सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
मग आणिक ते अर्जुना । साविया बहुवा जतना । पंचप्राणा मना । पाढाऊ घेऊनी ॥212॥ बाहेरी यमनियमांची कांटी लाविली । आंतु वज्रासनाची पौळी पन्नासिली । वरी प्राणायामांची मांडिलीं । वाहातीं यंत्रें ॥213॥ तेथ उल्हाटशक्तीचेनि उजिवडे । मनपवनाचेनि सुरवाडें । सतरावियेचे पाणियांडे । बळियाविलें ॥214॥ तेव्हां प्रत्याहारें ख्याति केली । विकारांची संपिली बोहली । इंद्रियें बांधोनि आणिलीं । हृदयाआंतु ॥215॥ तंव धारणावारू दाटिले । महाभूतांतें एकवटिलें । मग चतुरंग सैन्य निवटिलें । संकल्पाचें ॥216॥ तयावरी जैत रे जैत । म्हणोनि ध्यानाचें निशाण वाजत । दिसे तन्मयाचें झळकत । एकछत्र ॥217॥ पाठीं समाधिश्रियेचा अशेखा । आत्मानुभवराज्यसुखा । पट्टाभिषेकु देखां । समरसें जाहला ॥218॥ ऐसें हें गहन । अर्जुना माझें भजन । आतां ऐकें सांगेन । जे करिती एक ॥219॥ तरी दोन्हीं पालववेरी । जैसा एक तंतू अंबरीं । तैसा मीवांचूनी चराचरीं । जाणती ना ॥220॥ आदि ब्रह्मा करूनी । शेवटीं मशक धरूनी । माजी समस्त हें जाणोनी । स्वरूप माझें ॥221॥ मग वाड धाकुटें न म्हणती । सजीव निर्जीव नेणती । देखिलिये वस्तू उजू लुंटिती । मीचि म्हणोनि ॥222॥ आपुलें उत्तमत्व नाठवे । पुढील योग्यायोग्य नेणवे । एकसरें व्यक्तिमात्राचेनि नांवें । नमूंचि आवडे ॥223॥ जैसें उंचीं उदक पडिलें । तें तळवटवरी ये उगेलें । तैसें नमिजे भूतजात देखिलें । ऐसा स्वभावोचि तयांचा ॥224॥ कां फळलिया तरूची शाखा । सहजें भूमीसी उतरे देखा । तैसें जीवमात्रां अशेखां । खालावती ते ॥225॥ अखंड अगर्वता होऊनि असती । तयांतें विनयो हेचि संपत्ती । जे जयजयमंत्रें अर्पिती । माझांचि ठायीं ॥226॥ नमितां मानाभिमान गळाले । म्हणोनि अवचितें ते मीचि जहाले । ऐसे निरंतर मिसळले । उपासिती ॥227॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तेजें सूर्य तैसे सोज्वळ, परि तोहि अस्तवे हें किडाळ…
अर्थ
अर्जुना, मग कित्येक जे आहेत, त्यांनी सहजच मोठ्या तत्परतेने पाच प्राण आणि मन हे वाटाडे बरोबर घेऊन ॥212॥ बाहेरच्या बाजूला यमनियमांचे काटेरी कुंपण लावले आणि त्या कुंपणाच्या आत मूळबंधाचा कोट तयार केला आणि त्या कोटावर प्राणायामरूपी चालू असलेल्या तोफा ठेवल्या. ॥213॥ तेथे कुंडलिनीच्या प्रकाशाने तसेच मन आणि प्राणवायू यांच्या मदतीने सतरावी जी जीवनकला हेच कोणी एक तळे, ते (त्यांनी) बळकावले. ॥214॥ त्यावेळी प्रत्याहाराने मोठा पराक्रम केला. (तो असा की,) त्यामुळे विकारांची भाषा संपली; (आणि त्याने) इंद्रियांना हृदयाच्या आत बांधून आणले. ॥215॥ तो इतक्यात धारणारूपी घोड्यांनी गर्दी केली, (आणि त्यांच्या बळाने) योगी साधकांनी पृथ्वी वगैरे महाभूतांना एकत्र केले आणि नंतर त्यांनी संकल्पांचे चतुरंग सैन्य (मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार) ठार केले. ॥216॥ त्यानंतर ‘जय झाला रे झाला’ म्हणून ध्यानाची नौबत वाजू लागली आणि स्वरूपऐक्याचे एक छत्र (एकसत्ता) चमकत असलेले दिसले. ॥217॥ नंतर समाधीरूपी लक्ष्मीचे जे आत्मानुभवरूपी संपूर्ण राज्यसुख, त्याचा समरसतेने त्यास राज्याभिषेक झाला. पाहा. ॥218॥ अर्जुना, याप्रमाणे हे माझे (अष्टांगयोगाद्वारे होणारे) भजन फार कठीण आहे. आता कित्येक मला दुसर्या प्रकाराने (नमनरूप भक्तीने) भजतात. तो प्रकार सांगतो, ऐक. ॥219॥ तर, वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे एका पदरापासून दुसर्या पदारापर्यंत एक सूतच असते, त्याप्रमाणे सजीव आणि निर्जीव पदार्थांत माझ्यावाचून ते दुसर्यास ओळखत नाहीत. ॥220॥ ब्रह्मदेवापासून आरंभ करून अखेर चिलटापर्यंत मध्ये जे काही आहे, ते सर्व माझे स्वरूप आहे, हे जाणून ॥221॥ मग मोठा, लहान याचा विचार न करता किंवा सजीव आणि निर्जीव हा भेद न करता, जो पदार्थ दृष्टीपुढे येईल, त्यास मीच (परमात्माच) समजून सरळ लोटांगण घालतात. ॥222॥ त्यास आपल्या श्रेष्ठपणाची आठवण नसते आणि समोर असलेले योग्य आहे किंवा अयोग्य आहे, हे काही न जाणता वस्तूमात्राला उद्देशून सरसकट नमस्कार करणेच त्यांना आवडते. ॥223॥ उंचावरून पडलेले पाणी जसे सखल जागेकडे आपोआप जाऊ लागते, त्याचप्रमाणे समोर दिसलेल्या प्राणिमात्रास नमस्कार करण्याचाच त्यांचा स्वभाव असतो. ॥224॥ अथवा पाहा की, फळभाराने लगटलेल्या झाडाची फांदी जशी सहजच जमिनीकडे लवते, त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्रांपुढे ते नम्रपणे लवतात. ॥225॥ ते नेहेमी निरभिमान होऊन राहिलेले असतात आणि नम्रपणा ही त्यांची संपत्ती असते. ती संपत्ती ते ‘जय जय’ मंत्राने माझ्याच ठिकाणी अर्पण करतात. ॥226॥ नमस्कार करीत असताना मान आणि अभिमान हे नाहीसे झाले म्हणून ते सहजगत्या मद्रूप झाले. याप्रमाणे माझ्या स्वरूपात मिसळून ते माझी निरंतर उपासना करतात. ॥227॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जे ज्ञानगंगे नाहाले, पूर्णता जेऊनि धाले…


