वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पाचवा
देखें बुद्धीची भाष नेणिजे । मनाचा अंकुर नुदैजे । ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ॥51॥ हेंच मराठें परियेशीं । तरी बाळकाची चेष्टा जैशी । योगिये कर्में करिती तैशीं । केवळा तनू ॥52॥ मग पांचभौतिक संचलें । जेव्हां शरीर असे निदेलें । तेथ मनचि राहाटे एकलें । स्वप्नीं जेवीं ॥53॥ नवल ऐकें धनुर्धरा । कैसा वासनेचा संसारा । देहा होऊं नेदी उजगरा । परी सुखदुःखें भोगी ॥54॥ इंद्रियांचां गांवीं नेणिजे । ऐसा व्यापारु जो निपजे । तो केवळ गा म्हणिजे । मानसाचा ॥55॥ योगिये तोही करिती । परी कर्में तेणें न बंधिजती । जे सांडिली आहे संगती । अहंभावाची ॥56॥ आतां जाहालिया भ्रमहत । जैसें पिशाचाचें चित्त । मग इंद्रियांचें चेष्टित । विकळु दिसे ॥57॥ स्वरूप तरी देखे । आळविलें आइके । शब्दु बोले मुखें । परी ज्ञान नाही ॥58॥ हें असो काजेंविण । जें जें कांहीं कारण । तें केवळ कर्म जाण । इंद्रियांचें ॥59॥ मग सर्वत्र जें जाणतें । ते बुद्धीचें कर्म निरुतें । वोळख अर्जुनातें । म्हणे हरी ॥60॥ ते बुद्धी धुरे करुनी । कर्म करिती चित्त देउनी । परी ते नैष्कर्म्यापासुनी । मुक्त दिसती ॥61॥ जे बुद्धीचिये ठावूनि देही । तयां अंहकाराची सेचि नाहीं । म्हणोनि कर्मेंचि करितां पाहीं । चोखाळले ॥62॥ अगा करितेनवीण कर्म । तेंचि तें निष्कर्म । हें जाणती सवर्म । गुरुगम्य जें ॥63॥ आतां शांतरसाचें भरितें । सांडीत आहे पात्रातें । जे बोलणें बोलापरौतें । बोलवलें ॥64॥ एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु । तयासीचि आथि लागु । परिसावया ॥65॥ हा असो अतिप्रसंगु । न संडी पां कथालागु । होईल श्लोकसंगतिभंगु । म्हणोनियां ॥66॥
हेही वाचा – Dnyaneshwari : देखें आकाशा आणि अवकाशा, भेदु नाहीं जैसा…
अर्थ
पाहा, जे कर्म बुद्धीला समजण्याच्या पूर्वी आणि मनात विचार उद्भवण्याच्या अगोदर होते, त्या (कर्माच्या) व्यवहाराला ‘कायिक’ व्यवहार म्हणतात. ॥51॥ हेच स्पष्ट पाहिजे असेल तर, ऐक. ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाची हालचाल असते, त्याप्रमाणे योगी केवळ शरीरानेच कर्मे करतात. ॥52॥ मग हे पाच भूतांचे बनलेले शरीर ज्या वेळेला झोपलेले असते, त्यावेळेला ज्याप्रमाणे एकटे मनच स्वप्नात व्यवहार करते ॥53॥ अर्जुना, एक आश्चर्य पाहा. या वासनेचा विस्तार केवढा आहे? ती देहाला जागे होऊ देत नाही, पण सुखदु:खाचा भोग भोगवते. ॥54॥ अरे, इंद्रियांना ज्याचा पत्ता नसतो, असे जे कर्म उत्पन्न होते, त्याला केवळ ‘मानसिक’ कर्म म्हणतात. ॥55॥ योगी तेही कर्म करतात, पण ते त्या कर्माने बांधले जात नाहीत. कारण त्यांनी अहंकाराची संगती टाकलेली असते. ॥56॥ आता ज्याप्रमाणे भूतसंचार झाल्यामुळे चित्त भ्रमिष्ट होते, मग त्या माणसाच्या इंद्रियांच्या क्रिया अमेळ दिसतात ॥57॥ त्यास रूप तर दिसते, हाका मारलेले ऐकू येते, तो तोंडाने शब्दांचा उच्चारही करतो, परंतु हे सर्व केल्याची जाणीव नसते. ॥58॥ हे राहू दे, तो प्रयोजनावाचूनच जे जे काही करतो, ते ते सर्व केवळ इंद्रियांचे कर्म आहे, असे समज. ॥59॥ मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्व ठिकाणी जाणण्याचे जे काम आहे, ते खरोखर बुद्धीचे आहे, असे ओळख. ॥60॥ ते (कर्मयोगी) बुद्धी पुढे करून मन:पूर्वक कर्मे करतात, पण ते नैष्कर्म्य स्थितीस प्राप्त झालेल्या पुरुषापेक्षाही मुक्त दिसतात. ॥61॥ कारण त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही अहंकाराचे स्मरणच नसते, म्हणून अशा कर्मांचे आचरण करीत असताही ते शुद्धच असतात, असे समज. ॥62॥ अर्जुना, कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले जे कर्म, तेच निष्कर्म होय. ही गुरूकडून कळणारी मर्माची गोष्ट (प्राप्त पुरुष) समजतात. ॥63॥ आता (माझ्या बोलण्यातील) शांतरसाचा पूर मर्यादा सोडून उचंबळत आहे. कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टींचे व्याख्यान करता आले. ॥64॥ ज्यांचा इंद्रियांविषयींचा पराधीनपणा चांगल्या तर्हेने नाहीसा झाला आहे, त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे. ॥65॥ (या ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यावर संत श्रोते म्हणतात) हे विषयांतर करणे पुरे. कथेचा संबंध सोडू नकोस. कारण तसे करण्याने श्लोकाच्या संगतीचा बिघाड होईल. ॥66॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जे पार्था तया देहीं, मी ऐसा आठऊ नाहीं…


