. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. त्यामुळे ज्ञानदेवांची वा ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी वा ज्ञानदेवांची ती ज्ञानदेवी अशी नावे रूढ झाली असावीत. याच ज्ञानेश्वरीपासून ‘अवांतर’च्या वाचकांसाठी ‘अध्यात्म’ हे सदर सुरू करत आहे.
अध्याय पहिला
श्रीगणेशाय नमः । ॐ नमो जी आद्या । वेदप्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥1॥ देवा तूंचि गणेशु । सकलमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥2॥ हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष । तेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ||3|| स्मृति तेचि अवयव । देखा अंगीकभाव । तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ||4|| अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें । पदपद्धती खेवणें । प्रमेयरत्नांचीं ।।5।। पदबंध नागर । तेंचि रंगाथिलें अंबर । जेथ साहित्य वाणें सपूर । उजाळाचें ॥6॥ देखा काव्यनाटका । जे निर्धारितां सकौतुका । त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वान ||7|| नाना प्रमेयांची परी । निपुणपणे पाहतां कुसरी । दिसती उचित पढ़ें माझारीं । रत्नें भलीं ॥8।। तेथ व्यासादिकांचिया मती । तेचि मेखळा मिरवती | चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ||9|| देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेचि भुजांची आकृती । म्हणऊनि विसंवादें धरिती । आयुधें हातीं ॥10॥ तरी तर्कु तोचि परशु । नीतिभेद अंकुशु | वेदान्तु तो महारसु । मोदकु मिरवे ।।11।। एके हातीं दंतु । जो स्वभावता खंडित । तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ||12|| मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु । धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु | अभयहस्तु ||13|| देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंड सरळ । जेथ परमानंदु केवळ | महासुखाचा ||14|| तरी संवादु तोचि दशनु । जो समताशुभ्रवर्ण । देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ||15||
हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान
अर्थ
[ॐकार हाच परमात्मा आहे असें कल्पून ज्ञानेश्वर महाराज येथें मंगल करतात.] हे सर्वांचें मूळ असणाऱ्या आणि वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या श्री ओंकारा, तुला नमस्कार असो; आणि स्वतःला स्वतः जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा, तुझा जयजयकार असो. 1. (वरील विशेषांनी युक्त अशा) देवा, सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश, तो तूच आहेस. निवृत्तिनाथांचे शिष्य (ज्ञानेश्वरमहाराज ) म्हणतात, महाराज, ऐका. 2. संपूर्ण वेद हीच (त्या गणपतीची) उत्तम सजविलेली मूर्ति आहे; आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी शरीराचे सौंदर्य शोभून राहिले आहे. 3. आतां शरीराची ठेवण पाहा. (मन्वादिकांच्या) स्मृति हेच त्याचे अवयव होत. या स्मृतींतील अर्थ- सौंदर्याने (ते अवयव म्हणजे) लावण्याची केवळ खाणच बनले आहेत. 4. अठरा पुराणें हेच (त्याच्या) अंगावरील रत्नखचित अलंकार; त्यात प्रतिपादिलेली तत्त्वे हीच रत्ने व शब्दांची छंदोबद्ध रचना हीच त्यांची कोंदणे होत. 5. उत्तम प्रकारची शब्दरचना हेच (त्या गणपतीच्या) अंगावरील रंगविलेले वस्त्र आहे; आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलम पोत आहे. 6. पाहा, कौतुकाने काव्यनाटकाविषयी विचार केला असता ती काव्यनाटके (त्या गणपतीच्या) पायांतील क्षुद्र घागऱ्या असून, त्या अर्थरूप आवाज रुणझुणत आहेत. 7. त्यात प्रतिपादिलेली अनेक प्रकारची तत्त्वे आणि त्यातील कुशलता यांचा बारकाईने विचार केला असता यामध्येही उचित पदांचीं काही चांगली रत्ने आढळतात. 8. येथे व्यासादिकांची बुद्धि हीच कोणी (त्या गणपतीच्या) कमरेला बांधलेली मेखला शोभत आहे व तिच्या पदराच्या दशा निर्दोषपणाने झळकत आहेत. 9. पाहा, सहा शास्त्र म्हणून जी म्हणतात, तेच गणपतीचे सहा हात आणि म्हणून एकमेकींशी न मिळणारी मते हीच कोणी त्या हातात शस्त्रे आहेत. 10. तरी (काणादशास्त्ररूपी) हातांमध्ये अनुमानरूपी परशु आहे. (गौतमीय न्यायदर्शनरूपी) हातांत प्रमाणप्रमेयादि षोडश पदार्थाचा तत्त्वभेदरूपी अंकुश आहे. (व्यासकृत वेदान्तसूत्ररूपी) हातात ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञानरूपी मोदक शोभत आहे. 11. बौद्धमताचे निदर्शन करणाऱ्या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्धमत, हाच कोणी स्वभावतः खंडित असलेला दांत तो (पातंजलदर्शनरूपी) एका हातात धरला आहे. 12. मग (बौद्धांच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर) सहजच येणारा (निरीश्वर सांख्यांचा) सत्कारवाद हाच (गणपतीचा) वर देणारा कमलासारखा हात होय आणि (जैमिनिकृत धर्मसूत्रे) हा धर्माची सिद्धी करणारा व अभय देणारा (गणपतीचा) हात होय. 13. पाहा, ज्या (गणपतीच्या) ठिकाणी सोलीव ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ, अति निर्मळ व बऱ्यावाईटाची निवड करण्यात समर्थ अशी लांब सोंड आहे. 14. तर, संवाद हाच दात असून त्यांतील पक्षरहितपणा हा त्या दाताचा पांढरा रंग आहे; ज्ञानरूप बारीक डोळे असलेला विघ्नांचा नियामक असा हा देव आहे. 15.
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
हेही वाचा – आयुर्वेद अन् ऋतुचर्या