अध्याय आठवा
अगा देहींचा अग्नि जरी गेला । तरी देह नव्हे चिखलु वोला। वायां आयुष्यवेळु आपुला ।आंधारां गिंवसी ॥215॥ आणि मागील स्मरण आघवें । तें तेणें अवसरें सांभाळावें । मग देह त्यजूनि मिळावें । स्वरूपीं कीं ॥216॥ तंव तया देहश्लेष्माचां चिखलीं । चेतनाचि बुडोनि गेली । तेथ मागिली पुढिली हे ठेली । आठवण सहजें ॥217॥ म्हणोनि आदीचि अभ्यासु जो केला । तो मरण न येतांचि निमोनि गेला। जैसें ठेवणें न दिसतां मालवलां । दीपु हातींचा ॥218॥ आतां असो हें सकळ । जाण पां ज्ञानासि अग्नि मूळ । तया अग्नीचें प्रयाणीं बळ । संपूर्ण आथी ॥219॥
अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् । तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥24॥
आंत अग्निज्योतींचा प्रकाशु । बाहेरी शुक्लपक्षु परी दिवसु । आणि सामासांमाजीं मासु । उत्तरायण ॥220॥ ऐसिया समयोगाची निरुती । लाहोनि जे देह ठेवती । ते ब्रह्मविद होती । परब्रह्म ॥221॥ अवधारीं गा धनुर्धरा । येथवरी सामर्थ्य यया अवसरा । तेवींचि हा उजू मार्ग स्वपुरा । यावयासी ॥222॥ एथ अग्नी हें पहिलें पायतरें । ज्योतिर्मय हें दुसरें । दिवस जाणें तिसरें । चौथें शुक्लपक्ष ॥223॥ आणि सामास उत्तरायण । तें वरचील गा सोपान । येणें सायुज्यसिद्धिसदन । पावती योगी ॥224॥ हा उत्तम काळु जाणिजे । यातें अर्चिरा मार्गु म्हणिजे । आतां अकाळु तोही सहजें । सांगेन आईक ॥225॥
हेही वाचा – Dnyaneshwari : हिंवाचिया झळुका, जैसें हिंवचि पडे उष्णोदका…
अर्थ
अरे अर्जुना, जर देहातील अग्नी गेला तर, तो देह नाही, ओला चिखल आहे. असे झाले म्हणजे आयुष्य आपला वेळ व्यर्थ अंधारात शोधीत राहाते. ॥215॥ आणि वास्तविक पाहिले असता, मागील जे सर्व स्मरण आहे, ते त्यावेळी तसेच ठेवायचे असते आणि मग देह टाकून परमात्मस्वरूपी मिळावायचे असते. ॥216॥ परंतु देहाला ज्या कफाने व्यापले, त्या कफाच्या चिखलात चेतना बुडून गेली, तेथे मागील (केलेल्या अभ्यासाची) पुढील (स्वरूपस्थितीची) आठवण स्वाभाविक रीतीने थांबली. ॥217॥ म्हणून ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू पाहाण्याकरिता हातात घेतलेला दिवा ती वस्तू दिसण्यापूर्वीच मालवून जावा, त्याप्रमाणे मरणाच्या अगोदरच जो जन्मभर अभ्यास केला, तो मरण येण्यापूर्वीच नाहीसा झाला. ॥218॥ आता हे सगळे असू दे. असे समज की, ज्ञानाला मूळ कारण अग्नी आहे. त्या अग्नीचे मरणकाळी संपूर्ण बळ असावे. ॥219॥
(आत) अग्नी आणि ज्योतीचा प्रकाश, (बाहेर) दिवस, शुक्लपक्ष आणि उत्तरायणाचे सहा महिने, यांच्या ठिकाणी (या स्थितीत) ज्यांचे देहावसान होते, ते ब्रह्मवेत्ते जन ब्रह्माप्रत जातात. ॥24॥
देहात अग्नीचा आणि ज्योतीचा प्रकाश असून बाहेर शुक्लपक्ष परंतु दिवस आणि उत्तरायणातील सहा महिन्यांपैकी एखादा महिना ॥220॥ अशा या चांगल्या जुळून आलेल्या योगाची प्राप्ती होऊन, जे योगी आपला देह सोडतात, ते ब्रह्मवेत्ते परब्रह्म होतात. ॥221॥ अर्जुना, ऐक, या कालाचे येथपर्यंत सामर्थ्य आहे आणि त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाकडे येण्य़ास हा सरळ मार्ग आहे. ॥222॥ येथे अग्नी ही पहिली पायर आहे. ज्योतीचे स्वरूप ही पायरी दुसरी आहे. दिवस ही तिसरी पायरी आणि शुक्लपक्ष ही चौथी पायरी, असे समज. ॥223॥ आणि उत्तरायणातील सहा महिने ही वरची पायरी आहे. या मार्गाने योगी तद्रूपतासिद्धीच्या घराला येतात. ॥224॥ हा उत्तम काळ आहे, असे समज. याला अर्चिरादि मार्ग म्हणावे. आता अकाळ जो आहे, तोही ओघाने सांगतो, ऐक. ॥225॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसा वरिपडिलां प्रयाणकाळीं, बुद्धीतें भ्रमु न गिळीं…


