वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पहिला
अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः । प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पाण्डवः ।।20।।
तेथ बळें प्रौढीपुरते । जे महारथी वीर होते । तिहीं पुनरपि दळातें । आवरिलें ॥164॥ मग सरिसेपणें उठावले | दुणवटोनि उचलले । तया दंडीं क्षोभलें । लोकत्रय ॥165॥ तेथ बाणवरी धनुर्धर । वर्षताती निरंतर । जैसे प्रलयांत जलधर । अनिवार कां ॥166॥ तें देखलिया अर्जुनें । संतोष घेऊन मनें । मग संभ्रमें दिठी सेने । घालितसे ||167|| तंव संग्रामीं सज्ज जाहले । सकळ कौरव देखिले । मग लीला धनुष्य उचलिलें । पंडुकुमरें ॥168॥
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते । अर्जुन उवाच : सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥21॥
ते वेळीं अर्जुन म्हणतसे देवा । आतां झडकरी रथ पेलावा । नेऊनि मध्ये घालावा । दोहीं दळां ॥169॥
यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धु कामानवस्थितान् । कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे ।।22।। योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः । धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ।।23।।
जंव मी नावेक । हे सकळ वीर सैनिक । न्याहाळीन अशेख । झुंजते जे ॥171॥ एथ आले असती आघवे । परी कवणेंसीं म्यां झुंजावें । हें रणीं लागे पहावें । म्हणऊनियां ||171||
हेही वाचा – Dnyaneshwari : जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठीचा राणा जाण…
अर्थ
कौरवपक्षीय सैनिक (पुन्हा) व्यवस्थित उभे राहिलेले पाहून शस्त्रसंपाताच्या प्रसंगी आपले धनुष्य उचलून कपिध्वज अर्जुन, 20.
त्या सैन्यात पराक्रमाने आणि मोठेपणाने जे पुरे शूर महारथी होते, त्यांनी पुन्हा सैन्याला आवरिले. 164. मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झाले आणि दुप्पट जोराने उसळले. त्या सैन्याच्या उसळण्याने तिन्ही लोक त्रस्त झाले. 165. त्यावेळी प्रलयकाळी मेघ ज्याप्रमाणे अनिवार वर्षाव करतात त्याप्रमाणे धनुर्धारी योद्धे बाणांचा एकसारखा वर्षाव करू लागले. 166. अर्जुनाने ते पाहून मनात संतोष मानला आणि मग उत्सुकतेने सैन्याकडे नजर फेकली. 167. तेव्हा युद्धाला तयार झालेले सर्व कौरव (अर्जुनाला) दिसले. मग पांडुपुत्र अर्जुनाने लीलेनेच धनुष्य उचलून घेतले. 168.
हे धृतराष्ट्रा, त्यावेळी अर्जुन भगवान् श्रीकृष्णाला पुढील वाक्य बोलला : अर्जुन म्हणाला – “हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा कर.” 21.
त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा, आता चटकन रथ हाकावा आणि तो दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करावा. 169.
म्हणजे युद्धाची इच्छा असलेल्या आणि (सन्मुख) उभे राहिलेल्या या सर्वांना मी नीट अवलोकन करीन (आणि) या रणसंग्रामामध्ये मला कोणाबरोबर युद्ध करावयाचे (ते मी पाहून घेईन.) 22. दुष्टबुद्धि दुर्योधनाचे (युद्धामध्ये) प्रिय करण्याची इच्छा असलेले जे हे युद्धाची इच्छा करणारे (योद्धे) येथे गोळा झाले आहेत, त्यांना मी अवलोकन करीन. 23.
जोपर्यंत हे सर्व झुंजण्याकरिता आलेले शूर सैनिक मी क्षणभर पुरते न्याहाळून पाहीन (तोपर्यंत उभा कर). 170. येथे सर्व आले आहेत; पण मी रणात कोणाबरोबर लढावे, याचा विचार करणे जरूर आहे. म्हणून (मी पाहतो). 171.
क्रमश:
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
हेही वाचा – Dnyaneshwari : पृथ्वीतळ उलथों पहात…