सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
ऐसे माझेनि नामघोषें । नाहीं करिती विश्वाचीं दुःखें । अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ॥200॥ ते पाहांटेवीण पाहावित । अमृतेंवीण जीववित । योगेंवीण दावित । कैवल्य डोळां ॥201॥ परी राया रंका पाड धरूं । नेणती सानेया थोरां कडसणी करूं । एकसरें आंनदाचें आवारु । होत जगा ॥202॥ कहीं एकाधेनि वैकुंठा जावें । तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें । ऐसें नामघोषगौरवें । धवळलें विश्व ॥203॥ तेजें सूर्य तैसे सोज्वळ । परि तोहि अस्तवे हें किडाळ । चंद्र संपूर्ण एखादे वेळ । हे सदा पुरते ।।204॥ मेघ उदार परी वोसरे । म्हणऊनि उपमेसी न पुरे । हे निःशंकपणें सपांखरे । पंचानन ॥205॥ जयांचे वाचेपुढां भोजें । नाम नाचत असे माझें । जें जन्मसहस्त्रीं वोळगिजे । एक वेळ मुखासि यावया ॥206॥ तो मी वैकुंठीं नसें । एक वेळ भानुबिंबींही न दिसें । वरी योगियांचींही मानसें । उमरडोनि जाय ॥207॥ परी तयांपाशीं पांडवा । मी हारपला गिंवसावा । जेथ नामघोषु बरवा । करिती ते माझे ॥208॥ कैसे माझां गुणीं धाले । देशकाळातें विसरले । कीर्तनसुखें झाले । आपणपांचि ॥209॥ कृष्ण विष्णु हरि गोविंद । या नामाचे निखळ प्रबंध । माजी आत्मचर्चा विशद । उदंड गाती ॥210॥ हें बहु असो यापरी । कीर्तित मातें अवधारीं । एक विचरती चराचरीं । पांडुकुमरा ॥211॥
हेही वाचा – Dnyaneshwari : पैं तमोगुणाची राक्षसी, जे सद्बुद्धीतें ग्रासी…
अर्थ
याप्रमाणे माझ्या नामघोषाने ते विश्वाची दु:खे नाहीशी करतात आणि सर्व जगच ब्रह्मसुखाने जिकडे तिकडे कोंदून भरतात. ॥200॥ ते (महात्मे) प्राकृत सूर्याच्या पहाटेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात आणि अष्टांगयोगाशिवाय मोक्ष डोळ्यांना दाखवितात. ॥201॥ परंतु हा राजा आहे, हा रंक आहे असा योग्यताभेद ते मनात धरत नाहीत आणि लहान मोठा अशी निवड करीत नाहीत आणि जगाला एकसारखे आनंदाचे कोट होतात. ॥202॥ (पूर्वी असे होते की,) कधी तरी एखाद्याने वैकुंठाला जावे, ते यांनी सर्व वैकुंठच केले. याप्रमाणे माझ्या नामघोषाच्या माहात्म्याने संपूर्ण विश्व प्रकाशित केले. ॥203॥ तेजाने ते महात्मे सूर्यासारखे लखलखीत आहेत असे म्हणावे, परंतु सूर्याचा अस्त होतो, हा सूर्यात दोष आहे. (आणि महात्म्यांच्या ज्ञानोदयाचा कधीच अस्त होत नाही). (त्यास चंद्राची उपमा द्यावी तर,) चंद्र एखाद्या वेळेसच (फक्त पौर्णिमेसच) पूर्ण असतो आणि हे महात्मे स्वरूपस्थितीने नेहेमीच पूर्ण असतात. ॥204॥ मेघ वृष्टी करण्यात उदार असतो पण तो ओसरतो, म्हणून तो मेघ या (बोधाची सदैव वृष्टी करणार्या) महात्म्यास उपमा देण्यास पुरेसा नाही. हे महात्मे नि:संशयपणे कृपाळू असे सिंह आहेत. ॥205॥ जे माझे नाम एक वेळ मुखात यावयास हजारो जन्म सेवा करावी लागते, ते माझे नाम ज्यांच्या वाचेपुढे नेहेमी मोठ्या प्रेमाने नाचत असते. ॥206॥ तो मी एकवेळ वैकुंठात नसतो, एक वेळ सूर्यबिंबातही असत नाही, याशिवाय मी एक वेळ योग्यांची हृदयेदेखील उल्लंघन करून जातो. ॥207॥ परंतु अशा रीतीने मी जरी हरवलो असलो, तरी पण माझे भक्त जेथे माझा नामघोष चांगला करतात, त्यांजपाशी अर्जुना, मला शोधावा. (मी तेथे सापडावयाचाच). ॥208॥ ते महात्मे माझे गुण गाण्यात असे तृप्त झाले आहेत की, त्या योगाने आपण कोठे आहोत आणि आपला काळ भजनात किती गेला, याची खबरच नसते. ते कीर्तनाच्या सुखाने आपल्या ठिकाणीच आपले स्वरूप होऊन राहिले आहेत. ॥209॥ ते महात्मे कृष्ण, विष्णु, हरि, गोविंद या नामांचेच केवळ कथन करतात आणि मधून मधून स्पष्ट रीतीने पुष्कळ आत्मचर्चा करतात. ॥210॥ आता हे फार वर्णन करणे राहू दे. अर्जुना ऐक, याप्रमाणे माझे कित्येक भक्त माझी कथा करीत करीत चराचरांमध्ये संचार करत असतात. ॥211॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जे ज्ञानगंगे नाहाले, पूर्णता जेऊनि धाले…


