Sunday, March 1, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : गंगेचे उदक गंगे जैसें, अर्पिंजे देवपितरोद्देशें…

Dnyaneshwari : गंगेचे उदक गंगे जैसें, अर्पिंजे देवपितरोद्देशें…

सार्थ ज्ञानेश्वरी

अध्याय नववा

हा योगक्षेमु आघवा । तयांचा मजचि पडिला पांडवा । जयांचियां सर्वभावां । आश्रयो मी ॥343॥

येऽप्यन्यदेवताभक्ता यजन्ते श्रद्धयान्विता: । तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् ॥23॥

आतां आणिकही संप्रदायें । परी मातें नेणती समवायें । जे अग्नि-इंद्र-सूर्य-सोमाये । म्हणऊनि यजिती ॥344॥ तेंही कीर मातेंचि होये । कां जे हें आघवें मीचि आहें । परि ते भजती उजरी नव्हे । विषम पडे ॥345॥ पाहें पां शाखा पल्लव वृक्षाचे । हे काय नव्हती एकाचि बीजाचे । परी पाणी घेणें मुळाचें । तें मुळींचि घापे ॥346॥ कां दहाहीं इंद्रियें आहाती । इयें जरी एकेचि देहींचीं होती । आणि इहीं सेविले विषयो जाती । एकाचि ठाया ॥347॥ तरि करोनि रससोय बरवी । कानीं केविं भरावी । फुलें आणोनि बांधावीं । डोळां केविं ॥348॥ तेथ रसु तो मुखेंचि सेवावा । परिमळु तो घ्राणेंचि घ्यावा । तैसा मी तो यजावा । मीचि म्हणोनि ॥349॥ येर मातें नेणोनि भजन । तें वायांचि गा आनेंआन । म्हणोनि कर्माचे डोळे ज्ञान । तें निर्दोष होआवें ॥350॥

अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च । न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते ॥24॥

एऱ्हवीं पाहें पां पंडुसुता । या यज्ञोपहारां समस्तां । मीवांचूनि भोक्ता । कवणु आहे ॥351॥ मी सकळां यज्ञांचा आदि । आणि यजना या मीचि अवधि । कीं मातें चुकोनि दुर्बुद्धि । देवां भजले ॥352॥ गंगेचे उदक गंगे जैसें । अर्पिंजे देवपितरोद्देशें । माझें मज देती तैसें । परि आनानीं भावीं ॥353॥ म्हणऊनि ते पार्था । मातें न पवतीचि सर्वथा । मग मनीं वाहिली जे आस्था । तेथ आले ॥354॥

हेही वाचा – Dnyaneshwari : जेथ अमरत्व हेंचि सिंहासन, ऐरावतासारिखें वाहन…

अर्थ

ज्यांच्या सर्व वृत्तींना मीच एक आश्रय आहे, त्यांच्या या योगक्षेमाचा सर्व भार, अर्जुना, माझ्यावरच येऊन पडतो. ॥343॥

जे श्रद्धेने युक्त असलेले भक्त (माझ्याहून) अन्य देवतांची (अन्य म्हणून) देखील पूजा करतात, ते देखील, हे अर्जुना, माझीच पूजा (पण) अज्ञानाने करतात. ॥23॥

आता सांगितलेल्या संप्रदायांखेरीज इतर जे संप्रदाय आहेत, ते सर्वत्र समान असणारा जो मी, त्या मला जाणत नाहीत, तर ते अग्नये, इंद्राय, सूर्याय आणि सोमाय असे म्हणत यज्ञ करतात. ॥344॥ ते त्यांनी इंद्रादिकांच्या भावनेने केलेले भजन वास्तविक माझेच (भजन) होत असते, कारण की, या सर्व रूपांनी मीच एक आहे, पण तो त्यांचा भजन करण्याचा संप्रदाय सरळ नसून वाकडा आहे. ॥345॥ अर्जुना पाहा, झाडाच्या फांद्या आणि पाने ही एकाच बीजापासून झालेली नसतात काय? परंतु पाणी घेणे हे मुळाचे काम असल्यामुळे पाणी मुळातच घातले पाहिजे. ॥346॥ किंवा दहा इंद्रिये आहेत आणि ही जरी एकाच देहात आहेत आणि यांनी भोगलेले विषय एकाच ठिकाणी (भोक्त्याला) जाऊन पोचतात. ॥347॥ असे जरी आहे तरी, उत्तम पक्वान्न करून कानात कसे भरावे? फुले आणून ती डोळ्यांवर कशी बांधावी? ॥348॥ त्या ठिकाणी पक्वान्ने ही तोंडानेच खाल्ली पाहिजेत. जो वास, तो नाकानेच घेतला पाहिजे. त्याप्रमाणे माझॆ भजन माझ्या भावनेनेच करावे. ॥349॥ अर्जुना, मला न जाणून जे भजन होते, ते भजन व्यर्थ. भलत्यास भलते असे होते. याकरिता माझे भजनकर्म ज्या ज्ञानाने होते, त्या ज्ञानाची दृष्टी स्वच्छ असली पाहिजे ॥350॥

कारण, सर्व यज्ञांचा मीच भोक्ता आणि स्वामी आहे. पण, ते (लोक) यथार्थ रूपाने जाणत नाहीत, म्हणून घसरतात. ॥24॥

एरवी अर्जुना पाहा की, या सर्व यज्ञातील सामग्रीचा माझ्यावाचून भोग घेणारा दुसरा कोण आहे? ॥351॥ सर्व यज्ञांचा आरंभ मी आहे आणि यज्ञांचा शेवटही मी आहे. अशा प्रकारे यज्ञाच्या आरंभी आणि अंती असणारा जो मी, त्या मला टाकून हे दुर्बुद्धीचे याज्ञिक (इंद्रादि) देवांना भजले. ॥352॥ ज्याप्रमाणे गंगेच्या काठी तर्पण करावयास बसले म्हणजे गंगेतील पाणी घेऊन ते देव आणि पितर यांना उद्देशून गंगेतच पुन्हा टाकतात, त्याचप्रमाणे माझेच मला देतात, परंतु ते वेगवेगळ्या भावनेने देतात. ॥353 ॥ म्हणून अर्जुना ते कधीही माझ्या ठिकाणी प्राप्त होत नाहीत, तर ते ज्याची इच्छा मनात करतात त्या लोकांना जातात. ॥354॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : अगा स्वप्नीं निधान फावे, परि चेइलिया हारपे आघवें…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!