Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeअवांतरअनाहूत सल्ला

अनाहूत सल्ला

चंद्रशेखर माधव

सुमारे 25 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे मी एमसीएम झालो ना त्या वेळची. एक कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होती, प्रभात रोडला. तिथे माझा एका मित्र फॅकल्टी म्हणून नोकरीला होता. त्याच सुमारास मी पास-आऊट झालेलो असल्यामुळे आणि एकूणच सी लँग्वेज तसेच फॉक्स प्रोमध्ये माझं प्रभुत्व असल्यामुळे, मला व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून बोलवण्यात आलं. हळूहळू मी तिथं रुळलो. तिथे नितीन नावाचा एक मॅनेजर होता. तोच ती इन्स्टिट्यूट पूर्णपणे सांभाळायचा. सांगताना मात्र इन्स्टिट्यूट माझी आहे, असं सांगायचा. इन्स्टिट्यूटचे तीन डायरेक्टर होते. त्यातले दोन अमेरिकेला असायचे, एक डायरेक्टर होता पुण्यातच! पण तो मनुष्य कधी फारसं लक्ष घालायचा नाही, म्हणजे अक्षरशः महिना-महिना इन्स्टिट्यूटमध्ये यायचा सुद्धा नाही. जसं जसं मला सगळं माहीत झालं आणि मी तिथं रुळलो, तसं तसं माझ्या हे लक्षात यायला लागलं की, हा मॅनेजर पैशांची अफरातफरी करतोय आणि त्या लोकांना फसवतोय.

मी एकदा तिथल्या दोन फॅकल्टी, जे माझे मित्र झाले होते, त्यांच्यासमोर हा विषय मांडला. त्यांनाही ते लक्षात आलंच होतं, पण आतापर्यंत कधी बोलायची त्यांची इच्छा झाली नव्हती. त्यानंतर काय करायचं, असा विचार करून अमेरिकेतले जे डायरेक्टर होते त्यांचा नंबर आम्ही मिळवला.

ही कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड कोर्सेस चालवायची. म्हणजे सहा महिन्यांच्या एका कोर्सची फी त्याकाळी चाळीस हजार रुपये होती, जी खूप जास्त होती आणि आमच्याकडे सुमारे चार ते पाच बॅचेस कायम भरलेल्या असायच्या. असं सगळं असतानाही नितीन ही इन्स्टिट्यूट नुकसान उचलत चालवतो आहे, हे कसं काय? याचा आम्हाला उलगडा होत नव्हता.

हेही वाचा – लहानपणीची दिवाळी अन् नव्या कपड्यांची खरेदी

आम्ही एक दिवस धीर करून रात्री दहाच्या सुमारास अमेरिकेतले जे डायरेक्टर होते, त्यांना फोन लावला आणि आमची ओळख करून दिली. आम्हाला लक्षात आलेल्या सर्व गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या, लगेचच त्यांनी बहुतेक करून पुण्यातल्या डायरेक्टरला ही बाब सांगितली असावी, कारण दुसऱ्याच दिवशी पुण्यातल्या डायरेक्टरचा आम्हाला फोन आला.

पुण्यातल्या डायरेक्टरने आम्हाला दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी त्याच्या हॉटेलवर भेटायला बोलावले. तिथं गेल्यावर आम्ही ज्या ज्या घटना आमच्या नजरेस आल्या होत्या, ज्या संशयास्पद होत्या, त्या सर्व त्याच्या कानावर घातल्या. त्यानंतर आम्ही तिथून माघारी परतलो.

आता आमचं मनोबल वाढलं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही नितीन ऑफिसमध्ये नाही, असं बघून त्याचा ड्रॉवर पूर्णपणे शोधला. त्यामध्ये आम्हाला दोन पावती पुस्तकं सापडली. दोन्ही पावती पुस्तकांचे क्रमांक आम्ही नोंदवून घेतले आणि लगेच दुसऱ्या दिवशी पुण्यातल्या डायरेक्टरला हे पुरावे घेऊन भेटायला गेलो. त्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आता पुढे काय करायचं, असं आम्ही त्याला विचारलं… आणि असंही सांगितलं की, आम्ही नितीनला Red hand पकडतो. त्याच्यावर पुण्यातल्या डायरेक्टरने जे उत्तर दिलं, ते अत्यंत मार्मिक होतं.

हेही वाचा – परतवून लावलेला दरोडा

तो आम्हाला म्हणाला की, “इतनी जल्दी क्यों करते हो? करने दो उसको जो करना है. देखते हैं ऐसा करते करते कहां तक जाता है. पूरा होने दो, बाद मे एक साथ रंगे हाथ पकड़ेंगे उसको!”

कालांतराने जे होणार होतं तेच झालं, नितीनचं भांडं फुटलं… आणि त्याची हकालपट्टी करण्यात आली. नंतर आम्ही सुद्धा तिथून बाहेर पडलो.

का कुणास ठाऊक पण त्यावेळी त्या डायरेक्टरने दिलेला तो सल्ला माझ्या मनावर बिंबवला गेला. पुढील आयुष्यात मला जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले, तेव्हा त्यानं सांगितलेला हा उपाय मी अगदी चपखलपणे वापरला आणि तो उपाय त्या ठिकाणी बरोबर लागू पडला!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!