मानसी देशपांडे
‘उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे…’
या गाण्याच्या ओळी ‘उंबरठा’ चित्रपटातील आहेत, पण ज्यांच्या लेखणीतून हे गीत साकारले गेले ते म्हणजे आपले लाडके सुरेश भट! गझल हा काव्यप्रकार आपल्या सर्वांना परिचयाचा आहेच, तरीही त्यात देखील किती गहिरा अर्थ असतो, हे समजले ते भट साहेबांमुळे. इथे मी प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांचा माझ्या अत्यंत आवडीचा विचार मांडत आहे, ‘काही फुलपाखरं उडून गेली तरी, हाताच्या बोटावर रंग ठेवून जातात…’ तुम्हाला सांगते, मी जी लेखाची सुरुवात ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या…’ या गाण्यांच्या ओळींनी केली; कारण, या गाण्याच्या माध्यमातून मनात साचलेल्या असंख्य भावना भट साहेबांनी व्यक्त केल्या आहेत. तुमची जवळची व्यक्ती ही तुमच्यापासून जेव्हा दूर असते, तेव्हा सतत त्याच व्यक्तीचे भास आपल्याला होत असतात. जसं की, व.पु. म्हणतात, ‘ओढ काय असते ते जीव लावल्याशिवाय कळत नाही…’ शरीराने दूर असणं हे देखील किती त्रासदायक असतं ते हे गाणं ऐकलं की समजतं!
मला इथे सुरेश भट यांच्या लेखणीचे वेगळ्या कारणाने कौतुक वाटते कारण, या गाण्यात स्त्रीच्या मनातील तो विरह खूप सुंदर पण तितक्याच काळजाला हात घालणाऱ्या शब्दांत त्यांनी मांडला आहे.
‘पुन्हा पुन्हा भास होत आहे, तुझे हसू आरशात आहे…’
आयुष्य हे एकट्याने काढणं खरंच सोपं असतं का हो? तुमच्या मनात कितीतरी वेळा भावनांचे, विचारांचे काहूर माजते, त्या वेळी जिची तुम्हाला गरज असते, तीच तिथे नसेल तर, त्या गात्रात फुलणाऱ्या प्रेमाच्या कळ्या या कोमेजुन जातात. कसं आहे, रडावंस जरी वाटलं तरी, कोणाची तरी मिठी ही त्यावरचा उपाय असते. इथे देखील व. पुं.नी नेमकं हेच म्हटलंय, ‘पाऊलवाटेवरच सोबतीचा हात हवा असतो…’ डोळे देखील तिच्याच येण्याकडे लागलेले असतात.
हेही वाचा – कवी ग्रेस अन् “भय इथले संपत नाही…” कविता
आता बघा, भटांनी या कवितेत मिठीला खूप महत्त्व दिलं आहे. याचं कारण असं, जेव्हा तिची भेट होईल, तेव्हा बोलण्यापेक्षाही अश्रू जास्त येतील… आणि तिच्या नेहमी होणाऱ्या भासांच्या साखळ्या नाहीशा होतील. पुढील ओळी निव्वळ अप्रतिम आहेत –
‘रोज तुझ्या वेणीसाठी, डोळे नक्षत्रे खुडती
रोज तुझ्या भेटीसाठी, बाहू आसवांचे होती…’
(कविता – रोज, कवितासंग्रह – रंग माझा वेगळा)
या आयुष्यात जितके अपेक्षाभंग, उपेक्षेचे हुंदके आपण सोसतो, तितके जास्त परिपक्व होत जातो. दु:खाची वाट चालताना प्रेमाचे गाव जर लागले तर, हृदयात धडधड सुरू होते. व.पु. म्हणतात, ‘प्रेम म्हणजे त्याग, त्यामध्ये ‘मी’पणा नसावा…’ बरोबर आहे, पण हे निरपेक्ष प्रेम समजणारं, कोणीतरी भेटावं देखील लागतं की!! जेव्हा अशी व्यक्ती भेटते तेव्हा ती पायपीट थांबली, असे वाटते. मघाशी म्हटल्याप्रमाणे, अशा क्षणाला शब्दांपेक्षा डोळे आपली भूमिका उत्तम रितीने बजावतात. तो एक स्पर्श साऱ्या वेदनांचा विसर पाडतो. कारण, डोळे आणि स्पर्श शब्दांपेक्षा छान बोलतात… भट साहेबांनी म्हटले आहे –
‘दु:खाच्या वाटेवर गाव तुझे लागले,
थबकले न पाय तरी, हृदय मात्र थांबले…’
(कविता – पायपीट, कवितासंग्रह – रंग माझा वेगळा)
हेही वाचा – आयुष्याची इस्त्री कडकच राहिली पाहिजे!
खरंच, सुरेश भटांच्या रचना खूप काही सांगून जातात. तुम्ही त्यांची कोणतीही गझल ऐका किंवा गाणं, त्या विश्वात तुम्ही रममाण झाल्याशिवाय राहणार नाही. मी या आधीही लिहिले आहे, स्त्री सौंदर्याला तसेच त्या तरुण रात्री या ‘कोजागरी’सारख्या तेव्हाच वाटतात जेव्हा त्यांचे प्रेम हे नव्याने अजून खुलत असते. ते डोळ्यात दिसताना भट साहेबांनी या गाण्याच्या ओळी साकारल्या.
‘सांग या कोजागिरीच्या, चांदण्याला काय सांगू,
उमलते अंग अंग माझे, आणि तू मिटलास का रे…’
(कविता – तरुण आहे रात्र अजुनी, कवितासंग्रह – रंग माझा वेगळा)
यापुढे कितीही लिहीलं तरी माझी शब्दसंपदा कमीच पडेल. तरी एवढंच लिहिन,
‘सावकाश आयुष्याचा खेळ खेळलो मी,
बाद होत गेले सारे, मीच बाद नाही…’
(कविता – नाबाद, कवितासंग्रह – एल्गार)