सुरेश महाबळ
योगायोग हा प्रकार अनेकांच्या जीवनामध्ये येत असतो. असाच एक प्रकार माझ्यासोबत झाला आहे, तो पण देवस्थानाच्या ठिकाणी. यामुळे माझा तो सुखद धक्का होता. मोठी मुलगी हर्षा B.Tech. झाल्यानंतर लगेचच एका MNC कंपनी मधे रुजू झाली आणि अद्याप कार्यरत आहे. ते वर्ष होते 2009. या कंपनीचे महाराष्ट्र आणि इतर प्रांतांमध्ये स्वमालकीचे रिसॉर्ट आहेत. 2011 साली हर्षाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी 2012मध्ये तिने महाबळेश्वर-पाचगणी रिसॉर्टसाठी अर्ज केला आणि ऑफ सीझन असल्यामुळे तिला बुकिंगसुद्धा मिळाले. त्याप्रमाणे मला, पत्नी संगीता आणि दुसरी कन्या मानसी असे आम्हाला ठाण्यात दुसऱ्या भावाकडे जळगावहून यावयास सांगितले.
हर्षाने टॅक्सी बुकिंग अधीच करून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 7.00 च्या सुमारास आमचा प्रवास सुरू झाला. दोन रात्र आणि तीन दिवस असे नियोजन होते. पाचगणी येथे रिसॉर्ट होते. दोन वाजेपर्यंत आम्ही तिथे पोहचलो. रस्त्यामध्ये जेवण झाल्यामुळे संध्याकाळच्या जेवणाची ऑर्डर देऊन ठेवली. राहाण्याची सोय उत्तम होती. दोन बेडरूम हॉल आणि मागे मोठे लॉन असे रिसॉर्ट होते. जेवण, नास्ता आणि चहा यांची चांगली सोय होती.
थोडा आराम केल्यानंतर पाचगणी फिरण्यासाठी निघालो. टेबल लॅण्ड, गोल्फ ग्राऊंड आणि काही शूटिंग स्पॉट पाहिल्यावर मार्केटमध्य गेलो. थोडी फार खरेदी करावयाची होती, ती मुलींनी केली आणि मुक्कामी परत आलो. दुसऱ्या दिवशी महाबळेश्वरकडे प्रस्थान केले. स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू होता, सर्वदूर स्ट्रॉबेरी दिसत होत्या. शेतीच्या बांधावरही ताज्या नुकत्याच खुडलेल्या स्ट्रॉबेरी विक्रीसाठी उपलब्ध होत्या.
हेही वाचा – गुरू पौर्णिमा… प्रा. म. मो. केळकर
काही पॉइंटवर थांबून तर कधी फिरत फिरत निसर्गाचा आनंद घेत साधारणपणे दुपारी 12 वाजता महादेव मंदिराकडे निघालो. जवळपास 200-300 फूट अलीकडे गाडी पार्किंगची सोय होती. गाडी पार्क करून मंदिराकडे निघालो. एकीकडे एक इच्छा पूर्ण होत असल्याचा आनंद होता… महाबळ महाबळेश्वराच्या दर्शनाला जात आहेत. दुसरीकडे, एक रुखरुख मनात होती की, आम्ही फक्त चौघेच दर्शनासाठी जात आहोत, सोबत अन्य भाऊ-बहीण नाहीत! मंदिराच्या 100-200 फूट अलीकडे असे मनात विचार सुरू असताना मंदिराची पहिली पायरी चढलो आणि समोर साक्षात आमची बहीण उषाताई आणि तिचा पती मुकुंदराव होते. क्षणभर काय आनंद झाला मला… कोणी तरी माझी आर्त विनंती मान्य केली. त्याचक्षणी दोघांना नमस्कार केला.
हेही वाचा – लोकल ट्रेन आणि मोबाइल एटिकेट्स
उषाताई आणि मुकुंदरावांना परत आत मंदिरामध्ये येण्याची विनंती केली, दोघेही परत मंदिरामध्ये आले. आम्ही सर्वांनी एकत्र दर्शन घेतले. माझ्या मनातील एक रुखरुख संपली या आनंदात आम्ही दोन तास काढले. उषाताई सोबत ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जेशी यांची बहीण, यजमान आणि मुलगी होते. काही न ठरवता अचानक, योगायोगाने झालेली आमची भेट पाहून त्यांनाही गंमत वाटली. आम्हा सर्वांची आठवण म्हणून त्यांनी काही फोटो पण काढले.
॥ जय महाबळेश्वर ॥