अध्याय पंधरावा
तेथ विधिनिषेधी सपल्लव । वेदवाक्यांचें अभिनव । पालव डोलती बरव । आणती तयां ॥157॥ अर्थु कामु पसरे । अग्रवनें घेती थारे । तेथ क्षणिकें पदांतरें । इहभोगांचीं ॥158॥ तेथ प्रवृत्तीचेनि वृद्धिलाभें । खांकरेजती शुभाशुभें । नानाकर्मांचे खांबे । नेणों किती ॥159॥ तेवींचि भोगक्षयें मागिलें । पडती देहांचीं बुडसळें । तंव पुढां वाढी पेले । नवेया देहांची ॥160॥ आणि शब्दादिक सुहावे । सहज रंगें हवावे । विषयपल्लव नवे । नीचचि होती ॥161॥ ऐसे रजोवातें प्रचंडें । मनुष्यशाखांचे मांदोडे । वाढती तो एथ रुढे । मनुष्यलोकु ॥162॥ तैसाचि तो रजाचा वारा । नावेक धरी वोसरा । मग वाजों लागे घोरा । तमाचा तो ॥163॥ तेधवां याचिया मनुष्यशाखा । नीच वासना अधीं देखा । पाल्हेजती डाळुका । कुकर्माचिया ॥164॥ अप्रवृत्तींचे खणुवाळे । फोक निघती सरळे । घेत पान पालव डाळें । प्रमादाचीं ॥165॥ बोलती निषेधनियमें । जिया ऋचा यजुःसामें । तो पाला तया घुमें । टकेयावरी ॥166॥ प्रतिपादिती अभिचार । आगम जे परमार । तेहीं पानीं घेती प्रसर । वासना वेली ॥167॥ तंव तंव होतीं थोराडें । अकर्मांचीं तळबुडें । आणि जन्मशाखा पुढें पुढें । घेती धांव ॥168॥ तेथ चांडाळादि निकृष्टा । दोषजातीचा थोर फांटा । जाळ पडे कर्मभ्रष्टां भुलोनियां ॥169॥ पशु पक्षी सूकर । व्याघ्र वृश्चिक विखार । हे आडशाखानिकर । थोरावती ॥170॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पैं भिंगोरी निधिये पडली, ते गमे भूमीसी जैसी जडली
अर्थ
विधिनिषेधरूपी कोवळ्या पानांचे झुपके असलेली, अशी वेदवाक्यांची डोलत असलेली पालवी त्या मनुष्यशाखांना अपूर्व शोभा आणते. ॥157॥ तेव्हा ऐहिक भोगांची नाशवंत अशी अनेक स्थाने हेच कोणी अंकुर, ते अर्थ व काम यांच्या विस्ताराने जोराने वाढतात. ॥158॥ त्य़ावेळी संसाराची वृद्धी व्हावी, या लोभाने अनेक शुभाशुभ कर्मांचे सोट किती फुटतात, हे कळत नाही. ॥159॥ त्याचप्रमाणे मागील जन्मात केलेल्या कर्मभोगांचा क्षय झाला, म्हणजे (संसारवृक्षाची) देहरूपी शुष्क काष्ठे गळून पडतात, तोच पुढे नव्या देहाचा विस्तार तयार होतो ॥160॥ आणि नैसर्गिक आकर्षतेने सुशोभित झालेली, जी शब्दादिक विषयरूप पालवी ती नेहेमीच नवीन नवीन तयार होत असते. ॥161॥ याप्रमाणे रजोगुणाच्या प्रचंड वार्याने मनुष्यशाखांचे समुदाय तयार होतात. त्यांस या संसाररूपी वृक्षाच्या ठिकाणी मनुष्यलोक म्हणण्याचा प्रकार आहे. ॥162॥ त्याप्रमाणे तो रजोगुणाचा वारा क्षणभर वाहण्याचा बंद होतो मग तमोगुणाचा भयंकर वारा वाहू लागतो. ॥163॥ तेव्हा याच मनुष्यरूपी शाखांना खालच्या बाजूला वाईट कर्मांच्या नीच वासना, ह्याच कोणी फांद्या, त्या विस्ताराला पावतात, असे समज. ॥164॥ निषिद्ध कर्मरूपी खूण असलेले सरळ फोक हे (मनुष्यरूपी शाखेला) प्रमादरूपी पाने, पाला व डहाळ्या उत्पन्न करीत फुटतात. ॥165॥ यजुर्वेद व सामवेद यांच्यातील जे मंत्र निश्चयाने निषिद्ध कर्म (अमूक आहेत असे) सांगतात, ते मंत्ररूपी पल्लव त्या डहाळ्यांच्या अग्रभागावर वाजू लागतात. ॥166॥ दुसर्याच्या नाशाकरता जारणमारण प्रतिपादन करणारी जी शास्त्रे, ही कोणी पाने, त्या पानांसह वासनारूप वेल विस्तारतात. ॥167॥ (मागील ओवीत सांगितल्याप्रमाणे जो जी वासनावेली विस्तारतात) तो तो निषिद्ध कर्मांची तळातील मुळे मोठी होतात आणि यामुळे जन्मरूपी शाखा पुढे पुढे धाव घेतात. (म्हणजे श्रेष्ठ योनीतून नीच योनीत जन्म प्राप्त होतात). ॥168॥ तेव्हा तमोगुणामुळे मोहित झालेल्या कर्मभ्रष्टांना चांडाळादि निकृष्ट पापयोनीरूपी मोठ्या फांद्यांचे जाळे पडते. ॥169॥ पशु, पक्षी, डुक्कर, वाघ, विंचू साप ह्या आडशाखांचे समुदाय विस्तार पावतात. ॥170॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जैसा वर्षाकाळु गगनीं, पाल्हेजे नवघनीं


