वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय चौथा
आजि श्रवणेंद्रिया पिकलें । जे येणें गीतानिधान देखिलें । आता स्वप्नचि हें तुकलें । साचासरिसें ॥1॥ आधींचि विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी । आणि भक्तराजु किरीटी । परिसत असे ॥2॥ जैसा पंचमालापु सुगंधु । कीं परिमळु आणि सुस्वादु । तैं भला जाहला विनोदु । कथेचा इये ॥3॥ कैसी आगळिक दैवाची । जे गंगा वोळली अमृताची । हो कां जपतपें श्रोतयांची । फळा आली ॥4॥ आतां इंद्रियजात आघवें । तिहीं श्रवणाचें घर रिघावें । मग संवादसुख भोगावें । गीताख्य हें ॥5॥ हा अतिसो अतिप्रसंगे । सांडूनि कथाचि ते सांगें । जे कृष्णार्जुन दोघे । बोलत होते ॥6॥ ते वेळी संजयों रायातें म्हणे । अर्जुनु अधिष्ठिला दैवगुणें । जे अतिप्रीती नारायणें । बोलिजतु असे ॥7॥ जें न संगेचि पितया वसुदेवासी । जें न संगेचि माते देवकीसी । जें न संगेचि बळिभद्रासी । तें गुह्य अर्जुनेंशी बोलत ॥8॥ देवी लक्ष्मीयेवढी जवळिक । तेही न देखे या प्रेमाचें सुख । आणि कृष्णस्नेहाचें पिक । यातेंचि आथी ॥9॥ सनकादिकांचिया आशा । वाढीनल्या होतिया कीर बहुवसा । परी त्याही येणें मानें यशा । येतीचिना ॥10॥ या जगदीश्वराचें प्रेम । एथ दिसतसे निरुपम । कैसें पार्थें येणें सर्वोत्तम । पुण्य केलें ॥11॥ हो कां जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्ती । मज एकवंकी याची स्थिती । आवडतु असे ॥12॥ एर्हवीं हा योगियां नाडळे । वेदार्थासी नाकळे । जेथ ध्यानाचेही डोळे । पावतीना ॥13॥ तें हा निजस्वरूप । अनादि निष्कंप । परी कवणें मानें सकृप । जाहला असे ॥14॥ हा त्रैलोक्यपटाचि घडी । आकाराची पैलथडी । कैसा याचिये आवडी । आवरला असे ॥15॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तैसें ज्ञान तरी शुद्ध, परी इहीं असे प्ररुद्ध…
अर्थ
आज श्रवणेंद्रियांना सुकाळ झाला, कारण गीतेसारखा ठेवा त्याला पहावयास मिळाला. जसे काही स्वप्नच खरे व्हावे, तसे आता हे झाले आहे. ॥1॥ अगोदरच ही विवेकाची कथा, त्यात तिचे प्रतिपादन जगात अत्यंत प्रतापशाली असे श्रीकृष्ण करीत असून भक्तांमधे श्रेष्ठ असणारा अर्जुन ते ऐकत आहे. ॥2॥ ज्याप्रमाणे पंचम स्वर आणि सुवास किंवा सुवास आणि उत्तम रुची यांच्या गोड मिलाफाचा योग यावा, (त्याप्रमाणे), या कथेचा योग मोठ्या बहारीचा जमला आहे. ॥3॥ काय दैवाचा जोर पाहा ! ही अमृताची गंगाच लाभली म्हणावयाची, किंवा श्रोत्यांची जपतपादी अनुष्ठाने (या कथेच्या रूपाने) फळास आली आहेत. ॥4॥ आता एकूण एक इंद्रियांनी श्रवणेंद्रियांचा आश्रय करावा आणि मग गीता नावाच्या या संवादाचे सुख भोगावे. ॥5॥ हा अप्रासंगिक पाल्हाळ पुरे कर आणि कृष्ण तसेच अर्जुन हे दोघे जे काही बोलत होते ती हकिकतच सांग, (असे श्रोते म्हणाले.) ॥6॥ (ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) त्यावेळी संजय धृतराष्ट्राला म्हणाला, खरोखर भाग्यानेच अर्जुनाचा आश्रय केला. कारण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी मोठ्या प्रेमाने बोलत आहेत ॥7॥ पिता वसुदेव याला जे सांगितलेच नाही, आई देवकी हिला जे सांगितलेच नाही, बळिभद्र याला जे सांगितलेच नाही, ते रहस्य अर्जुनाजवळ श्रीकृष्ण बोलत आहे. ॥8॥ (श्रीकृष्ण देवाच्या) जवळ असणारी एवढी देवी लक्ष्मी पण या (कृष्णाच्या) प्रेमाचे सुख तिलाही (कधी) दिसले नाही. कृष्णाच्या प्रेमाचे सर्व फळ यालाच (अर्जुनालाच) आज लाभत आहे ॥9॥ सनकादिकांच्या (परमात्मसुखाबद्दलच) आशा खरोखर खूपच बळावल्या होत्या, पण त्या इतक्या प्रमाणात यशाला आल्याच नाहीत. ॥10॥ या जगदीश्वराचे प्रेम येथे (या अर्जुनावर) अगदी निरुपम दिसत आहे. या पार्थाने कसे उत्कृष्ट पुण्य केले आहे बरे! ॥11॥ पाहा, ज्या अर्जुनाच्या प्रीतीमुळे हा कृष्ण (वास्तविक) निराकार असून साकार झाला, त्या अर्जुनाची (देवाशी) एकरूपता मला चांगलीच पटते. ॥12॥ नाहीतर हा योग्यांना सापडत नाही, वेदांच्या अर्थाला सापडत नाही, ध्यानाचीही नजर जेथपर्यंत पोहोचत नाही. ॥13॥ अशी जी आत्मस्थिती, तद्रूप असणारा हा श्रीकृष्ण मूळचाच अचल आहे; पण (आज या अर्जुनावर) किती बरे कृपावंत झाला आहे! ॥14॥ हा त्रैलोक्यरूप वस्त्राची घडी असून आकाराच्या पलीकडचा आहे, (पण) या अर्जुनाच्या प्रेमाने कसा आटोक्यात आणला आहे! ॥15॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तैसे रागद्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मीचें स्वराज्य आलें…


