माधवी जोशी माहुलकर
नवरात्रौत्सवात अनेकजण उपवास करतात. अशावेळी फराळाचे पदार्थ काय करावे, हा मोठ्ठा प्रश्न गृहिणींपुढे असतो. अशावेळी साबुदाणा, भगर, बटाटा पॅटीस तसेच भगर इडली हे पर्याय ठरू शकतात. भगर हा मिलेट्सचाच एक प्रकार असल्याने ही डिश पौष्टिक सुद्धा आहे. आता यांची रेसिपी आपण पाहुयात.
भगर, साबुदाणा पॅटीस
एकूण कालावधी – सुमारे 45 मिनिटे
साहित्य
- भगर – 1 वाटी
- साबुदाणा – 1 वाटी
- शेंगदाणा कूट – अर्धी वाटी
- आले – 1 इंच तुकडा
- हिरवी मिर्ची आणि कोथींबीर पेस्ट – अर्धी वाटी
- उकडलेले बटाटे – 2
- मीठ – चवीनुसार
- जिरे – 1 लहान चमचा
- तेल – तळणासाठी
- खोबऱ्याचा किस – 1 लहान वाटी
- काळीमिरी पावडर – 1 लहान चमचा
- मनुका, चारोळी आणि काजूचे तुकडे – आवडीनुसार
- पीठीसाखर – चवीनुसार
कृती
- भगर आणि साबुदाणा वेगवेगळे भाजून घ्यावे आणि थंड झाले की, त्याचे मिक्सरवर एकत्र पीठ करावे.
- या पीठामधे दोन उकडलेले बटाटे किसून घालावे.
- त्यानंतर त्यात बारीक चिरलेले आले, मिरची- कोथींबीरीची पेस्ट, अर्धी वाटी शेंगदाणा कूट, जिरे, काळीमिरी पावडर आणि मीठ घालून सगळे पदार्थ एकजीव करून घ्यावे.
- त्यानंतर त्यात थोडसे पाणी घालून ते घट्ट मळून घ्यावे.
- आता हे मळलेले मिश्रण हातावर घेऊन त्याला गोलाकार लहान वाटीसारखा आकार द्यावा.
- त्यामध्ये खोबऱ्याचा किस, शेंगदाणा कूट, काजूचे तुकडे, मनुका आणि चारोळी, पीठीसाखरेचे सारण भरावे आणि हाताने हलका दाब देत बंद करावे.
- जरा जाडसरच ठेवून हे पॅटीस तयार करावे.
- नंतर सर्व पॅटीस तेलामध्ये खमंग शॅलोफ्राय करावेत किंवा तळून घ्यावेत.
टीप
- हे गरमा गरम पॅटीस हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करावे.
हेही वाचा – Recipe : नवरात्री स्पेशल… साबुदाण्याची बर्फी
भगर इडली
एकूण कालावधी – साधारणपणे 1 तास
साहित्य
- भगर – 2 वाटी
- साबुदाणा – 1 पूर्ण वाटी
- भिजवलेला साबुदाणा – 3 ते 4 छोटे चमचे
- आंबट दही – अर्धी वाटी
- मीठ – चवीनुसार
- ईनो – 1 चमचा
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… तुरीच्या उसळीतील दिवसे!
कृती
- दोन वाट्या भगर आणि साबुदाणा कोरडेच मिक्सरमध्ये एकत्रितपणे रवाळ बारीक करून घ्या. (खूप जास्त जाडही नको आणि बारीकपण नको.)
- या पीठामधे अर्धी वाटी आंबट दही, चवीनुसार मीठ आणि भिजवलेला साबुदाणा घालून चांगले फेटुन घ्या आणि नंतर अर्धा तास झाकून ठेवा.
- यादरम्यान इडली कुकरमधे पाणी गरम करायला ठेवावे.
- अर्ध्या तासाने इडलीचे पीठ घट्ट झाले असेल तेव्हा त्यामधे थोडे थोडे पाणी घालून चांगले मिक्स करून घ्यावे.
- आता एक चमचा ईनो घालून एकदा परत फेटून घ्यावे.
- नंतर इडली पात्राला तेल लावून हे बॅटर टाकून हा स्टॅण्ड इडली कुकरमध्ये वाफवायला ठेवा.
- पंधरा ते वीस मिनिटांनी गॅस बंद करून एका सुरी घालून इडल्या ईडल्या झाल्याची खात्री करून घ्या. सुरी कोरडी निघाली तर इडली तयार झाली असे समजावे.
- एका पसरट चमचा जरासा पाण्यात बुडवून सर्व इडल्या काढून घ्याव्यात.
टीप
- शेंगदाण्याची आमटी करून त्यासोबत या गरमागरम इडल्यांचा आनंद घेऊ शकता.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


