‘लिटिल वुमेन’ या कादंबरीवर सिनेमा आहे आणि हिंदीत ‘कच्ची धूप’ नावाची मालिकाही होती. या कादंबरीचे भाषांतर प्रसिद्ध कवियत्री शांता शेळके यांनी समर्पक शब्दांत केलं आहे. लेखिका लुइसा मे अल्कॉट हिचे हे आत्मवृत्त नसले तरी, एकीच्या आयुष्यावरून प्रेरणा घेऊन लिहिलेले कथानक आहे. चार बहिणी आणि त्यांची आई यांच्यावर असलेले कथानक, अमेरिकेत महायुद्धाच्या वेळी घडते. वडील युद्धावर गेले आहेत आणि आई मिसेस मार्च, या चार मुलींना वाढवते. ती जगभरातली आईसारखीच असते. मुलांना संस्कार देते, संगोपन करते, मुलींना मूल्य शिकवते. ही कादंबरी किशोर वयात वाचायला हवी. मी शाळेत असताना वाचली होती आणि तेव्हा अतिशय आवडली होती. परीकथेसारख्या या कथेत प्रत्येक मुलीने स्वतचे प्रतिबिंब पाहिले असेल, स्वतःला शोधले असेल. प्रेम या संकल्पनेला समजून देण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला दिसतो.
मेग, ज्यो, बेथ आणि एमी मार्च या चार बहिणी. सर्वात मोठी मेग खूप सुंदर असते. ज्यो थोडीशी आडदांड, बिनधास्त, बुद्धिमान असते. तिला लेखिका व्हायचं असतं. बेथ आजारी असते. ती लाजाळू, कनवाळू असते. तिचा लवकर मृत्यू होतो. एमी हे शेंडेफळ सुंदर, बुद्धिमान आणि चित्रकार असते. त्यांच्या शेजारी लॉरेन्स आजोबा आणि त्यांचा नातू लॉरी राहत असतात. लॉरीला आई-वडील नसतात आणि तो गर्भश्रीमंत असतो. त्याला आईचे प्रेम मिसेस मार्च देतात. या चौघींना मात्र आर्थिक चणचण सहन करावी लागत असते. मेग आणि ज्यो अर्थार्जन करून हातभार लावत असतात. मिसेस मार्च हॉस्पिटलमध्ये काम करत असते. मुलींचे वडील कादंबरीत फारसे येत नाहीत.
हेही वाचा – भारतीय तत्वज्ञानाची झलक… पवनाकांठचा धोंडी!
नाक नकटे आहे म्हणून चिमटा लावून झोपणारी एमी फार गोड वाटते. ज्यो कविता करते, चित्र चिकटवून गोष्टीचे पुस्तक लिहिते… ते एमी रागाच्या भरात फाडून टाकते. एमी मैत्रीणींना जेवायला बोलावते तेव्हा झालेली फजिती… पार्टीत गेल्यावर ज्योचा जळलेला ड्रेस लपवताना लॉरीशी (टेडी ऊर्फ थीओडोर) झालेली मैत्री… मेगचे आणि जॉनचे प्रेमप्रकरण… आजारी बेथचे गरीब कुटुंबाला मदत करणे… ख्रिसमसला शेजारच्या गरीब कुटुंबाला आपल्या वाटचे पदार्थ देणे… आणि मग लॉरीच्या आजोबांनी या मुलींना मेजवानी पाठवणे… बेथने कृतज्ञतापूर्वक त्यांच्यासाठी हातमोजे विणणे… अशा लहान प्रसंगांतून घडणाऱ्या मुली लेखिकेने दाखवल्या आहेत. लॉरी आणि ज्योची मैत्री त्या वयाला साजेशी असते. बेथ गरीब कुटुंबाला मदत करायला जाते, तेव्हा त्या मुलांचा स्कार्लेट फिव्हर हा रोग तिला जडतो. त्यांचे वडील आजारी पडतात म्हणून आई त्यांची सुश्रूषा करायला जाते, तेव्हा मुली घर सांभाळतात. पैसे उभारण्यासाठी ज्यो आपले केस विकते, आजारी बेथची सेवा करते आणि मेगने लग्न करून घर सोडून जाऊ नये म्हणून गमतीशीर कारणे देते, पहिल्या कथेचा मोबदला मिळतो तेव्हा आनंदाने धावत घरी येते… लेखिका ज्योच्या रुपात कादंबरीत दिसते.
ज्यो नात्यातल्या श्रीमंत स्त्रीकडे, आंट मार्च, वाचन करून दाखवत असते. पण ती ज्यो ऐवजी एमीला तिच्याबरोबर परदेशी फिरायला घेऊन जाते, तेव्हा ज्योला वाईट वाटते. ती लॉरीला नकार देते, तेव्हा तिला समजते की, तिचा बालपणीचं मैत्र हरवलं आहे. युरोपात लॉरी एमीला भेटतो, तेव्हा ती त्याला सांगते की, त्याने ऐशोआरामात राहणे सोडून स्वतःचे भविष्य घडवायला हवे आणि त्याच्या मागणीला नकार देते. या मुलींना आर्थिक चणचण असली तरी त्यांच्यावरचे संस्कार चांगले असल्यामुळे त्या पैशापाठी पळत नाहीत.
आंट मार्च सतत सांगत असते की, मुलींनी श्रीमंत मुलाशी विवाह करायला हवा. तरी त्या तिचे बोलणे मनावर घेत नाहीत. ज्योला आंट मार्च तिची सर्व संपत्ती देते, जिचा उपयोग ती मुलांची शाळा सुरू करण्यासाठी करते.
लेखिकेने मुलांचे मानसशास्त्र समजून घेऊन नस बरोबर पकडली आहे. त्यामुळे कादंबरी अगदी जवळची वाटते. शिकवण देण्याचा प्रयत्न न करताही कथानक बरेच काही शिकवते. त्या काळात विवाह हे स्त्रीसाठी अत्यंत आवश्यक होते, अन्यथा अर्थार्जन करणे शक्य नव्हते. ज्यो ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करते. स्त्री स्वतंत्र असू शकते, स्वत:च्या पायावर उभी राहू शकते, हे सांगत राहते. या चार अगदी भिन्न स्वभावाच्या मुली स्त्रीजातीचे प्रतिनिधित्व करतात. घर, संसार हेच स्वप्न असणारी मेग गरीब शिक्षकाशी विवाह करते, आजारी, लाजाळू बेथ संगीतकार असते. तिच्याकडे प्रेम करण्याची ताकद असते, पण शारीरिक ताकद नसते. ज्योला स्वातंत्र्य प्रिय असते, पण शेवटी ती फार एकटी पडते. तिला साथीदाराचे महत्त्व पटते आणि एमीचे मोठी चित्रकार होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. आयुष्यात सगळे इच्छिलेले मिळू शकत नाही. प्रत्येकाच्या नशिबात सुख आणि दुखाचा वाटा असतोच!
हेही वाचा – कोसला… अस्वस्थ तरुणाईचा क्लोजअप
दोन, तीन भावंडे असलेली कुटुंब असताना त्यांचे आपापसातले नाते असेच होते. किशोर वयात ज्यांनी ही कादंबरी वाचली, त्यांना अधिक भावली. भावंडांचे एकमेकांवर असलेले प्रेम, रागलोभ, स्वप्न, आकांक्षा, प्रेमभावना, प्रेमभंग, अपेक्षाभंग, निराशा, एकटेपणा, अल्लडपणा वयानुसार असतेच. एक दिवस बालपण संपल्याची जाणीव होते आणि तारुण्यात पदार्पण होते.
भाषांतर इतके योग्य शब्दांत केले आहे की, कुठेही शब्द खटकत नाहीत. शांताबाईंचे कौशल्य सुपरिचित आहेच, भाषेचे सौंदर्य सुद्धा! यात ती एक झलक पाहायला मिळते.
ही कादंबरी खूप गाजली. लाखो प्रती विकल्या गेल्या, अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली. हे मोठे यश आहेच, पण प्रत्येक व्यक्तीला यात स्वत:चे प्रतिबिंब दिसते, हे खरे. लेखिकेच्या शब्द सामर्थ्याचे यश आहे. वरवर पाहता साधेसुधे असणारे कथानक मनात खोलवर प्रभाव पाडते. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चार बहिणी मोठ्या हिरव्यागार झाडाखाली बसलेल्या दाखवल्या आहेत. आसपास पिवळ्या रंगाची फुले फुलली आहेत. वसंत ऋतू आहे. मराठी पुस्तकाचे मुखपृष्ठ मला इंग्लिश पुस्तकापेक्षा जास्त बोलके वाटते. प्रसन्न वातावरण दाखवून एक रम्य बालपण दाखवले आहे.
ही कादंबरी मुलांना वाचायला द्यायला हवी. पालकांनी सुद्धा वाचायला हवी. इंग्लिश सिनेमा सुद्धा बऱ्याच अंशी अपेक्षा पूर्ण करतो, पण कादंबरी वाचायची लज्जत वेगळीच. या चौघीजणी चारचौघींसारख्याच असल्या तरी आपापले वेगळेपण टिकून ठेवतात. म्हणूनच याही काळात आपल्याला ही कादंबरी कालबाह्य वाटत नाही.


