माधवी जोशी माहुलकर
मोगरी घातलेला बेसनाच्या लाडवाची प्रक्रिया नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या चॅनलवर पहायला मिळाली. मोगरी घातलेला बेसनाचा लाडू काय असतो, याबद्दल मलाही उत्सुकता होतीच! त्यांचा संपूर्ण व्हिडीओ पाहील्या नंतर मलाही हे लाडू बेसनाला मोगरी घालूनच करावेत, असे वाटले… तसे मी लाडू केले सुद्धा! ते चवीला रवाळ आणि सुंदर झाले. शिवाय, टाळूला अजिबात चिकटत नाहीत. विशेष म्हणजे, बेसन देखील खूप लवकर भाजता आला. आता हे मोगरी घातलेले लाडू कसे करतात, त्याची प्रक्रिया पाहू…
साहित्य
- बेसन – 2 उभे पेले
- साजूक तूप – 150 ग्रॅम
- पिठीसाखर – 1 पेला
- बदाम – 5-6 (काप करावेत)
- काजू – 8-10 ((काप करावेत))
- मनुका – 1 वाटी (ऐच्छिक)
- वेलची पूड – 1 चमचा
हेही वाचा – Recipe : गूळ आणि कणकेचे शंकरपाळे!
कृती
- प्रथम दोन पेले बेसन (म्हणजे हे साधारणपणे अर्धा किलो होते) एका परातीत घेऊन त्यात दोन टेबल स्पून तूप घालून ते बेसनाला सर्व बाजूंनी व्यवस्थित चोळून घ्यावे.
- आता हे तूप लावलेले बेसन एका मोठ्या गाळणीने दुसऱ्या एखाद्या पसरट भांड्यात कोरडेच चाळून घ्यावे; याच प्रक्रियेस बेसनास मोगरी लावणे, असं म्हणतात. ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे, यामुळे बेसन फुलते आणि रवाळ, दळदार होते.
- अशा प्रकारे बेसन चाळून झाले की, कढईत तूप तापत ठेवावे.
- हे तूप तापले की, त्यामध्ये हे मोगरी घातलेले बेसन टाकावे, गॅस मंद करून जवळपास 25 ते 30 मिनिटे बेसन सतत परतत रहा. हे बेसन कढईच्या बुडाला अजिबात चिकटत नाही आणि जसेजसे त्याला भाजावे तसतसे ते मस्त फुलत जाते.
- बेसन भाजत असतानाच अगदी शेवटी, एक दोन मिनिटे आधी त्यामध्ये बदाम आणि काजूचे काप टाकावे. जेणेकरून तेही बेसनासोबत मिक्स होतील.
- बेसनाला गुलाबी रंग आला की, अजून एक दोन मिनटे ते परतून त्यामध्ये वेलची पावडर टाकून गॅस बंद करावा आणि बेसन थंड करायला ठेवावे.
- बेसन पूर्णपणे थंड झाले की यामध्ये एक पेला पिठीसाखर घालावी आणि हे भाजलेले, मोगरी असलेले दळदार बेसन साखरेसोबत एकजीव करावे आणि लगेच त्याचे लाडू बांधावे!
तयारीसह एकूण कालावधी – 1 तास
हेही वाचा – Recipe : दिवाळी स्पेशल… खमंग अनारसा!
टीप
- बेसन भाजताना ते जर कोरडे वाटत असेल तर एक-दोन टेबल स्पून तूप गरजेनुसार त्यात टाकावे. तथापि, शक्यतोवर गरज पडत नाही.
- बेसन लवकर थंड करावयाचे असल्यास त्याची कढई एखाद्या परातीत किंवा पसरट भांड्यात पाणी घेऊन त्यात ठेवावी.
- हे मोगरी घातलेले रवाळ लाडू तोंडात टाकले की विरघळतात.
- या नवीन पद्धतीने हे बेसनाचे लाडू तयार करा आणि दिवाळीचा मनमुराद आनंद लुटा.
शुभ दीपावली!
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.



Thank you team Avantar ! 🙏🏻🙏🏻