Sunday, March 1, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : जे माझेनि कामें सकाम, जे माझेनि प्रेमें सप्रेम…

Dnyaneshwari : जे माझेनि कामें सकाम, जे माझेनि प्रेमें सप्रेम…

सार्थ ज्ञानेश्वरी

अध्याय नववा

यान्ति देवव्रता देवान् पितृन् यान्ति पितृव्रता: । भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥25॥

मनें वाचा करणीं । जयांचीं भजनें देवांचिया वाहणी । ते शरीर जातियेक्षणीं । देवचि जाले ॥355॥ अथवा पितरांचीं व्रतें । वाहती जयांचीं चित्तें । जीवित सरलिया तयांतें । पितृत्व वरी ॥356॥ कां क्षुद्रदेवतादि भूतें । तियेचि जयांचीं परमदैवतें । जिहीं अभिचारिकीं तयांतें । उपासिलें ॥357॥ तयां देहाची जवनिक फिटली । आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली । एवं संकल्पवशें फळलीं । कर्में तयां ॥358॥ मग मीचि डोळां देखिला । जिहीं कानीं मीचि ऐकिला । मनीं मी भाविला । वानिला वाचा ॥359॥ सर्वांगीं सर्वाठायीं । मीचि नमस्कारिला जिहीं । दानपुण्यादिकें जें कांहीं । तें माझियाचि मोहरा ॥360॥ जिहीं मातेंचि अध्ययन केलें । जे आंतरबाहेरि मियांचि धाले । जयांचें जीवित्व जोडलें । मजचिलागीं ॥361॥ जे अहंकारु वाहत आंगीं । आम्ही हरीचे भूषावयालागीं । जे लोभिये एकचि जगीं । माझेनि लोभें ॥362॥ जे माझेनि कामें सकाम । जे माझेनि प्रेमें सप्रेम । जे माझिया भुली सभ्रम । नेणती लोक ॥363॥ जयांचीं जाणती मजचि शास्त्रें । मी जोडें जयांचेनि मंत्रें । ऐसे जे चेष्टामात्रें । भजले मज ॥364॥ ते मरणाऐलीचकडे । मज मिळोनि गेले फुडे । मग मरणीं आणिकीकडे । जातील केविं ॥365॥

हेही वाचा – Dnyaneshwari : अगा स्वप्नीं निधान फावे, परि चेइलिया हारपे आघवें…

अर्थ

देवांची भक्ति करणारे देवत्वाप्रत जातात, पितरांची भक्ति करणारे पितृत्वाप्रत जातात, भूतांचे पूजन करणारे भूतत्वाप्रत जातात; तसेच माझेच पूजन करणारे मद्रूप होतात. ॥25॥

मनाने, वाचेने आणि सर्व इंद्रियांनी ज्यांचा भजनप्रवाह इंद्रादी देवांच्या मार्गाकडे आहे, त्यांचा देह पडताक्षणीच त्यांना स्वर्गात देवशरीर मिळते. ॥355॥ अथवा श्राद्धपक्षादी जी पितरांची व्रते आहेत, ती व्रते जे अंत:करणपूर्वक पाळतात; ते मेल्यावर त्यांना पितृलोकाची प्राप्ती होते. ॥356॥ किंवा भूतखेतदी क्षुद्र देवता हीच ज्यांची श्रेष्ठ दैवते आहेत आणि त्यांची ज्यांनी जारण, मारण, उच्चाटान इत्यादी तामस कर्मांनी उपासना केली आहे, ॥357॥ त्यांचा देहरूपी पडदा दूर होतो आणि नंतर त्यांना भूताखेतादिकांची गती मिळते. याप्रमाणे ज्यांनी जशा हेतूने कर्मे केली असतील, ती त्यांना तशी फलद्रूप होतात, ॥358॥ मग ज्यांनी डोळ्यांनी मलाच पाहिले, ज्यांनी कानांनी माझ्याच गोष्टी ऐकल्या, मनामध्ये ज्यांनी माझी कल्पना केली आणि वाणीने माझे वर्णन केले, ॥359॥ सर्व अंगांनी आणि सर्व वाणीने मीच समजून, ज्यांनी नमस्कार केला आणि ज्यांनी दानपुण्य इत्यादी जे काही केले, ते सर्व माझ्याच उद्देशाने केलेले असते. ॥360॥ ज्यांनी माझे ज्ञान करून देणार्‍या ज्ञानाचा अभ्यास केला, जे आतबाहेर माझ्याच योगाने तृप्त झालेले आहेत, ज्यांना माझ्याकरिताच आयुष्य लाभलेले आहे, (म्हणजे जे आपले आयुष्य माझाच लाभ होण्याकरिता खर्च करतात), ॥361॥ आम्ही हरीचे दास आहोत, असे भूषण मिरविण्याकरिता जे आपल्या ठिकाणी अहंकार घेतात, ते जगात एक माझ्याच लोभाने लोभी आहेत ॥362॥ जे माझ्याविषयीच्या कामनेनेच कामनायुक्त आहेत, जे माझ्याविषयीच्या प्रेमाने प्रेमयुक्त आहेत आणि जे माझ्या ठिकाणी भुलल्यामुळे वेडे झाले आहेत, म्हणून लोकांना जाणत नाहीत ॥363॥ ज्यांची शास्त्रे तर मलाच जाणतात, जे अशा मंत्राचा जप करतात की, त्यापासून त्यांना माझीच प्राप्ती होते, अशा प्रकारे ज्यांनी आपल्या कायिक, वाचिक, मानसिक या सर्व कर्मांनी माझे भजन केले, ॥364॥ त्यांना मरण येण्याच्या पूर्वीच त्यांचे माझ्या स्वरूपाशी निश्चयेकरून ऐक्य झालेले असते. ते मग मरणसमयी इतर गतीस कसे जातील? ॥365॥ याकरिता ज्यांनी अर्पण करण्याच्या निमित्ताने मला आपला आत्मभव अर्पण केला आहे, असे माझे भजन करणारे जे आहेत, ते माझ्या सायुज्य (मोक्ष) गतीस जातात. ॥366॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : गंगेचे उदक गंगे जैसें, अर्पिंजे देवपितरोद्देशें…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!