“खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला. तुमच्यासारखे गरजेपेक्षा अधिक प्रमाणात कंदील घेणारे फार कमी लोकं आहेत…” असं म्हणून संस्थेच्या अधिकाऱ्याने माझ्यासमोर हात जोडले.
“त्याची काही आवश्यकता नाही, कारण मी माझं कर्तव्य करतो आहे…” एवढं बोलून मी त्या संस्थेच्या आवारातून निघालो. बाहेर येऊन गाडीचे दार उघडले. परत एकदा मागच्या सीटवर ठेवलेले कंदील बघितले आणि मी माझी गाडी समाधानाने सुरू केली. गेली कित्येक वर्षे मी हे सामाजिक बांधिलकीचे व्रत आपणहून करत आलो आहे.
बंगल्याच्या आवारात गाडी पोहोचली. रामूकाका पोर्चमध्ये माझी वाट बघत उभेच होते. “रामूकाका गाडीतील कंदील काढून घ्या आणि एक-दोन दिवसात दिनकरकडून नेहमीप्रमाणे बंगल्यावर लावून घ्या…”
हेही वाचा – सदूकाका अन् मानाचा गणपती…
मी आत शिरलो आणि आतल्या सोफ्यावर शांतपणे बसलो.
“साहेब, पाणी आणलंय…”
दिनकरने आणलेलं पाणी मी सावकाश प्यायला सुरुवात केली.
“साहेब, एक विचारू का?” दिनकरने विचारलं.
“हं.”
“तुम्ही दरवर्षी इतक्या मोठ्या संख्येने कंदील आणता. बंगल्याच्या आवारात लावता आणि उरलेले शेजारच्या वस्तीत वाटून टाकता. दरवर्षी तुम्ही सांगता खरं कारण, पण तरीही तुमच्या तोंडातून ऐकताना तुमच्या डोळ्यांतील दाटलेले भाव बघायला मला खूप आवडते.”
“बस समोर, मी सांगतो…”
“मी अनाथाश्रमात लहानाचा मोठा झालो. तिथे अभ्यासासोबत अशी बारीकसारीक कामं करत आम्ही आश्रमासाठी पैसे जमा करायचो. आई-वडिलांच्या प्रेमाला मुकलेले आम्ही सगळे जण एकमेकांच्या मदतीने आणि आधाराने मोठे झालो. शिकलो आणि आपापल्या परीने आयुष्यात स्थिर झालो…”
हेही वाचा – फुलपाखरू… 40 वर्षांपूर्वीच्या आठवणी
“मी हे सगळे कंदील आणले आहेत कर्णबधिर मुलांच्या संस्थेतून. अनाथ मुलांप्रमाणे ही मुलं देखील वेगळे आयुष्य जगत असतात. तुझ्या माझ्या आयुष्यासारखं जगण्यासाठी धडपडत असतात. पण जन्मतः आलेल्या व्यंगामुळे त्यांच्या जगण्यावर खूप बंधनं असतात. पण त्यातही ते आनंदाने जगण्याचा आटापिटा करत असतात. त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्यावर खूप मेहनत घेतलेली असते. त्यांच्या अंगच्या गुणांचा योग्य तो उपयोग करून त्यांच्या हातून ते विविध वस्तू बनवून घेतात. त्या वस्तूंच्या विक्रीमधून मिळणारे पैसे बघून त्या मुलांना मिळणारे समाधान खूप मोलाचं आहे…त्याच समाधानासाठी मी जास्तीत जास्त कंदील दिवाळीच्या आधी घेतो. बाकी वर्षभर इतर वस्तू त्या संस्थेतून विकत घेऊन माझ्यातर्फे त्या सर्व मुलांना जमेल तेवढे समाधान देण्याचा प्रयत्न करत असतो…”
“माझ्या परीने हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो मी सतत करतो. अरे, ती सुद्धा आपल्यासारखीच माणसं असतात आणि म्हणूनच आपल्यासारखा त्यांना देखील आनंदाने जगण्याचा अधिकार आहे… म्हणूनच या कंदिलाच्या माध्यमातून मी त्या सर्व मुलांच्या आयुष्यात आशेचे कंदील लावण्याचा मनापासून प्रयत्न करतो. त्यांची जगण्याची दिवाळी आणखी लखलखीत आणि प्रकाशमान करण्याचा प्रयत्न करतो. मी काय म्हणतो ते तुला पटलं तर, तू सुद्धा इतरांना सांगायचा जरूर प्रयत्न कर प्रामाणिकपणे… एवढंच मी तुला सांगतो.”
दिनकर माझं बोलणं ऐकून कामाला निघून गेला आणि मी समाधानाने डोळे मिटून घेतले…!


